Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुखी संसाराची गुरुकिल्ली

- प्रकाश दांडेकर

सुखी संसाराची गुरुकिल्ली
मी नाताळच्या सुटीमध्ये आपल्या मामांकडे मुंबईला गिरगावात मोहन बिल्डिंगमधल्या चाळीमध्ये काही दिवस राहायला आलो होतो. 

मामा सकाळी नोकरीवर निघून जायचे. संध्याकाळी घरी आल्यावर आम्ही सर्व मामा, मामी, मामाचे मुलं व मी चौपाटीवर फिरायला जायचो.

मामाच्या खोलीसमोरच एक तीस-पस्तीस वर्षाचा तरुण राहायचा. तो सकाळी नऊ वाजताच घरून निघून जायचा व रात्री आठ वाजेपर्यंत घरी परत यायचा. घरी आल्यावर बायको वर चीडचीड करायचा. मुलांवर छोट्या छोट्या गोष्टीसाठी संतापायचा. दोन एक दिवसाआड मुलांना झोडपूनही काढायचा. एकंदरीत घरातले वातावरण तो घरी आल्यावर अशांत व्हायचे. कधी कधी शेजारी-पाजारी पण मध्ये पडायचे. पण त्या गृहस्थावर त्याचा काहीही परिणाम होत नसे. तो असा का वागतो याची उत्कंठा मला वाटू लागली. म्हणून मी एक दिवस त्याच्या मागे मागे गेलो. तो एका कापडाच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होता. तिथे त्याचा मालक त्याच्यावर सारखा ओरडत असे. त्याला मधून-मधून शिव्या घालतं असे. आता मला या गोष्टीचा उलगडा झाला, की तो या सर्व गोष्टींचं फस्ट्रेशन आपल्या बायको आणि मुलांवर काढीत होता.

एक दिवस आश्चर्यकारकरित्या बदल झाला. तो घरी आल्यावर बायकोशी प्रेमाने बोलला. मुलांना चाकलेट घेऊन दिली.इतकं थकून आल्यानंतर सुद्धा बायको मुलांना बगिच्यात फिरायला घेऊन गेला.

मला काही कळेना. मी पुन्हा दुसर्‍या दिवशी त्या तरुणाचा पाठलाग केला. तो त्याच कापडाच्या दुकानात काम करत होता. त्याचा मालक त्याच्यावर तसाच ओरडत होता. शिव्या पण घालत होता. तो चुपचाप सर्व सहन करत होता.

नंतर संध्याकाळी घरी परतताना एका बगिच्यात गेला. तिथे त्याने खिशात ठेवलेला आपल्या मालकाचा फोटो काढून ठेवला व त्याला खूप शिव्या घातल्या. शेवटी त्याने आपल्या पायाच्या चपलाने त्या फोटोला बदडून काढले.

इतकं करून त्याने चुपचाप सिगरेट ओढली. मन हलकं करून तो घरी परतला.घरच्या लोकांशी प्रेमाने वागू लागला. मला मनुष्य स्वभावाचे एक वेगळेच दर्शन घडले होते. नोकरीमध्ये घडलेल्या गोष्टींचे फस्ट्रेशन आपल्या घरच्या लोकांवर काढायचे नाही ही सुखी संसाराची गुरुकिल्ली त्याला सापडली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi