तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर
लेखकांनी संतांबद्दल लिहिताना लोकश्रध्देचे भान ठेवले पाहिजे. संतांनी शिकवलेली एकात्मता हे वैश्विक जाणिवेचे अधिष्ठान असलेली एकात्मता आहे, हे ऐतिहासिक सत्य असून ते आजच्या समाजासमोर मांडताना नव्या लेखकांनी ‘अभ्यासोनी प्रगटावे’ असा सूर 'समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्या साहित्यातील सामाजिकता' या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आला. संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी संत तुकारामांवर लिहिलेल्या ताज्या कादंबरीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर या परिसंवादात काय व्यक्त केले जाते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, सर्वच वक्त्यांनी या विषयाच्या कडेकडेने बोलणे पसंत केले. साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चकार शब्दही न काढता डॉ. आनंद यादव यांच्याबाबत वारकर्यांनी घेतलेल्या भूमिकेशी जवळपास सुसंगत अशीच या विषयाची मांडणी वक्त्यांनी केली. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. रेखा नार्वेकर, डॉ. सुनील चिंचोलकर, डॉ. देवकर्ण मदन यांनी आपले विचार व्यक्त केले. बुद्धिच्याही काही सीमा असतात, असे सांगताना डॉ अभ्यंकर म्हणाले, ‘वसुदैवं कुटुंबकम्’ हाच विचार सर्व संतांनी मांडला असून ज्याला भारतीय संस्कृतीतील अष्टांगांपैकी कोणत्याही अंगाचा अभ्यास करायचा असेल त्यासाठी लागणारा प्रत्येक विचार हा संत साहित्यात आहे. संतांनी राष्ट्र घडविले, हा भाग जरी महत्वाचा असला तरी संतांनी सर्वप्रथम माणूस जोडला आणि घडविला हाही भाग महत्वाचा आहे. डॉ. यादवांचा उल्लेख न करता, आजच्या ललित लेखकांनी संत साहित्यावर लिहिताना सामाजिक एकरसता निर्माण व्हावी असेच लेखन केले पाहिजे असे ते म्हणाले. |
साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चकार शब्दही न काढता डॉ. आनंद यादव यांच्याबाबत वारकर्यांनी घेतलेल्या भूमिकेशी जवळपास सुसंगत अशीच या विषयाची मांडणी वक्त्यांनी केली. |
|
|
डॉ. सुनील चिंचोलकर यांनी समर्थ रामदासांविषयी बोलताना, अध्यात्मिक भावना आणि ईश्वरभेटीची आस यातूनच सामाजिक समरसता संत साहित्यात जन्माला आल्याचे सांगितले. समर्थ रामदास किंवा संत तुकाराम यांनी फक्त आपल्या अभंगांतून एकात्मतेचा विचार मांडला असे नाही तर कृतीतून एकात्मता सिध्द केली. संतांच्या आत्मज्ञानाच्या अनुभूतीतून त्यांचा विशाल दृष्टीकोन विकसित झाला. अल्ला़, खुदा आणि पीर यांचा उल्लेख करीत संत रामदासांनी मुस्लिम अष्टकेही लिहिल्याचे त्यांनी नमुद केले.
सतरावे शतक संघर्षाचे होते त्या परिस्थितीला शाश्वत मुल्यांच्या आधारे संतांनी कसे परिवर्तित केले याविषयीचा विचार डॉ. देवकर्ण मदन यांनी मांडला. समाज एकसंघ रहावा यापेक्षादेखील तो एकात्म व्हावा यासाठी संतांनी प्रयत्न केले. नीतीमान समाज निर्माण व्हावा याकरीता 'सत्य आणि असत्य यासी मन केले ग्वाहे' अशी भूमिका संतांनी घेतली होती, अशी आपली उंची फारच खुरटी असल्याने संतत्व पेलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजीक कार्याचा आदर्श हा अभंगांमधून मिळतो, प्रयत्नांचे श्रेष्ठत्व अभंगच शिकवतात म्हणून संतसाहित्य हे अक्षरसाहित्य आहे, असे रेखा नार्वेकर यांनी सांगितले. परिसंवादास चांगला प्रतिसाद मिळाला.