Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिनातिकट

बिनातिकट

डॉ. भारती सुदामे

'' मँडम, विदर्भ एक्सप्रेसला चव्वेचाळीस वेटिंग चाहे. सेवाग्राम देऊ का?'' तिकिटाच्या खिडकीतून विचारणा झाली अन् मी भानावर आले.
''अं.... त्याच तारखेचं का?''
'' आधीच्या दिवशीचं पण आहे, कोणचं देऊ''?
'' आदल्या दिवशीचंच द्या. साईड लोअर बर्थ.''
''तीनशे पाच रुपये.''
पैसे देऊन तिकीट घेऊन मी रांगेच्या बाहेर आले. भिंतीलगतच्या एका खुर्चीवर बसले. तशी रिझवर्हेशनची रांग फारशी मोठी नव्हती. मी खूप वेळापासून उभीही नव्हते. विशेष दमले होते अंसही नाही. पण बरेचदा असं होतं. रेल्वेच्या रिझर्व्हेशनच्या रांगेतून बाहेर आले की खूप उदास होते.

हातपाय गळल्यागत होतात, घशाला कोरडं पडते. विशेषत: जेव्हा दादर एक्सप्रेसचं तिकीट काढते तेव्हा तर हमखास.
हो, त्यावेळी या गाडीचं नाव 'दादर एक्सप्रेस' असंच होतं. रोज अप-डाऊन करणार्‍यांसाठी 'फॉट्टी अप' नागपूरहून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सुटायची, वर्धेला साडेअकराला यायची अन् पुलगावला बारा वीसला पोहोचायची.

मी तेव्हा पुलगावला राहून वर्धेला नोकरी करीत होते. तेव्हा गाड्या तीनच. ट्वेंटीनाईन डाऊन- थर्टी अप-हावरा एक्सप्रेस', 'वन डाऊन-टू अप हावरा मेल' आणि 'दादर एक्सप्रेस' बाकी दोन भुसावळ पॅसेंजर्स. तेव्हा रोज, आमचं थर्टीनाइन डाऊन आणि फॉट्टी अप.'

मधे एकदा नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्तानं नागपूरला यावं लागलं. तारीख-महिना आठवत नाही, पण साल होतं एकोणविसशे अडुसष्ट. नुकतीच अठरा वर्षे पूर्ण झाल्याने सरकारी नोकर्‍यांसाठी वणवण चालू होती. जणू काय त्या नोकर्‍या माझ्या सज्ञान होण्याचीच फक्त वाट बगत होत्या. असो. सकाळी नागपूरला आले, मुलाखत झाली आणि दुपारी आत्यांना भेटायला गोकुलपेठेत गेले.

थोड्या वेळात अचानक रेडिओवरून आणि रस्त्यारस्तयावरून रिक्षातून घोषणा सुरू झाल्या- 'शहरात दंगल उसळली आहे. नागपूरच्या विविध भागात कर्फ्यू लागला आहे. लोकांनी बाहेर पडू नये।'

मी हतबल. इथून स्टेशन कितीतरी लांब. आत्याकडे, मला स्टेशवर पोहोचवून द्यायला कोणी नाही. कर्फ्यू किवा दंगल किती वेळ चालेल काही अंदाज नाही. रात्री घरी परतणं आवश्यक होतें. दुसर्‍या दिवशी सकाळी शाळेत जायचं होतं-वर्धेला. कसेबसे दुपारचे चार वाजले. बातमी आली - 'दोन तासांसाठी कर्फ्यूमध्ये सूट दिली आहे. लोकं आपापली आवश्यक कामे करू शकतात.'

तडक निघाले नि धरमपेठच्या दिशेने चालू लागले. शुक्रवार बाजारातून जेमतेम लक्ष्मीभुवन चौकात पोहोचत होते. तोच तोच पुन: गोंधळ, पळापळ, आरडाओरड. लोकांनी थोड्याच वेळासाठी उघडलेली दुकानं फटाफट बंद करायला सुरुवात केली. मी काय करू? कुठं जाऊ? 'बॉम्बे बांगडी स्टोर्स' हे जुनं ओळखीचं दुकान.

WD
लहानपणापासून तिथं जात आलेले, त्याच्याकडे कामही केलेलं. तिथं धावले. काका ... काका म्हणत हाका मारल्या. दुकानदारांनी दार उघडलं. नव्हे, किलकिलं केलं. तब्बल पाच वर्षांनंतर ते मला बघत होते. कुठ सातव्या वर्गात शिकणारी, फ्रॉकमधली शाळकरी मुलगी अन् कुठं आता नोकरी करणारी शिक्षिका... कसं ओळखणार होते ते मला? पर त्यांनी ओळखून दार उघडलं, चटकन आत घेतलं. प्यायला पाणी दिलं आपुलकीनं विचारपूस केली, मी जरा आश्ववस्त झाले.

तासामागून तास जात होते. दुकानात आम्ही तिघचं. काका, मी अन् त्यांच्या पोरसवदा नोकर. बाहेर काही सुरळीत होण्याचं लक्षण दिसेना. सध्याकाळचे साडेसात वाजत आले. काही सुचत नव्हतं. मधूनमधून कोणीतरी काहीतरी बोलून मनावरचा ताण हलका करायचा दुबळा प्रयत्न करीत होते.

