Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकभावनेपुढे माघार – डॉ. आनंद यादव

मधुसूदन पतकी

लोकभावनेपुढे माघार – डॉ. आनंद यादव
WD
संत तुकारामांबद्दल मला नितांत आदर आहे. म्हणून त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे नाव संतसूर्य तुकाराम असे ठेवले. सामान्य व्यक्ती संत पदालाच नव्हे तर संतसूर्यपदाला कशी पोचली हे दाखण्याचा प्रयत्न मी केला आहे. या संदर्भात मी वारकरी मंडळींशी चर्चा करुन त्यांच्या शंकेचे निरसन करायला तयार आहे, असे प्रतिपादन महाबळेश्वर येथील ८२ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी केले.

संतसूर्य तुकाराम महाराज या त्यांनी लिहिलेल्या कादंबरीवरील काही मजकुरावर वारकरी संप्रदायाने आक्षेप घेतला. त्यासंदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. यादव म्हणाले, संत तुकाराम सर्वसामान्य कुटूंबातले होते. स्वतःला तपासत, स्वतःच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी सत्याचा शोध घेतला. ही शोधयात्रा त्यांना सामान्य व्यक्ती ते संतसूर्य पदाला घेऊन गेली. माझ्या मनात जगद्गुरु तुकारामांबद्दल त्यामुळेच आदर आहे. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी मी हे पुस्तक लिहिले.

वाल्याचा वाल्मिकी होणे हा त्याचा अर्थ आहे. लेखनातील भावार्थ, व्यंगार्थ व वाच्यार्थ यांची गफलत केल्यामुळे माझ्या लेखनाचा चुकीचा अर्थ काढला गेला. एका सर्वसाधारण, प्रापंचीक व्यक्तीच्या मनातील भावविश्व, त्याचे विचार, भावनिक गुंतागुंत आणि मानसिकता याचे चित्रण कादंबरीच्या माध्यमातून मी केले आहे. तुकाराम महाराजांचे सूर्य होत जाणे त्यातून स्पष्ट केले आहे. त्याच तुकारामांची निंदा, अपमान करण्याचा उद्देश अजिबात नाही. याबाबत मी वारकरी संप्रदायाच्या मान्यवर व्यक्तिशी चर्चा करायला तयार आहे. माझे म्हणणे, विचार पटवून देईन त्यातूनही त्यांना ते पटले नाही तर विचाराअंती जे ठरवले जाईल त्यास सामोरे जाण्यास माझी हरकत असणार नाही. मात्र निर्णय त्यांनी कोणताही घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करावी.

कादंबरी हा माझा आवडता लेखन प्रकार आहे, असे सांगून डॉ. यादव म्हणाले, कादंबरीची व्याप्ती मोठी आहे. स्थळ, काळ, व्यक्तीचा बारकाईने अभ्यास करुन त्याचे स्वभावचित्रण तपशीलवार करता येते. कादंबरीतील घटना, व्यक्तीरेखा गुंतागुंतीच्या असतात. ते एक प्रकारचे स्वतंत्र विश्व असते. ते पेलणे, शब्दात चितारणे खरोखर अवघड काम आहे. झोंबीच्या लेखनानंतर माझी मानसिक अवस्था ''मोकळे झाली'' अशी होती. झोंबीनंतर ''तुम्हाला आता कसे वाटते?'' या प्रश्नावर मी '' मला आता संपून जावेसे वाटते '' अशी प्रतिक्रिया दिली होती. याचे कारण मनात साठलेले, ठसठसत असलेले सगळे आतून झाले होते.

सृजनालकतेच्या प्रसव वेणानंतर आलेला तो थकवा होता. असा थकवा येण्याचे कारण म्हणजे कादंबरीत गुंतून जाणे हे होय. कादंबरी लिहिताना सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक इ. अनेक बाबींचा विचार व अभ्यास करायला पाहिजे. थोडक्यात कादंबरी वटवृक्षासारखी असते तर कथा नारळाच्या झाडासारखी सरळसोट असते. आजच्या पिढीत कादंबरीचे शिवधनुष्य उचलणारा कादंबरीकार क्वचितच एखादा आहे. हेही खेदानी नमूद करावेसे वाटते.

हल्ली वाचक कमी झाला आहे. वाचन संस्कृती लोप पावत आहे. वाचनापेक्षा द्रक्‌, श्राव्य माध्यमांकडे ग्रामीण भागातला युवक आकर्षित होत असून शहरी भागातील युवक चैनी व व्यसनाधिन होत आहे, ही बाब गंभीर असल्याची परखड प्रतिक्रिया डॉ. यादव यांनी व्यक्ती केली. मराठी भाषा आणि वाचक टिकवण्याचे काम ग्रामीण भागच करत आहे. ग्रामीण लेखक खिशातले पैसे घालून पुस्तके काढतात. त्यांच्या व्यथा, वेदना अक्षरबध्द करतात. परंतु शहरी भागात हा प्रकार दिसत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांशी शहरी लेखकांचा संबंध नाही. नियतकालीके कमी झालीत त्यामुळे लेखकांवर मर्यादा आल्या. नवे लेखक कमी झालेत आणि आहेत ते चौकटीत रममाण झालेत. आजही ७०% टक्के जनता ग्रामीण भागाशी निगडीत आहे. त्यांचे जीवन साहित्यात येत नाही तोपर्यंत खर्‍या अर्थाने मराठी मातीतली वाङमय निर्मिती होणार नाही.

'संतसूर्य तुकाराम' या पुस्तकातील मजकुरासंदर्भात वारकरी सांप्रदायाने आक्षेप घेतला होता. गेल्या आठवडापासून याबाबत विविध ठिकाणी आंदोलने सुरु होती. पुस्तकातील मजकूर वगळावा व डॉ.यादव यांनी जाहीर माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. या मागणीचा विचार करुन यादव यांनी पुणे येथे पुस्तक मागे घेतल्याचे जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली.

खालील रकान्यात आपली प्रतिक्रीया देण्यास विसरू नका...

Share this Story:

Follow Webdunia marathi