Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Touching Truth भिंती पलीकडचं नातं

आमच्या लहानपणी भिंती फक्त घरांना विभागायच्या…
मनांना नाही…
या भिंतीवर टेकून कितीतरी गप्पा रंगायच्या…
“आज काय भाजी केली?” पासून
“मन खूप अस्वस्थ आहे गं…” पर्यंत…
एका घरात चूल पेटली की वास दुसऱ्या घरात जायचाच…
एका घरात दुःख आलं की डोळे शेजाऱ्यांचेही पाणावायचे…
आणि आनंद आला की सगळा वाडा हसायचा…
त्या काळी दारं बंद नव्हती…
मनं उघडी होती…
आमच्या वाड्यात तर संध्याकाळ झाली की सगळ्या बायका अंगणात किंवा अशाच एखाद्या भिंतीवर टेकून उभ्या राहायच्या…
कोणाच्या हातात निवडायची भाजी…
कोणाच्या हातात विणकाम…
तर कोणाच्या मांडीवर छोटं बाळ…
गप्पा रंगायच्या…
हसणं यायचं…
कधी एखादीच्या डोळ्यात पाणीही यायचं…
पण ती एकटी कधीच नसायची…
“काळजी करू नको गं… सगळं ठीक होईल…”
हे वाक्य त्या काळी औषधासारखं होतं…
एखाद्या घरात पाहुणे आले की भांडी शेजारातून यायची…
सण आला की फराळ एका घरात बनून चार घरांत वाटला जायचा…
आणि एखादी बाई आजारी पडली की तिच्या मुलांना दुसऱ्या घरात जेवायला बसवलं जायचं…
रक्ताची नाती नसली तरी माणुसकीची नाती खूप घट्ट होती…
आज आठवतं…
आई कधी कधी शेजारच्या काकूशी भिंतीवरून तासन् तास बोलायची…
विषय काही विशेष नसायचा…
पण मन हलकं व्हायचं…
त्या काळी “मेंटल हेल्थ” हा शब्द माहिती नव्हता…
पण माणसं एकमेकांना ऐकून घ्यायची…
म्हणून कदाचित मन इतकी तुटत नव्हती…
आता सगळं बदललं…
मोठमोठे फ्लॅट आले…
दरवाजांवर डिजिटल लॉक आले…
पण माणसांच्या मनांवरही कुलूप पडलं…
आज शेजारी कोण राहतं हे माहिती नसतं…
आणि माहिती असलं तरी संवाद फक्त
“पार्सल आलंय…”
किंवा
“गाडी बाजूला घ्या…”
इथपर्यंतच राहतो…
पूर्वी घरं छोटी होती…
पण मनं मोठी होती…
आता घरं मोठी झाली…
पण माणूस आतून एकटा होत चाललाय…
मोबाईलमध्ये हजारो contacts आहेत…
सोशल मीडियावर शेकडो लोक जोडलेले आहेत…
पण मनापासून विचारणारं —
“काय गं… ठीक आहेस ना?”
हे विचारणारं माणूस मात्र कमी झालंय…
किती साधं आणि सुंदर होतं ना ते जगणं…
ना मोबाईल…
ना स्टेटस…
ना “ऑनलाईन” असण्याची धडपड…
पण तरीही माणसं एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित होती…
खऱ्या अर्थाने…
कधी कधी खरंच वाटतं…
पुन्हा एकदा असं जुनं जगणं मिळावं…
एखादं छोटंसं घर असावं…
बाहेर अंगण असावं…
आणि मध्ये अशीच एक भिंत…
जिथे आपण मन मोकळं करावं…
हसावं…
रडावं…
आठवणी सांगाव्यात…
आणि समोरून कोणीतरी फक्त प्रेमाने विचारावं —
“काय गं… ठीक आहेस ना?” 

- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरीरात Vitamin B12 कमी झाल्याचे दिसतात ७ धोकादायक लक्षणे