हिवाळ्यात हौसेने घेतलेले स्वेटर-मफलर-शाली नंतर कपाटात जातात. पण त्यांची काळजी घेतली नाही तर मात्र या महागामोलाच्या स्वेटरवर बुरकुलं येतात, घाणेरडे वास येऊ लागतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा दुकान पाहावं लागतं. तसं होऊ नये म्हणून काय करता येईल?
१. लोकरीचे कपडे वापरताना प्रत्येक वापरानंतर या कपड्यांवर ब्रिस्टल ब्रशफिरवून घ्यावा. यामुळे लोकरीच्या कपड्यांच्या टाक्यांमध्ये अडकलेली धूळ-कचरा साफ होतो. यामुळे या कपड्यांवर पांढरे-मळकट बुरकुलं धरत नाहीत.
२. लोकरीच्या कपड्यावर कसलाही डाग पडला तर तो कपड्यामध्ये जिरण्याआधीच घालवावा. तो जर पटकन निघण्यासारखा असेल तर ते कपडे त्वरित धोब्याकडे डड्ढायक्लीनला द्यावे. या कपड्यांमध्ये डाग जिरले तर ते न निघण्याइतके चिवट होतात.
३. काही प्रकारच्या लोकरीच्या कपड्यांवर ओन्ली ड्रायक्लीन अशी सूचना लिहिलेली असते. फक्त तेच कपडे ड्रायक्लीनला द्यावे. ज्या कपड्यांवर अशी सूचना नसते, ते कपडे सरळ घरी धुवावेत. गरज नसताना लोकरीचे कपडे डड्ढायक्लीन केले तर ते खराब होतात. आणि घरी कपडे धुताना खरंच धुण्याची वेळ आली आहे का? याची खात्री करून घ्यावी. गरज नसताना वारंवार धुतल्यास लोकरीच्या कपड्यांचं आयुष्य कमी होतं.
४. लोकरीचे कपडे धुण्यासाठी बाजारात खास जेंटल डिटर्जंट म्हणजेच सौम्य प्रकारची धुण्याची पावडर मिळते. तीच वापरावी. यामुळे लोकरीच्या कपड्यांचा मऊपणा जात नाही.
५. लोकरीचे कपडे धुऊन वाळवताना एक काळजी अवश्य घ्यावी. कपडे पाण्यातून काढून लगेच वळणीवर वाळत घालू नयेत. मुळातच लोकरीचे कपडे खूप पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे ते जड होतात. ते तसेच वळणीवर टाकले तर त्या जडपणामुळे त्यांचा आकार बिघडू शकतो. लोकरीच्या कपड्यांचे टाके ढिले होतात आणि म्हणूनच ती वाळत घालताना सपाट जागेवर पसरवून ठेवावी.
६. लोकरीचे कपडे धुतल्यानंतर उन्हात वाळवू नयेत.
७. धुतलेले कपडे कपाटात ठेवताना ते पूर्ण सुकले आहेत ना... याची खात्री करून घ्यावी. लोकरीच्या कपड्यात थोडाही ओलसरपणा शिल्लक राहिला तर ते कपाटात ठेवल्यानंतर त्यांना लवकर कसर लागते.
८ स्वेटर-मफलर-शॉल इस्त्री करताना आधी त्यावर थोडं पाणी शिंपडून कपडे जरा ओलसर करून घ्यावे. इस्त्री करताना इस्त्री वूलनवर सेट करून मगच कपड्यावर फिरवावी.
९. स्वेटर-मफलर-शाली कपाटात ठेवताना आधी ते ठेवण्याच्या जागी डांबर गोळ्या ठेवाव्यात. लोकरीचे कपडे कपाटात हँगरला लटकवून न ठेवता ते व्यवस्थित घडी घालून ठेवावेत.