प्रचंड गर्मीमुळं काही घरांमध्ये एअर कंडिशनर (एसी) मध्ये स्फोट होत आहेत. उष्णता वाढलेल्या काही भागांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आलीय.
या घटनांमुळे एसीचा सुरक्षित वापर कसा करावा आणि दुर्घटना घडल्यास सुरक्षिततेचे कोणते उपाय करावे, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये गुरुवारी (30 मे) एका सोसायटीमध्ये आग लागली होती. एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या स्फोटामुळं फ्लॅटमध्ये आग लागल्याची दृश्य त्या दिवशी दिवसभर माध्यमांमध्ये झळकत होती.
बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
गेल्या काही दिवसांत निवासी आणि व्यावसायिक इमारतींचा विचार करता, 10-12 एसीच्या स्फोटाच्या घटना घडल्याची माहिती नोएडा फायर ब्रिगेडचे अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली.
यापूर्वी 27 मे रोजी मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील एका फ्लॅटमध्ये अशाप्रकारची घटना घडली होती. या घटनेत तर संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला होता.
काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात व्हीके न्युरोकेअर रुग्णालयात एसी कॉम्प्रेसर फुटल्यानं आग लागली होती.
का होत आहेत AC स्फोट?
अशा स्फोटांपासून कसे वाचवणार?
या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करुया.
वाढते तापमान धोकादायक
एसीच्या स्फोटाचा संबंध तापमान वाढीशीही आहे.
यामागची शास्त्रीय कारणं जाणून घेण्यासाठी आम्ही आयआयटी बीएचयूच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक जाहर सरकार यांच्याशी बोललो.
सरकार यांनी बीबीसीच्या अरशद यांच्याशी बोलताना म्हटलं की, एसीनं खोली थंड होण्यासाठी बाहेर असलेल्या कॉम्प्रेसरच्या आसपासचं तापमान त्याच्या कंडेनसरच्या तापमानापेक्षा सरासरी 10 अंशांनी कमी असायला हवं.
साधारणपणे भारतात वापरल्या जाणाऱ्या एसी कंडेनसरचं तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. जर बाहेरचं तापमान कंडेनसरच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर एसी व्यवस्थित काम करत नाही.
अशा स्थितीत कंडेनसरवरील दबाव वाढत जातो. त्यामुळं कंडेन्सरच्या स्फोटाची शक्यता वाढते,असं प्राध्यापक सरकार म्हणाले.
का होतात एसीचे स्फोट?
वाढलेल्या तापमानाबरोबरच एसीच्या दुर्घटनांमागं इतर कारणंही असतात.
गॅस गळती : तज्ज्ञांच्या मते कंडेनसरमधून गॅसची गळती हेदेखिल अशा दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरू शकते.
जस-जसा गॅस कमी होत जातो, तसा कंडेन्सरवरचा दबाव वाढत जातो. त्यामुळे ते अधिक गरम होतं. परिणामी आग लागण्याची शक्यता वाढते.
कॉईलवरील धूळ : एसी कंडेन्सर कॉईल कुलिंग प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतात. ते हवेतून उष्णता दूर करतात.
कॉईल खराब झाली किंवा धुळीनं माखली तर गॅसच्या पुरवठ्याची समस्या निर्माण होते. त्यामुळं कंडेन्सर जास्त गरम होते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते.
व्होल्टेजमध्ये चढ-उतार : व्होल्टेजमध्ये वारंवार चढ-उतार झाल्यास त्याचा कॉम्प्रेसरच्या कामावर परिणाम होतो. त्यामुळे दुर्घटना घडू शकते.
स्फोट कसा टाळता येईल?
तापमान वाढल्यास एसीचा कॉम्प्रेसर सावलीत असेल, याची काळजी घ्यावी.
कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर युनिटच्या जवळ हवा खेळती असायला हवी. चांगली हवा असेल तर ते जास्त गरम होत नाही
एसीची सर्व्हिसिंग नियमितपणे करावी. तसं केल्यास काहीही अडचण असली तर ती वेळीच दुरुस्त होते.
एअर फिल्टर आणि कुलिंग कॉइल नियमितपणे स्वच्छ कराव्या. तसं केल्यानं कॉम्प्रेसरवर जास्त ताण येत नाही.
कुलिंग फॅनही वेळो-वेळी तपासत राहावा. त्यात काही अडचण असल्यास ती लगेचच दुरुस्त करावी.
AC खरेदी करतानाही काळजी घ्या
तज्ज्ञांच्या मते, तांब्यापासून तयार करण्यात आलेले एसी अॅल्युमिनियमच्या कंडेन्सरच्या तुलनेत अधिक महाग आहेत.
तांब्याची पाणी किंवा हवेबरोबर प्रतिक्रिया होत नाही. त्यामुळं ते जास्त प्रमाणात प्रतिरोधक म्हणून काम करतं.
ताबं लवकर तापत नाही. या गुणामुळंच ते तापल्यानंतर लवकर थंडही होतं. त्यामुळं तज्ज्ञ अॅल्युमिनिअम एसीच्या तुलनेत तांब्याच्या एसीला प्राधान्य देतात.
Published By- Priya Dixit