हातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत होता. दहावीच्या परीक्षेनंतर तो अपघात ! आता संपूर्ण आयुष्य अंधारमय. किती स्वप्न बघितली होती! जीव द्यावासा वाटायचा आणि.. मग ताईकडे शिकायला येणे. आयुष्यच पालटले. तीच म्हणाली होती "अरे, तू आजवर हे जग बघितले आहे, तू कल्पना तरी करू शकतो. पुन्हा बघू शकतो. जे जन्मापासून आंधळे आहेत, कधीच बरे होवू शकत नाही, त्यांचा विचार कर!! आपल्या आई बाबांचा विचार कर. बी पॉझिटिव्ह अमोल! तू अभ्यासाकडे लक्ष दे. १२वीची परीक्षा दे. नकारात्मक विचार मनात आणू नको. तू नक्की बरा होशील...."
विचारांच्या घोळक्यातून बाहेर पडत, हातातल्या काठीने चाचपडत अमोल मेघाजवळ आला,
"मेघा ताई, घे, पेढे खा..." . त्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता.
"काय रे! आज चक्क पेढे!! 12वीचा निकाल तर लागू दे."
"अग ताई, तू शिकवलंय. पास तर मी नक्कीच होणार पण आज एक आनंदाची बातमी आहे."
"अरे वा...!!"
"ताई, माझे डोळ्याचे ऑपरेशन करणारे आय स्पेशालिस्ट आले आहेत भारतात. १५ दिवसानंतर ऑपरेशन. मी परत हे जग बघणार....!!" अमोल उत्स्फूर्तपणे बोलत होता.
"काय सांगतोस काय! अरे वा! अभिनंदन अमोल. मला केवढा आनंद झाला आहे, मी...कसं...! "मेघाचा कंठ दाटून आला."
ताई, थँक्यू...! माझी तर जगण्याची इच्छाच मेली होती, पण तूच आयुष्यावर पुन्हा प्रेम करणे शिकवले. ताई, तुझ्याजवळ आलो की पॉझिटिव्ह व्हेव्स येतात. तू कशी नेहमी उत्साही! तू टीचर आहे का मनोवैज्ञानिक?" अमोल अस्खलित बोलत होता.
"अरे बस्स! किती हा कौतुक सोहळा!" मेघा त्याला थांबवत म्हणाली, "बरं सांग, बरा झाल्यावर सर्वात आधी काय करशील? तुझी 'फर्स्ट विश'?"
"ताई, आपण नेहमी ह्याच खोलीत भेटलो. मला नं...तुझा हात धरून ..डोंगरावर जाऊन पहिल्या श्रावणसरीत चिंब भिजायचंय...तू नेहमी म्हणतेस नं, "जस्ट ड्रीम एँड वन डे ऑल युअर ड्रीम्स विल कम ट्रू.."
"हो. मी आजही हेच म्हणेन. माणसाने कधीच आशा सोडू नये. यू नेव्हर नो..." एक दीर्घ श्वास घेत.. तिच्या व्हीलचेअरला बघत मेघा उत्तरली.