माझ्यासमोर माझा एक विद्यार्थी राहातो. आता तो पुण्यात एका कंपनीत चांगल्या हुद्यावर चांगल्या पगारावर नोकरीला आहे आणि सध्या लग्नासाठी मुली पाहतो आहे. त्याचे अनुभव मी ऐकले आणि सारं काही लिहायला घेतलं.
प्रत्येक रविवारचा दिवस. वेळ दुपारी एक वाजल्यापासूनची. हॉटेल वाडेश्वर. तिथे म्हणे लग्नाची मुलं-मुली यांचा ताफ्याच्या ताफा येतो. मुलं-मुली तीन तीन तास बसतात. एकमेकांच्या आवडीनिवडी घरदार, नोकरी किंवा इतर काही प्रश्न विचारतात आणि मग म्हणे लग्नाचे निणर्य घेतात. येथपर्यंत मला सारे ठीक वाटले. पण पुढे त्या मुलाने सांगितले. अशा मुली हॉटेलमध्ये येतात. दोन बिसलरी बाटलीपाठोपाठ मेनूकार्ड मागवतात. मुलाला विचारतात, तू काय घेणार? मग स्वत:ला बरेच काही मागवतात. भरपूर बिल करतात आणि जाताना सांगतात, माझा निर्णय दोन दिवसांनी कळवते. मग नकार द्यायचा आणि पुढच्या रविवारी दुसरा मुलगा पाहायचा, असा त्यांचा उद्योग सुरू असतो. हा मुलगा म्हणाला, बाई, आतापर्यंत माझे चार-पाच हजार रुपये हॉटेल बिलावर गेले आणि मी फक्त कॉफी प्यायचो म्हणे. ऐकावे ते सगळे अजबच. मी म्हटलं, तू सुद्धा तिला नुसतीच कॉफी मागवाचीस ना. तर म्हणाला, त्या आपल्याला विचाराच्या आधी एवढी मोठी ऑर्डर देऊन मोकळ्या होतात. जाताना आधी बाहेर पडायचं. बिल मी भरतो आहेच. एकवेळ अशी होती की, एका मुलीने तासा तासाच्या अंतराने चार मुलांना त्या वाडेश्वर हॉटेलमध्ये बोलावले होते. त्या चारपैकी ती एकाला निवडणार होती.
मुलींची संख्या घटली आहे म्हणून मुलं बिचारी हैराण झाली आहेत. मुली शिकल्या, नोकरी करत आहेत. कधी कधी मुलांपेक्षा त्यांच्या पगाराचे आकडे अधिक आहेत. त्यांना व्क्तिस्वातंर्त् आहे. त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडणचे स्वातंर्त् तंना आहे. पण जोडीदार निवडताना प्रश्न कोणते विचारावे, हॉटेलचे बिल किती करावे हे तारतम्य बाळगावे. एखाद्या मुलाकडून जेवणंच जेवणं उकळायची, कधी कधी आई-वडील, भाऊ-बहीण या सगळ्यांना घेऊन हॉटेलात भेटायचं अन् बिल त्या मुलाने भरायचे. लग्न जसं मुलाला हवं आहे तसं मुलीला नको का? एकजण तर म्हणाली, एका सीटिंगमध्ये काय कळतं. दोन तीनवेळा आपण हॉटेलमध्ये भेटू. आपले विचार जर जुळतील असे वाटले तर आई वडिलांपर्यंत पोहोचू. मग दोघांच्या घरातील लोक एकमेकांची ओळख करून घेतील आणि लग्नाचं ठरवतील. तो आमचा विद्यार्थी हताश झाला. कारण हॉटेलची बिलं भरून खाऊन-पिऊन गेलेल्या मुलीकडून होकार राहोच पण नकाराचाही फोन येत नाही. या मुलानेच पुन्हा निर्णयासाठी फोन केल्यावर सांगायचे, योग नाही.
या मुलाचे आई-वडील मुलीचं स्थळ बघत नाहीत असं नाही. पण विशेषत: पुण-मुंबईतल्या मुलींना-मुलांना एकटय़ाला भेटायचे, अनेक प्रश्न विचाराचे असतात. ते प्रश्न कोणते? स्वत:चा फ्लॅट आहे का? असल्यास कर्जाचे सर्व हप्ते भरले आहेत का? बहिणींच्या लग्नाची जबाबदारी आहे का? बँक बॅलन्स किती आहे? पैसे आणखी कुठे कुठे गुंतवले आहेत? नोकरी लागून किती वर्षे झाली? प्रमोशन आहे का? नाहीतर आहे त्या पगारावर राहणारा मुलगा आहे का? फॉरेनला जाणार का? तशी संधी आहे का? चार चाकी गाडी आहे का? भविष्यात जास्त पगार दुसर्या कंपनीत मिळाला तर ही नोकरी सोडणार का? समजा मुलगी पुण्यात आहे तर मुंबई सोडून मुलगा पुण्यात येणार का? नानाविध प्रश्नांची सरबत्ती मुली करतात. एकीने विचारले, घरात माणसं किती? कोण कोण कुठे राहणार? नातेवाईकांचा राबता नाही ना. मला जास्त माणसांची सवय नाही. लोकांची वर्दळ चालणार नाही. सणवार होणार नाही. सोवळं-ओवळं जमणार नाही. आईवडिलांना सांभाळायला जमणार नाही. देवपूजा पोथ्या जमणार नाही. अजून काय काय. त्या मुलाने हे सारं खरं रूप- वास्तव दर्शन घेतले आहे. आता तुम्हीच सांगा. या मुलांच पुढे केवढी प्रश्नावली आहे. या समस्यातून मुलाला सुटायचे तर फ्लॅट हवा, डिग्री हवी, नोकरी हवी, चांगला पगार हवा, धाकटा भाऊ नको, बहीण नको, आई वडील नको फक्त बायकोसाठी बदलायला हवं. कशी जीवनशैली- कसे विचार आणि कशा मुली? आता तो विद्यार्थी निराशेच्या गर्तेत आहे.