येथील साहित्य संमेलनाचा नवा अध्यक्ष अद्याप ठरला नसला तरी रसिकजनांनी मात्र महाबळेश्वरला धडक मारली आहे. अनेक सारस्वतही येथे डेरेदाखल झाले आहेत. संमेलन यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर सज्ज झाले आहे. कमानी, पताका आणि स्वागतफलकांनी महाबळेश्वरमध्ये सारस्वतांचे स्वागत करण्यात येत असून संमेलनाच्या पूर्वसंध्येला वातावरण संमेलनमय झाले आहे.
महाबळेश्वरसारख्या छोट्या गावात प्रथमच अखिल भारतीय स्तरावरचे संमेलन होत आहे. पण, संयोजकांनी कोणतीही उणीव ठेवलेली नाही. ठिकठिकाणी स्वागत कमानी, पताका आणि फलक लावण्यात आले आहेत. संमेलनासाठी येणार्या प्रत्येकाचे उत्फुर्त स्वागत करण्यात येत आहे. गैरसोय टाळण्यासाठी मदतकेंद्र सुरू करण्यात आले असून येणार्या पाहुण्यांना याचा लाभ घेता येत आहे. मध्यवर्ती कार्यालयामध्ये संमेलनविषयक आवश्यक माहिती देण्यात येत आहे.
सुमारे एक हजार सदस्यांनी नोंदणी केली असून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाचे अध्यक्ष ठरले नसले तरी पूर्वसंध्येला महाबळेश्वर गर्दीने फुलून गेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आणि परप्रांतातून सारस्वत महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहेत.
दरम्यान, संमेलनस्थळाचे नाव अद्याप निश्चित झाले नसून आज रात्री होत असलेल्या बैठकीत नुतन अध्यक्षांबरोबरच संमेलनस्थळाचे नावही जाहिर करण्यात येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले -पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी काही माजी अध्यक्ष महाबळेश्वरमध्ये दाखल झाले असून रात्री आठच्या सुमारास बैठकीस प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले.