Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तारुण्य टिकवण्यासाठी विमानात बसून हवेतच उडत राहण्याची कल्पना कशी वाटते?

तारुण्य टिकवण्यासाठी विमानात बसून हवेतच उडत राहण्याची कल्पना कशी वाटते?
-ख्रिस लॅनोट
आईनस्टाईन यांनी एकदा म्हटलं होतं की, जर तुम्ही अतिवेगाने उडत असाल तर काळ मंदावेल. म्हणजेच जर तुम्ही सतत अतिवेगाने उडतच राहिलात तर तुमचं वय वाढणार नाही.
 
अर्थात, अशी थिअरी आहे. त्यामुळच जर तुम्हाला टाईम ट्रॅव्हल करायचं असेल, भूतकाळात उडी मारायची असेल तर तुम्हाला कृष्णविवरात उडी मारावी लागेल.
 
माझ्या सर्वात आवडत्या प्रयोगांपैकी एक म्हणजे जेव्हा आईनस्टाईनची थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी तपासण्यासाठी दोन घड्याळं विमानाने जगप्रवासाला पाठवली होती.
 
1971 सालची गोष्ट आहे ही. शास्त्रज्ञ जोसेफ हाफेले आणि रिचर्ड किटिंग यांनी अणु घड्याळं घेतली. ही घड्याळं अत्यंत अचूक असतात. फक्त एका सेकंदाने मागे पडायला या घड्याळाला तब्बल 3 कोटी वर्षं लागतात.
 
ही घड्याळं त्यांनी जेट विमानात ठेवली. त्यातलं एक विमान पश्चिम दिशेला पाठवलं आणि एक पूर्व. दोन्ही विमान आपआपल्या दिशनेने जगाची प्रदक्षिणा करून परत वॉशिंग्टन डीसीला आली. मग प्रयोगशाळेत या घड्याळांची वेळ तपासण्यात आली.
 
तिथे त्यांची वेळ आणि जमिनीवर असलेल्या तशाच प्रकारच्या घड्याळांमध्ये दिसणाऱ्या वेळेची तुलना केल्यावर लक्षात आलं की हवेत अतिवेगाने उडणाऱ्या घड्याळांच्या वेळेत अतिसुक्ष्म का होईना पण फरक पडला आहे.
 
या प्रयोगातून सिद्ध झालं की वेळ वैश्विक नाहीये. आधी जसं कोणत्याही स्थितीत, भौतिकशास्त्राच्या कोणत्याही टप्प्यात वेळ बदलत नाही असं वाटत होतं तसं नाहीये. जेवढ्या जास्त वेगाने तुम्ही प्रवास कराल त्या प्रमाणात काळ तुमच्यासाठी मंदावेल.
 
मंदावलेल्या काळाचा कालावधी अतिसूक्ष्म असला तरी काळ मंदावेल हे नक्की.
 
उदाहरणार्थ- तुम्ही अटलांटिक समुद्र ओलांडणारी न्यूयॉर्क ते लंडन अशी फ्लाईट घेतलीत तर तुमच्या साठी सेकंदाच्या दहा लाखाव्या भागाइतका काळ मंदावेल. हा काळ सर्वसामान्यांनी मोजण्याच्या पलिकडे असला तरी तुम्ही घरात राहिले असता जेवढा काळ पुढे जाईल त्या तुलनेत कमी काळ पुढे गेलेला असेल.
 
मग समजा तुम्ही प्रकाशाच्या वेगाने आयुष्यभर पृथ्वीभोवती घिरट्या घालत राहिलात तर तुम्ही चिरतरुण राहाल का?
 
कदाचित नाही, तेव्हाही तुमचं वय वाढत असेलच, पण पृथ्वीवर असणाऱ्या लोकांच्या तुलनेत फारच कमी गतीने.
 
म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या विसाव्या वर्षी हा प्रवास सुरू केला आणि 5 वर्षं प्रवास करून ती व्यक्ती परत पृथ्वीवर आली तर तेव्हा कदाचित पृथ्वीवर पन्नास वर्षांचा कालखंड उलटला असेल.
 
थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचं एक भाकित असंही आहे की, गुरुत्वाकर्षणाचाही प्रभाव काळवर होतो. जसं जसं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाच्या बाहेर तुम्ही निघता, तसं तसं काळ आणखी वेगाने जातो. याच परिणाम आपल्या शरीरावरही होतो.
 
आपलं डोकं जमिनीपासून पर्यायाने गुरुत्वीय बलापासून उंचावर असतं त्यामुळे आपल्या पायांच्या तुलनेत आपल्या डोक्याचं वय जास्त असतं.
 
आता परत पायाच्या आणि डोक्याच्या वयातला फरक हा सेंकदाच्या एक हजार किंवा लाख कोटीव्या भागाइतका असू शकतो, पण तरी दोन्हीच्या काळात फरक असतो हे खरंच.
 
काळाच्या या फरकाचा मानवी शरीरावर काही फरक पडत नसला तरी अवकाशात उपग्रह सोडताना मात्र याचा विचार करावा लागतो नाहीतर उपग्रहाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तरीही पृथ्वी एक लहानसा ग्रह आहे. प्रचंड मोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातला एक छोटा बिंदू.
 
कृष्णविवराच्या जवळ गेलं आणखी वेगळे परिणाम पाहायला मिळू शकतात. कृष्णविवरांचं गुरुत्वीय बल इतकं तगडं असतं की ते शेजारून जाणाऱ्या भलामोठ्या ग्रहालाही खेचून घेऊ शकतात. इतकंच नाही, याच्या गुरुत्वीय बलाच्या कचाट्यातून प्रकाशही सुटत नाही, म्हणून त्याला 'कृष्णविवर' म्हणतात.
 
कल्पना करा की, तुम्ही कृष्णविवराकडे ओढले जाताय. म्हणजे सध्यापुरतं आपण गृहीत धरू की कृष्णविवरात गेल्यानंतरही तुम्ही सपाट, चपटे होणार नाही. कारण तिथल्या गुरुत्वाकर्षणामुळे चारी बाजूंनी गोष्टी ओढल्या जातात आणि त्यावेळेस दाबल्या जातात. त्यामुळे तिथे तुमचा अगदी पातळ पापुद्रा होईल.
 
पण तरी आपण असं गृहीत धरू की तुमचा पापुद्रा होणार नाही.
 
तुम्ही जसं कृष्णविवराकडे ओढले जाल तसं तुम्हाला काळाच्या गतीत काही फरक पडलेला जाणवणार नाही. तुमच्या आसपासच्या गोष्टींही तशाच असतील. काळाची गती ना वाढलेली असेल ना कमी झालेली.
 
पण जेव्हा तुमच्या स्पेसक्राफ्टची उपकरणं वापरून तुम्ही पृथ्वीकडे पाहाल तेव्हा तुम्हाला एक वेगळीच गोष्ट दिसेल. तिथल्या गोष्टी वेगाने होत असतील. जणूकाही कोणीतरी पृथ्वीला फास्ट फॉरवर्ड केलंय.
 
तुम्हाला पृथ्वीवर भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसतील. सूर्याचा स्फोट होऊन त्याने पृथ्वी आणि संपूर्ण सूर्यमाला गिळण्यापर्यंत तुम्हाला सगळं काही दिसेल. पण याचा वेग प्रचंड असेल.
 
आता याच्या उलट कल्पना करा. म्हणजे तुमची जागा बदलली आहे. तुम्ही कृष्णविवरात नाही तर त्या पासून काही सुरक्षित अंतरावर प्रदक्षिणा मारत आहात आणि कृष्णविवराच्या आत पाहात आहात.
 
तुम्हाला दिसतं की कृष्णविवराजवळ तुमचे सहकारी खेचले जात आहेत. ते जसेजसे जवळ जातील तसा त्याचा वेग मंदावत जाईल, खरं तर त्यांच्यासाठी काळाचा वेग मंदावला आहे. ते तुमच्याकडे बघून हात हलवत असतील तर त्यांच्या हात हलवण्याचा वेग हळू हळू कमी होत जाईल.
 
याच संकल्पनेचा इंटरस्टेलर चित्रपटात वापर केला होता. यात असं दाखवलं होतं की अंतराळवीर कृष्णविवराजवळच्या एका ग्रहाचा अभ्यास करायला जातात. पण ते पृथ्वीवर परत येतात तेव्हा कळतं की त्यांच्याशिवाय तिथलं आयुष्य खूप पुढे गेलंय.
 
त्यांची मुलं आता म्हातारी झाली आहेत पण ते आहे त्याच वयाचे आहेत.
 
या चित्रपटात मांडलं होतं की ‘काळ’ नावाची कोणतीही अचूक संकल्पना नाही. कोणतीही वेळ ‘बरोबर’ किंवा ‘चुकीची’ नाही. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीही हेच सांगते की काळ सापेक्ष आहे.
 
कृष्णविवरात ओढले जाणारे अंतराळवीर शेवटी इव्हेंट हॉरॉयझन क्रॉस करतील. म्हणजे ती सीमा ज्यापुढे प्रकाशही निसटू शकत नाही. याला ‘पॉईंट ऑफ नो रिटर्न’ असंही म्हणतात. इथून मागे फिरता येणार नाही. आता अंतराळवीर पुढे पुढे फेकले जातील कृष्णविवराच्या केंद्राकडे.
 
आता त्याचे काळाबद्दल असणारे सगळे अनुभव फोल ठरतील. तिथे काळाची संज्ञा काहीतरी वेगळीच असेल. कदाचित कृष्णविवराच्या केंद्रात पोचलेले अंतराळवीर भूतकाळ, भविष्यकाळ असा प्रवास करू शकतील.
 
असं कसं? आपल्या सामान्य जीवनात आपण तीन मितींमध्ये वावरत असतो, यात अवकाश स्थिर असतं आणि चौथ्या मितीत न थांबता प्रवास करत असतो. चौथी मिती म्हणजे काळ.
 
पण कृष्णविवराच्या इव्हेंट हॉरॉयझॉनमध्ये वेगळ्याच गोष्टी घडत असतात. तिथे अंतराळवीरासाठी काळ स्थिर असतो पण अवकाश बदलत असतं. त्यामुळेच काही लोकांना वाटतं की तिथे असणारे अंतराळवीर टाईम ट्रॅव्हल करू शकतात. तसं म्हटलं तर मग कृष्णविवर एक टाईम मशीन आहे. त्यातून मागे मागे म्हणजे अगदी कृष्णविवराच्या जन्मापर्यंत मागे काळात प्रवास करता येऊ शकतो.
 
पण यात एक अडचण अशी आहे की कृष्णविवरातून बाहेर पडण्याचा रस्ता नाही. त्यामुळे भविष्यातला कोणताही टाईम ट्रॅव्हलर ही युक्ती वापरून आपल्याला भेटायला येऊ शकत नाही. पण काय घडू शकतं आणि काय नाही हे समजून घेतलं तर आपल्याला अनेक नव्या गोष्टी कळतील हे नक्की.
 
पुढच्या वेळी घड्याळाला विमानात बसवून जगप्रदक्षिणेला पाठवावं लागणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Amla in Winter हिवाळ्यात आवळा खाण्याचे अनेक फायदे, आयुर्वेदानुसार त्याचे सेवन कसे करावे जाणून घ्या