डॉ. आनंद यादव यांनी अनपेक्षितपणे साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरूवारी (दि.19) साहित्य महामंडळ व इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीत नूतन अध्यक्षांची निवड होणार आहे. मात्र, ऐनवेळी अध्यक्षपद निवडण्याची तरतुद महामंडळाच्या घटनेमध्ये नसल्याने पेच निर्माण झाला आहे. संमेलन नियोजित कालावधीतच पार पाडण्याचा संयोजकांचा रेटा असल्याने मतदानाच्या प्रक्रियेला फाटा देऊन पदाधिकार्यांच्या कार्यकारणीच्या मतावरच अध्यक्ष ठरणार आहे.
संमेलनाचा अध्यक्ष बदलायचा असल्यास सात दिवसांची नोटीस देऊन महामंडळाच्या सदस्यांची बैठक घेणे बंधनकारक आहे. पण, संमेलनाला केवळ एका दिवसाचा अवधी राहिला आहे. सर्व तयारी पुर्ण झाली असल्याने ही कार्यवाही करणे शक्य नसल्याने तातडीची बैठक घेऊन नुतन अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीत महामंडळाचे 20 सदस्य, माजी अध्यक्ष व संयोजनामधील तीन प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. अध्यक्षाची नियुक्ती करणार्या या नव्या कार्यकारिणीतील सदस्य अध्यक्षपदासाठी उमेदवाराचे नाव सुचवतील व सर्वांनुमते नुतन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. संमेलनाच्या इतिहासात अशा पध्दतीने पहिल्यांदाच अध्यक्षाची निवड होणार आहे.
दरम्यान, नुतन अध्यक्ष कोण याबाबत समस्त साहित्याकांमध्ये उत्सुकता वाढली होती वेगवेगळ्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपण कोणाचे नाव सुचविणार? या प्रश्नाला उत्तरे देताना ठाले-पाटील म्हणाले, यादव यांचा बळी गेला आहे, ही दुदैवी बाब आहे पण, पुढील अध्यक्ष कोण हे मी ठरविणार नाही आणि कोणाचे नावही सुचविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण केवळ बैठकीचे अध्यक्षपद भुषविणार असून सर्व सदस्यांचे मत लक्षात घेऊन सर्वांनुमते नुतन अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.