Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवीची ओटी

देवीची ओटी
, शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (13:16 IST)
देवीची ओटी
 
"मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बस ने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये..."
 
"हो सासूबाई.."
 
"आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना.?"
 
"हो पण..परत एकदा सांगता का, चेक करून घेते.."
 
"किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल...तूप घे एका डबीत..देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि नारळ.. थोडीशी फुलं... आलं का लक्षात??"
 
"हो हो सासूबाई.."
 
नीरा आज ऑफिस ला उशिरा जाणार होती, महत्वाची मिटिंग होती त्यात नीरा चे sugestions वापरण्यात येणार होते...पण सासूबाईंचा हट्ट...
 
नीरा आणि सूरज नोकरीनिमित्त फ्लॅट मध्ये रहात होते...सासर 30 किमी वर होतं... देवीची ओटी भरायची म्हणून सासूबाई गावच्या मंदिरात जाणार होत्या, सूनबाईनेही ओटी भरावी म्हणून त्यांनी तगादा लावला..नीरा ने सासूबाईंच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांना प्राधान्य दिलं आणि तयारीनिशी ती निघाली..धावपळ बरीच झालेली तिची...
 
अखेर ती बस पकडून मंदिरात पोचली, सासूबाई तिचीच वाट बघत होत्या..
"हे काय?? ड्रेस वर आलीस?? साडी तरी घालायची..."
"अहो आई इथून सरळ ऑफिस ला जायचं म्हणून.."
"काय बाई आजकालच्या मुलींना देवाधर्माचं काही कळत नाही..बरं चल ओटी भरून घेऊ.."
 
दोघीजणी आत गेल्या...तिथे एक वृद्ध पुजारी होते...देवीसमोर ओटी ठेवली की ते घेत असत..आणि आत गाभाऱ्यात देवीला ठेवत..
 
त्यांना पाहून नीरा हसली, त्यांनीही प्रतिसाद दिला..
"तुम्ही ओळखता काय एकमेकांना??"
"हो...आम्ही.."
"ते जाऊदे, गुरुजी ओटी भरून घ्या देवीला.."
 
सासूबाई तिला तोडत म्हणाल्या... सासूबाईंनी साग्रसंगीत एकेक वस्तू परंपरे प्रमाणे देवीला वाहिली... नीरा गोंधळून गेली... तिला काही समजेना नक्की काय करायचं..
"आधी हळद कुंकू वाहा... अगं हे बोट नाही, त्या बोटाने.. आता अक्षता.. आता साडी ठेव, त्यावर पाच मुठा तांदूळ... एक मूठ परत घे... नारळ दे..."
 
नीरा सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत होती..सासूबाई मधेच ओरडल्या..
"अगं ही कुठली साडी?"
"मी दिवाळीत काही साड्या घेतलेल्या, ही काही वापरत नाही मी.."
"अगं एक दीड हजार ची साडी आहे ती... देवीला साधी 100 रुपयाची साडी द्यायची असते.. अरे देवा.. दिवाळी काढणार ही मुलगी... आणि हे तुप कुठलं?"
"घरी कढवलेलं..."
"अगं दिव्यासाठी बाजारातून स्वस्तातलं तूप आणायचं... आणि ह्या बांगड्या??"
"माझ्याच... नवीन घेतलेल्या, पण वापरल्या नाहीत.."
 
सासूबाई डोक्याला हात लावतात... देवीला हात जोडतात, "देवी माते... सुनबाई अजून नादान आहे, तिची चुकी माफ कर, आणि ओटीचा स्वीकार करून आम्हाला पाव बाई.."
 
गुरुजी सगळं बघत असतात, हे सगळं बघून म्हणतात..
"देवी तुम्हाला नाही पण तुमच्या सूनबाईला पावेल हो.."
"काय?"
 
"होय... तुम्ही पूजा करताना स्वस्त, टाकून दिलेल्या, आपल्याला उपयोगात नसलेल्या वस्तू देवाला वाहतात, पण तुमच्या सुनेने घरी काढवलेल्या तुपाचा दिवा लावला, तिचीच एक साडी देवीला दिली, स्वतःच्याच बांगड्या देवीला दिल्या... देवीला तुम्ही जे अर्पण करता त्याच्यामागचा भाव हवा असतो.. तुमचा मोह तूप, साडी, बांगड्यांत आहे... पण तुमच्या सुनेने कसलाही मोह न धरता स्वतःच्याच वापरातील एक भाग काढून देवीला दिला... हेच महत्वाचं असत... एखादा लहान मुलगा आपला आवडता खाऊ खात असताना एक घास हळूच आईला भरवतो तेव्हा आईला किती कौतुक वाटतं, तेव्हा उष्टा घास भरवला म्हणून आई रागवत नाही... तसंच आहे हे... आणि देवीला मिळालेल्या चांगल्या वस्तू मी अनाथाश्रम मध्ये देऊन येतो, तुमच्या सुनेशी तिथेच भेट झालेली, ती दर महिन्याला तिथे देणगी देऊन येते..."
 
सासूबाईंना खूप वाईट वाटलं, देवाधर्माचं करत नाही म्हणून आपण सूनबाईला किती बोललो, पण खऱ्या अर्थाने तीच खरी भक्ती करतेय..आपण फक्त स्वार्थीपणाने मोहात अडकून यांत्रिक पूजा करतोय याची त्यांना जाणीव झाली.
 
साभार: सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

King And The Old Man Story : मराठी बोध कथा : राजा आणि वृद्ध माणूस