Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माया

माया
, मंगळवार, 9 मार्च 2021 (13:23 IST)
अथांग पसरलेला सागर. क्षितिजापलीकडील किनाऱ्यावर काहीतरी भव्य-दिव्य असल्याची जाणीव झालेला एक तरुण, समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या एका वृद्ध नावाड्याला आपल्या मनाला झालेल्या 'त्या' जाणीवेविषयी खातरजमा करतो. नावाड्याचे सकारात्मक उत्तर ऐकून आपली तिथे जाण्याची तीव्र इच्छा तो नावाड्याशी व्यक्त करतो. तो वृद्ध नावाडी लांब खुंट्याला बांधून ठेवलेल्या एका छोट्या नावेकडे बोट करतो आणि त्याला प्रवासासंबंधीच्या सर्व गोष्टी नीट समजावून देतो आणि त्यातील एकही गोष्ट विसरायची नाही अशी समज देखील देतो. शेवटी, प्रवासामध्ये अगदीच अघटित काही जर घडलंच, तर माझ्या नावाने जोराने हाका मार, असं सांगून तो वृद्ध नावाडी त्याला शुभेच्छा देतो.
 
कधी एकदा त्या पैलतीरावर जाऊन पोहोचतो आणि ते ऐश्वर्य उपभोगतो ह्या तीव्र इच्छेपोटी तो तरुण लगबगीने त्या नावेत जाऊन बसतो. दुसरा कोणताही विचार न करता, लगेच झपाझपा वल्ही मारायला सुरुवात देखील करतो. लक्ष फक्त उसळणाऱ्या लाटांवर आणि पैलतीरावर...काही काळ जातो. हळूहळू थकवा जाणवू लागतो. पण काहीही झालं तरी वल्ही मारणं थांबवायचं नाही, पैलतीर गाठायचाच, ह्या निश्चयाने तो वल्ही मारणं सुरूच ठेवतो. पण आता शरीर थकायला लागलं होतं. हाता-पायात गोळे येऊन अंगाचा थरकाप उडत होता. रात्र समोर ठाकली होती. दृष्टीपथात आता पैलतीर तर सोडाच, काहीच दिसत नव्हतं. सर्वत्र नुसता अंधारच अंधार ! त्याच्या मनात 'आपण काही चुकलो तर नाही ना ?

अशी शंकेची पाल चुकचुकते. आणि शेवटी न राहावल्याने, जिवाच्या आकांताने तो नावाड्याला हाका मारायला लागतो.
"अरे, काय झालं बेटा ?" असे त्या वृद्ध नावाड्याचे प्रेमळ शब्द त्या तरुणाच्या कानावर पडतात. आश्चर्याने तो मागे वळून पाहतो, तर तो नावाडी अगदी जवळ किनाऱ्यावरच रेतीवर बसला होता. त्या वृद्ध नावाड्याने हळूवार विचारलं, "अरे वेड्या, खुंट्याला बांधलेली दोरी नाही का आधी सोडायची ? तू दोरी सोडलीच नाहीस ..... आणि वल्ही मारतोयस खुळ्यासारखा ! नाव पुढं जाईल कशी ?"
 
आता ह्या गोष्टीचं मर्म लक्षात येऊ लागलंय. अथांग सागर म्हणजे ....आपलं जीवन ... अस्थिर, अडचणींच्या लाटा संकटांचे भोवरे असणारा कधी संशयाचे मत्सराचे वादळी वारे तर कधी आल्हाददायक सुखाची झुळूक.. तरी पण अथांग अंतहीन...तो उतावळा तरुण म्हणजे साधक अर्थातच आपण. वृद्ध नावाडी म्हणजे सद्गुरु.. पैलतीर म्हणजे आपल्या पारमार्थिक जीवनाचं उद्दिष्ट अर्थात, 'अंतिम लक्ष्य' ....खुंटा म्हणजे अहंकार "स्वत्व"...मी पणा ...वल्ही मारणं म्हणजे उत्तम आचरण .. ! आणि सर्वात महत्त्वाचं,  ती दोरी म्हणजे माया ....
 
ही मायेची दोरी जोपर्यंत आपण अहं च्या खुंट्यापासून सोडून, निष्ठेने आणि विश्वासाने सद्गुरुंच्या इच्छेनुसार आचरण घडवत नाही नामस्मरण करीत नाही तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचणं कठीण आहे.

-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RBI ने असिस्टेंट मॅनेजरसह या पदांसाठी निघाल्या आहेत भरती, 10 एप्रिलपर्यंत करता येईल अर्ज