Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीचं इनाम

दिवाळीचं इनाम

डॉ. भारती सुदामे

''वहिनी, यावेळेस नक्की देणार असाल परीक्षा, तरच फॉर्म आणते. विद्यापीठाला डोनेशन देणं बस झालं की.'' वन्सबाई म्हणाल्या. मी हसून होकारार्थी मान डोलावली. गेली दोन वर्षं म्हणजे चार परीक्षांच्याबाबतीत असं झालं होतं खरं. परीक्षेचा फॉर्म आणायचा, भरायचा, अभ्यासही करायचा आणि परीक्षा देता यायची नाही. काही ना काही अडचणी यायच्या.

'खरंच, किती पैसे वाया घालवतो आपण नुसते फॉर्म भरण्यापायी. मनात आलं, आज शक्य आहे, पैशाची ओढाताण नाही म्हणून हे चोचले. नाहीतर...' हा 'नाहीतर' खूप मागे घेऊन गेला. थोडीथोडकी नाही तब्बल सदतीस वर्षे मागे...

NDND
''आई पंधरा तारखेच्या आत कसा गं फॉर्म भरणार? बघ बाई, नाहीतर नको भरूस या वर्षी.'' ''नाही गं! असं एक-एक वर्ष घालवून कसं चालेल? आधीच गेलं वर्षभर ट्रेनिंग झालं. पण आता ताबडतोब पैसे आणायचे तरी कुठून?''

अख्ख्या घरातल्या प्रत्येक सजीव-निर्जीवानं एकमेकांना नि स्वत:ला विचारलेला प्रश्न? पुलगावच्या कॉटन मिल्सच्या प्रायमरी शाळेतली नोकरी. महिन्याचा पगार एकशे पंचाहत्तर रुपये. त्यातून मागच्या आठवड्यात पासष्ट रुपयऍडव्हान्स उचललेला. पंचवीस रुपये घरभाडं द्यायचं. उरलेल्या पैशातून 60 रुपये फॉर्मचे भरले तर मग महिनाभर काय करायचं?

शिवाय धाकट्या बहीण-भावंडांच्या शाळा. नातेवाईकांना तरी कितीदा पैसे मागायचे? अन् का? मनात आलं - आपल्याला इतरांसारखं कॉलेजमध्ये जाऊन शिकता येत नाही, ठीक आहे. हौसमौज नाही, हरकत नाही. पण साधा परीक्षेचा फॉर्म भरण्यातही एवढ्या अडचणी? यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. एखादी अर्धवेळ नोकरी नाहीतर शिकवण्या.

''अग झोप. आज कितीवेळ विचार करत बसशील अशी दारात?'' आई म्हणाली अन् आत गेली. कितीतरी वेळ मी दारात पायरीवर बसून होते. घर मालकीणबाई रात्री दहा वाजता मेन स्विच ऑफ करीत. सगळ्यांच्या घरी अंधार. पायरीवर बसलं की समोरच्या म्युन्सिपालटीच्या दिव्याचा उजेड येई. उजवीकडच्या गल्लीतून हवा अन् हवी तेवढी शांतता.

webdunia
NDND
दुपारी साडेचार वाजता शाळेतून आले तो घरी तानाबाई बसलेल्या. तानाबाई आमच्या शेजारी राहायच्या. आमची दीड खोली सिमेंटची होती अन् त्यांचं लाकडी खोपं होतं, मातीनं लिंपलेलं. तरी भाडं महिना आठ रुपये. बर्‍याच घरी भांडी घासणार्‍या तानाबाईचं मुलाशी अन् सुनेशी कायम भांडण. 'ह्या घरी आल्यात म्हणजे सून घरी दिसतेय्' मी तर्क बांधला अन् त्यांना म्हटलं-

''काय तानाबाई, मंदा गेली नाही वाटतं मैत्रिणीकडे?''

''गेली की. ती खोपटात र्‍हाती व्हय?''

''मग तरीही तुम्ही घरी आराम न करता आमच्याकडे कशा?'' 'वा गं ताई! सून काय आराम करू देईना का मला? बिशाद हाय का तिची! झिंज्या उपडून न्हाई दे्ल्या हातात न नावाची तानाबाई न्हाय.'

तावातावानं तानाबाई हातवारे करीत म्हणाल्या. त्यांच्या श्वास फुलला, चेहरा
तारवटला अन् घशाच्या नशा फुगून कशातरीच दिसू लागल्या. मला हसू आवरेना. केवढा दु:स्वास सुनेचा!

''आई चहा करतेस?'' मी विषय बदलला.

''हा काय झालाच. आज तानाबाई तुलाच भेटायल्या आल्या आहेत.''

