Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनातला पाऊस

vitthal
, मंगळवार, 12 जुलै 2022 (11:20 IST)
।।मनातला पाऊस॥
 
काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 
 
अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.
 
पहाटे साडेतीन च्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला)
 
पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे. 
 
कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 
 
काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 
“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 
“मग?”
“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”
“मग तुम्ही काय केलंत?”
“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”
“मग आता?”
“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”
 
त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 
“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 
 
ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”
 
“मग काय, पैसे कमवू नयेत का?”
“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”
“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 
“ पण, ती फसवतीलच हे कशावरून?”
मी पुन्हा सपशेल आडवा. 
 
“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”
शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 
 
“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 
मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 
“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. 
 
“तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 
“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 
“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”
आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 
“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 
 
“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”
त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Side Effects of Onion:तुम्ही पण जास्त कांदा खाता का? जाणून घ्या त्याचे नुकसान