'तू थोडावेळ इथंच थांब. मी तुझ्या जेवणाची सोय बघतो.' काका म्हणाले अन् मला जाणवलं आपल्याला खूप भूक लागली आहे. सकाळपासून अक्षरश: काही ही खाल्लेलं नव्हतं. काका नोकराला घेऊन गेले. दुकानात आता फक्त मी. प्रचंड भीती, एकाकीपणा, अस्वस्थता, असुरक्षितता. मनात नाही नाही ते वाईटच विचार, घरी पोहोचण्याची काळजी, सगळ्या गोष्टी नुसत्या थैमान गालीत होत्या. काका केव्हा आले, त्यांनी माझ्यासाठी काय आणलं होतं, मी काय जेवले, काहीही समजलं नाही.

साडेआठ वाजले आणि कर्फ्यूमध्ये थोडी शिथिलता जाहीर झाली. आम्ही मागच्या दारानं बाहेर आलो. दोनचार रिक्षावाले चौकात होते. रेल्वेस्टेशनवर यायला कोणीही तयार होईना. काकांनी बराच प्रयत्न केला तेव्हा एक रिक्षावाला कसाबसा तयार झाला. माझ्या तर संवेदनाच बधिरल्या होता.

'' तो जितके मागेल तितके पैसे दे.'' काकांनी म्हटलं. मी यांत्रिकपणे मान डोलावली. असहाय मानत विचार आला. 'जवळ फक्त पाच रुपयाची नोट आहे. वर्धेपर्यंतचं तिकीट काढायचं आहे. पुढचा पास असला तरी वर्धेपर्यंत तर तिकीट काढावं लागेल.' मनातल्या दडपणामुळे रिक्षावाला कुठून नेतो आहे तेही समजत नव्हतं.

मातामंदिर, धरमपेठ पेट्रोल पंप, व्हेराटी चौक, पटवर्धन हायस्कूल - रस्त्यात लोकांचे जथ्थे. दहशतीचं वातावरण. या अशा भलत्या दिवशी, भलत्या वेळी-एकटी मुलगी रिक्षात बघून लोकांचे विस्फारलेले डोळे, हलकी कुजबूज-सगळं नुसतं जाणवत होतं. काहीही विचार करणं शक्य नव्हतं. ती शक्तीच जणू शिल्लक नव्हती. स्टेशनवर पोहाचले तेव्हा स्टेशनच्या घड्याळात पावणेदहा वाजले होते.

रिक्षातून उतरले. पाच रुपयाची नोट रिक्षावाल्याच्या हातात ठेवली अन् दीनपणे शब्द जुळवत जुळवत म्हटलं- ''यातले दोन रुपये द्या हो मला पुलगावला जायचंय्. वर्धेपर्यंत ति‍कीट काढावं लागेल.''

''बादमें क्या करोगी?'' प्रश्न आला अन् मी रिक्षावाल्याकडे बघितलं. जाळीचा गंजीफ्रॉक, निळी पॅट अन् जाळीची क्रोशाची टोपी घातलेला तो एक मध्यमवयीन मुस्लिम माणूस होता. माझा श्वास वरचा वर तर अन् खालच्या खाली अडकला. आता यांन जास्त पैसे मागितले तर? माझ्या डोळ्यापुढे आंधारी यायला लागली.

''मेरे पास छुटे नही है! लो बेटी, ये पैसे अपने ही पास रखो. काम आएंगे- और अब टिकट कब कटाओगी? ट्रेन छुटने को है- चलो मेरे साथ.''
मी मंतरल्यासारखी त्याच्या मागे निघाले, स्टेशनवर पाय ठेवायला जागा नाही अशी स्थिती. त्यात आर. एम. एस.च्या ऑफिसकडून मला प्लटॅफॉर्मवर नेलं.

बायकांच्या डब्यात बसवलं, म्हणाला, '' डरना नही आज गाडी में टी.सी. नही आने वाला वर्धा तक तो किसी भी हाल में नही. आये तो पेनॉल्टी भर देना. पाच रुपये में हो जाएगा. '' काही बोलायच्या आत तो दृष्टिआड झाला. मी वेंधळल्यासारखी, खांद्यावर पर्स, हातात पाचची नोट अन् पायात येणारी साडी सावरत उभी. मनावर प्रचंड दडपण.

अंगाला दरदरून घाम फुटलेला, पाय लटपटत होते. गाडी सुटेपर्यंत डब्याच्या दिशेने येणारा प्रत्येक माणूस टी.सी भासत होता. एकदाची गाडी सुटली. मी आयुष्यात पहिल्यांदी, शेवटचा बिनतिकीट प्रवास केला. नागपूर ते वर्धा.

''कशाला आली एवढ्या दंगलीत वेड्यासारखी एकटी? तुला मामाकडे जाता नाही आलं?'' ही रामकहाणी ऐकून आई कडाडली.
माझ्या मनात येत होतं - ' ही पाचची नोट आपल्याला आयुष्यभर जपून ठेवता येईल का?''

Share this Story:

Follow Webdunia marathi