''अरे वा! काय तानाबाई, लिहावाचायला शिकायचं का आजपासून!'' मी पुन: मस्करी केली.

''ताई...'' तानाबाई गंभीर झाल्या. ''काल तुमी मायलेकी बलत व्हत्या नवं म्या ऐकलं समदं. तुमाले शिकायचं हाय अन् फार्माले पैसा नाय म्हंता. आमी आडानी मान्स. चार अक्षवरी पोटात न्हाय. सुनगट हे असलं शिकत न्हाय नकाय बी न्हाय. निस्ती मटकते. पोराचं दुसरं सोंग-दिसभर राब-राब राबतो अन् रातच्याला ढोरावानी पडतो.

लय वाटाचं ताई आपुन शिकावं म्हून, नायतर पोरानं शिकावं- सून शिकेलेली भेटावी, पर नाय आमच्या नशिबी. तुम्ही शिका - म्या गरिबीणं - काल लई वंगाळ वाटलं. काय करावं, काय बी उमजंना- आखिर आज सगळ्या मालकिनींना हात जोडले. म्हन्ल- मले दिवारीचं इनाम आधी द्या. चार घरी भेटलं. ह्ये चार धा रुपे हायत ताई अन् ही माहीवाली चांदीची गरसोळी हाय. तिवारीच्या दुकानात गिरवी ठेवली तं इस रुपे भेटतीन. तुमी फारम भरून टाका. माहे कवा बी वापीस करा. तुमी पास झाल्या त पावले मले.'' एका दमात तानाबाई बोलत होत्या.

आईला ब्रह्मांड आठवलं. माझ्या डोळ्यांना धारा लागल्या. मी कपाळावर हात देऊन मटकन खालीच बसले.

''तानाबाई अहो...'' मी बोलायचा प्रयत्न केला. ''कायबी बोलू नका ताई. तुमी बामन. तुमचं पोट शिकल्याबिगर नाय भरनार. आमचे हात चालतेन- तुमचं डोस्कं. न्हाई म्हनू नका.''

''तानाबाई अजून वेळ आहे. शिवाय आता दिली नाही तर उन्हाळ्यात देईन मी परीक्षा. होऊन जाईल काहीतरी सोय तोवर. मी नक्की शिकेन. ठेवा ते पैसे.''

''न्हाय ताई. म्या पैसे वापीस न्हाय नेनार.''

''बरं - मलाच द्या. पण आधी मला शाळेची परवानगी तर घेऊ द्या. त्यांनी परवानगी दिली की घेईन मी तुमचे पैसे.''

कशीबशी तानाबाईंची समजूत घालून मी त्यांना परत पाठवलं. रात्रभर मी अन् आई टक्क जाग्या होतो. छोट्या-छोट्या घरातल्या चर्चा लहान गावात सहज बाहेर जात. लोक त्यांचं भांडवल करीत, अफवा पसरवीत आणि प्रचंड मनस्ताप होई. पण आज... आज भिंतींच्या कानांनी केवढे मोठे आशीर्वाद आणले होते.

तानाबाईंचे पैसे घ्यायची गरज पडली नाही. मुलांच्या वार्षिक परीक्षेचं कारण सांगून शाळेने परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारली. ऑक्टोबरच्या परीक्षेचा फॉर्म भरेस्तोवर पैशांची सोय झाली. शिकवण्या, आईचा गृहउद्योग, स्वेटर विणून देणं वगैरेंनी साथ दिली.

तानाबाई हिरमुसल्याच होत्या. ''आम्ही गरीब. आमाले शिंक्षण नाय अन् आमच्या कष्टाचा पैसा बी शिक्षणाच्या कामी नाय आला.'' त्या म्हणाल्या होत्या.

त्यांच्या समजुतीखातर मी त्यांच्याकडून चाळीस रुपये घेतले. त्यांनी ऑक्टोबरपासून मेपर्यंत जपून ठेले होते. त्यात भर घालून फॉर्म भरला अन् जवळचे पैसे पुढच्या महिन्यात 'मामीची मनीऑर्डर आली' असं सांगून त्यांना परत केले. माझ्या रिझल्टचा त्यांना झालेला आनंद इतका होता की, मी प्री-युनिव्हर्सिटी नव्हे, तर जणू बी. ए., एम.ए. पास झाल्यासारखा.

खरं सांगते- त्यानंतरच्या सगळ्या परीक्षा मी ऑक्टोबर सेशनलाच दिल्या. एकदाही परीक्षाचा फॉर्म भरताना पैशाची अडचण आली नाही. अगदी ज्या परीक्षा दिल्या नाहीत- त्यांच्या फॉर्मासाठीदेखील.

Share this Story:

Follow Webdunia marathi