Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कौतिकरावांचे संतापजनक 'कवित्व'

कौतिकरावांचे संतापजनक 'कवित्व'
महाबळेश्वर (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी) -
WDWD
'अभिजनांवर तुटून पडत बहुजनांनी साहित्य संमेलने यशस्वी केली.' 'अभिजनांची बहुजनांकडे बघण्याची मानसिकता सनातन आहे, या मानसिकतेमुळेच संमेलनांना बदलावे लागले. 'इंदिरा संतांना सुमार दर्जाच्या साहित्यिकाकडून पराभूत व्हावे लागले', ही विधाने आहेत, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची. आधीच 'पडलेल्या' या साहित्य संमेलनात कौतिकरावांनी जातीयवादी रंग देऊन संमेलनाला मुळात आलेला वादाचा रंग आणखी गडद करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या बोलभांड वक्तव्यांनी त्यांनी पुन्हा एकदा साहित्यिक आणि रसिकांची नाराजी ओढवून घेतली.

उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या भाषणाला सुरांची जोड देत वातावरण प्रफुल्लित केले असताना ठाले-पाटलांनी आपल्या जातीयवादी भाषणातून त्यावर बोळा फिरवला. संमेलनाला अध्यक्ष नसल्याने महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी याबाबत खुलासा करण्याची अपेक्षा होती. तो तर त्यांनी केलाच नाही, पण उलट साहित्य संमेलनाच्या केंद्रस्थानी आपणच असावे या हव्यासापोटी नवे वाद निर्माण करणारी वक्तव्ये जन्मास घालण्यात त्यांनी धन्यता मानली.

आतापर्यंतच्या संमेलनांचा आढावा घेताना त्यांनी अभिजन आणि बहुजन यांची तुलना करताना संमेलनाच्या व्यासपीठावर जातीयवादी भाषणे केले. माजी संमेलनाध्यक्ष रमेश मंत्री हे सुमार दर्जाचे साहित्यिक होते व त्यांनी इंदिरा संत यांच्यासारख्या ज्येष्ठ कवयित्रीला अध्यक्षीय निवडणूकीत पराभूत केले, असे सांगताना त्यांनी मतदारांना टीकेचे लक्ष्य केले. मुळात लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मंत्रींवर टीका करणे उपस्थित साहित्यिकांनी अजिबात रूचले नाही.

पण कौतिकरावांनी आपले तारे तोडणे सुरूच ठेवले. 'बाळासाहेब पंतप्रतिनिधी आणि सयाजीराव गायकवाड यांना पैशाच्या हव्यासापोटीच संमेलनाध्यक्ष केले असल्याची शक्यता व्यक्त करताना ठाले-पाटील यांनी या दोन्ही संमेलनाध्यक्षांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. शिवाय, महात्मा फुले यांनी ज्या कारणासाठी साहित्य संमेलनास येण्यास नकार दिला होता त्या कारणाला संपवून फुले यांना अपेक्षित संमेलन भरवूया, असा शहाजोग सल्लाही भाषणाच्या अखेरीस दिला.
दरम्यान, सांगली येथील संमेलनात यशवंतराव चव्हाण यांच्यावर आगपाखड केल्यानंतर ठाले-पाटील यांना जाहिर दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. बेताल व्यक्तव्य करणार्‍या ठाले-पाटलांना आता अध्यक्षपदावरून हाकलून द्यावे, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली, तर महामंडळच बरखास्त करावे, असा विचारही या संमेलनात व्यक्त होताना दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi