Article Marathi Stories %e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5 %e0%a4%b9%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95 %e0%a4%ac%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be 108061200028_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनुभव हक्क बजावण्याचा

- अरुणा सबाने

अनुभव हक्क बजावण्याचा
ND
एका नातेवाईकांकडे लग्नाला म्हणून मध्यप्रदेशात जायची पहिल्यांदा संधी आली. मे महिन्याचे रणरणरतं उन्हं. खरे तर या अशा अंग अक्षरश: भाजून निघेल अशा उन्हात कितीही जवळचे लग्न असले तरी जायची अजिबात इच्छा नसते. पण अनेक गोष्टी इच्छा नसूनही केवळ कर्तव्यपोटी कराव्याच लागतात. मध्यप्रदेशातील माझा हा पहिलाच प्रवास. त्यामुळे त्या बसेस कुठून सुटतात, त्याचे वेळापत्रक काय वगैरे सगळी माहिती जाणकाराकडून करून घेतली आणि दुसर्‍या दिवशी 'अगदी पहाटेची पहिलीच 'कॅपिटल' दोन पोरांसह धावपळ करीत पकडली. पाच वाजचा निघणारी गाडी म्हणून पावणेपाचलाच आम्ही बस स्टँडला पोहचलो. बरोबर पावणेसहाला गाडीसाठी तिकीट विक्री सुरू झाली. गाडीत अगदी गच्च गर्दी. पाय ठेवायला जागा नाही, एकदाच्या तिकिट्‍स दिल्यात. आधीच गाडीत भरपूर घाण. जिकडे तिकडे कचरा, शेंगांची टरफलं, केळीच्या साली, कागद, भज्यांचे तुकडे, वगैरे सर्वत्र पसरलेले. बहुधा तिकडे आदल्या दिवशी पाऊस येऊन गेला असावा. गाडीत जिकडे तिकडे चिखलाची घाण. माशा घोंघावत होत्या.
'काय घाण गाडी आहे' कुणीतरी म्हणाले.
'असल्या गाडीतून प्रवास करायचं म्हणजे दिव्यच.'
'गाडी इथूनच सुटते ना?'
'होय'
'मग गाडी साफ नको कां करायला?'
लोक आपापसात बोलत होते. कंडक्टर अद्याप खालीच होता. ‍तेवढ्यात शेवटच्या बाकड्यावर अगदी कोपर्‍यात बसलेला माझा मुलगा म्हणाला.
'मम्मी इथे ओकारी आहे खुप घाण वाटते'
'खरेच किती घाण आहे. गाडी साफही करून घेत नाहीत मेले. कसा प्रवास करायचा या गलिच्छ वातावरणात' शेजारचा सदगृहस्थ उद्गारला.
'आपण गाडी साफ करून मागायची काय? माझी पृच्छा.
'हो, खरंच आपण गाडी आधी पटकन साफच करून मागू या.' आणखी एकाने माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. सगळ्याच प्रवाशांना गाडी साफ करवून घेण्याची कल्पना आवडली. सगळेच पटापट खाली उतरले, त्यातला एक उत्साही तरुण लगेच Complaint करायला नि स्वीपरला बोलवायलाही गेला. सगळे लोक खुशीत होते कारण10 मिनीटात गाडी साफ करून मिळणार होती. सकाळी सकाळी छान स्वच्‍छ वातावरणात प्रवास करू शकणार होते.
तेवढ्यात कंडक्टर आला.
'हे काय? सगळे खाली कशाला?'
'गाडी साफ होते आहे'
'म्हणजे?'
'गाडीत खूप घाण होती. स्वीपर गाडी साफ करतो आहे'
'तुम्हाला नसते उद्योग कोणी सांगितले?'
'नसते उद्योग काय? खरे तर गाडी आधीच तुम्ही साफ करून घ्यायला हवी होती आणि नंतरच प्रवाशांना तिकीट बुकिंग सुरू करायचं. तुमचं काम आम्ही करतोय, वरून आमच्यावरच डाफरता?'
'तुम्हाला काय इथे संसार थाटायचा आहे? दोन तासाचा प्रवास नि मिजास बघा.'
'अहो राव फालतू बडबड करू नका. दोन तास काय दोन मिनीटसुद्धा थांबण्याच्या लायकीची नव्हती गाडी. पाच-दहा मिनिटात तो गाडी साफ करेल.
'असं का. मग चांगली लख्ख गाडी साफ करून घ्या. दोन तास लागले तरी हरकत नाही, तोवर मी पण चांगली झोप काढून येतो'.


webdunia
ND
कंडक्टर नि ड्रायव्हर दोघेही तिथून चालते झाले. आता हे दोघेही लवकर परतणार नाही, हे स्पष्टच दिसायला लागले होते. परंतु खरेच म्हटल्यानुसार 10-15 मिनिटात गाडी साफ करून झाली. सगळे प्रवासी गाडीत चढलेत आपापल्या जागेवर स्थानापन्न झालेत. पण आता ड्रायव्हरचा, कंडक्टरचा पत्ता नव्हता. अर्धा तास झाला. लोक हाश-हुश करायला लागले. शेवटी एक तरुण ड्रायव्हर, कंडक्टरला बोलवायला गेलाच.
'का? करा म्हणावं अजून गाडी स्वच्छ. तोवर येतो मी चहा पिऊन तासाभरात.'
बिचारा तरुण एवढासा चेहरास करून परत आला.
परत अर्धा तास लोटला, येण्याचं चिन्ह दिसेना. मनातल्या मनात, उगाच आपण गाडी स्वच्छ करायचा विषय काढला, अशी मी स्वत:लाच दूषण देऊ लागले. खरे तर मला 10 च्या लग्नाला हजेरी लावायची होती. 7.30 इथेच झाले. अजूनही गाडी सुटायचे चिन्ह दिसेना. आता उघडपणानेच लोक बोलू लागले.
'दोन-तीन तासाचा तर प्रवास होता. उगाच नसता उपद्व्याप.'
'बसा आता कोकलत, मोठे स्वच्छतेचे भोक्तेच लागलेत किनी'
'या बायांना तर जिथे तिथे घाणच दिसते.'
'अशा लोकांनी खरे तर स्पेशल टॅक्सीतूनच प्रवास करायला हवा.'
'अहो पण मला काय माहीत, कंडक्टर एवढं ताणून धरेल म्हणून.' माझा केविलवाणा बचावात्मक सूर.
'आता कळलंय ना. यानंतर असा आगाऊपणा करू नका' त्यांनी चक्क माझ्या गालफडात एक झणझणीत शाब्दिक थापड लगावली. आमच्या स्वच्छतेची आम्हाला ही अशी बक्षिसी!
सहज स्वच्छता सगळ्यांनाच हवी होती. पण त्यासाठी असे तिष्ठत बसून स्वच्छता कुणालाच नको होती. मी आपला नैतिक हक्क बजावायला गेले, पण मीच तोंडघशी पडले. कारण आमच्या प्रवासाची गाडी आम्हाला स्वच्‍छ करूनच मिळायला हवी. ही त्यांची जबाबदारी आहे. याची जाण माझ्या सहप्रवाशांनाच नव्हती. मी मात्र तिथे चक्क मूर्ख ठरले. कारण माझा हक्क बजावून मी 'आगाऊपणा' केला होता.
आम्हाला आमचे न्याय, हक्क, सहज मिळत नाहीत. म्हणून मग आम्हाला काही हक्क आहेच याचाही कालांतराने विसर पडतो आणि पुढे तर आम्हाला अन्यायाची चीडसुद्धा येईनाशी होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi