मी नारायण ताटके. ग्रॅज्युएट झाल्यानंतर वकील झालो. आता मला नामवंत सिनियर वकिलाच्या हाताखाली कमीत कमी दोन वर्ष काम करायचं होत. त्यानंतर त्यांना माझं काम पसंत पडल्यास मला एखादी केस कोर्टामध्ये प्रोड्युस करायला देणार होते.
एल. एल. बी. चा अभ्यास करताना मला कोर्ट कचेरीबद्दल विलक्षण आकर्षण होतं. खरंच कोर्ट सिनेमामध्ये दाखवतात तसं असत का? एक मोठासा हॉल तिथे पब्लिक बसलेलं. त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या मोठ्या ने ओरडून आपला पक्ष मांडणारे व कोर्टामध्ये हास्य पिकवणारे वकील. प्रत्येक कार्यवाही वर दाद देणारे प्रेक्षक व जास्त गोंगाट झाला तर डोळ्यावर पट्टी बांधलेला न्यायदेवताच्या मूर्तीसमोर हातामध्ये हातोडा घेऊन आर्डर आर्डर म्हणणारे व शांतता कायम करणारे जजसाहेब. खरंच कोर्टाचे दृश्य असं असतं का?
पण मी प्रत्यक्षात पाहिलेलं कोर्ट अगदीच वेगळं होत. ज्याला आपण कोर्ट किंवा हायकोर्ट म्हणतो तिथे मोठे रूम असतात व तिथे प्रत्येक रूममध्ये वेग वेगळे कोर्ट लागतात व त्याचे आपले स्वतंत्र नंबर व स्टफ असतो. इतक्या कोर्टापैकी कुठल्या तरी कोर्टामध्ये आपली केस लागलेली असते. आपल्याला माहिती काढून संबंधित कोर्टामध्ये वेळेवर हजर राहायचं असत.
मी स्वतंत्र व्यवसाय करायच्या आधी काही शिकायला मिळेल या करिता आपल्या शहरातल्या नामवंत एडव्होकेट चिंतामणी गोखले यांच्याकडे कामाला सुरवात केली. जॉइन करतानाच गोखले सर मला म्हणाले - ' हे बघ नारायण तू जरी एल. एल. बी झाला असला तरी अजून कोर्टामध्ये काम कस केलं जातं याचा तुला अनुभव नाही. म्हणून इथे जे काम सांगितलं जाईल त्याला मुकाट्याने प्रतिप्रश्न न करता करायचं. वर्षभर तरी फीस वगैरेची अपेक्षा करायची नाही'. मी 'येस सर' म्हटलो व त्यांच्याकडे काम करू लागलो.
गोखले सर आम्हा नवशिक्या वकिलांना बारीक-सारीक काम सांगायचे. कधी कोणाच्या दाव्याची नक्कल करून आणायची तर कधी स्टॅंप पेपरवर केस टाईप करून आणायचे, कधी कोणाच्या केसची तारीख कोणत्या दिवशी पडते आहे याची रजिस्टरमध्ये नोंद करायची. असली कामं आम्ही करायचो. मला मिळालेले पहिले काम म्हणजे माझे सीनियर एडव्होकेट गोखले यांना एका महत्त्वाच्या केसकरिता जबलपुर हायकोर्टात जायचे होते. तिथे सेशन कोर्टामध्ये त्याच दिवशी एका केसची तारीख होती म्हणून केस पेपर कोर्टासमोर प्रोड्यूस करायचे होते व पुढची तारीख घ्यायची होती. त्याकरीता त्यांनी मला सांगितले, की आपले अशील गणपत पाटील यांच्याकडून रोख तीन हजार रुपये घ्या. मी विचार केला फक्त केस पेपरच तर सबमिट करायचे आहे त्याकरीता लागणारा खर्च म्हणजे टाईपिंगला दोनशे रुपये, पेपरची नक्कल उतरवायला शंभर रुपये व स्टॅंप पेपरचा खर्च जास्तीत जास्त दोनशे रुपये एकंदर पाचशे रुपयाच्या खर्चासाठी अशिलाकडून सहा पट म्हणजे तीन हजार रुपये उकळायचे हे काही मला योग्य वाटेना.
ही शंका मी गोखलेसाहेबांकडे काढली तर ते म्हणाले 'नारायण कोर्ट केचरीच्या कामामध्ये इतका खर्च तर लागतोच. तू मला पाचशे रुपयाचा हिशोब दाखवला पण कोर्टामध्ये आपली केस आधी लावायला चपराश्याला शंभर रुपये द्यावे लागतील. आपल्याला सोयीस्कर अशी पुढची तारीख घेण्याकरिता क्लार्कला पण दोनशे रुपये द्यावे लागतील. शिवाय आपल्या सोयीस्कर तारीखेकरिता समोरच्या वकिलाला राजी करायला त्याला पण तीन-चारशे रुपये द्यावेच लागतील. शिवाय आपल्या ऑफिसचा मेंटेनन्स असतो. इथे पंखे चालतात, वॉटर कूलरचं थंड पाणी पक्षकाराला द्यावे लागते. त्यांना चहा, पान बिडी तंबाखू, सिगारेट सर्व पुरवावं लागतं. हा खर्च आपण कुठून काढायचा. त्यांच्याकडून या गोष्टीचे रुपये मागितले तर त्यांना वाईट वाटेल म्हणून हा खर्च आपण फीसमध्येच लावून घेतो. नारायण तू वकील झाला पण या सर्व गोष्टी तू केव्हा शिकणार? वकिलीमध्ये फक्त आपला स्वार्थ पाहायचा. या गोष्टी तुला अनुभवानेच येतील.
मी गोखलेसाहेबांनी दिलेली केस रितसर कोर्टामध्ये प्रोड्यूस केली, तेव्हा मला कोर्टाचे दर्शन पहिल्यांदा झाले. अकरा वाजेपर्यंत हळूहळू कोर्टामध्ये कारकून व पट्टेवाले येत होते. पक्षकार आणि आरोपी यांनी गजबजलेला कोर्ट परिसर, बहुतेक वकील कोर्ट सुरू व्हायला उशीर असल्यामुळे चहाच्या ठेल्यावर पक्षकाराच्या खर्चाने चहा पीत होते किंवा काही पानाच्या दुकानावर पान तंबाखू खात होते, ज्या वकिलांना कुठलेच काम नव्हते ते बार रूममध्ये लोळत पडले होते.
मी गोखलेसाहेबांनी दिलेली केस प्रोड्यूस करून त्यांना सोयीस्कर अशी पुढची तारीख घेऊन घेतली होती व पक्षकाराकडून पण तीन हजार रुपये एडवांस घेतले होते. माझ्या कामाने गोखलेसाहेब खूश झाले व त्यांनी पहिल्यांदा एक स्वतंत्र केस मला हेंडल करायला दिली.
प्रकरण असं होतं की माझ्या अशील वत्सला देशमुख विधवा होत्या. तिच्या नवर्याने नोकरीत असताना वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क सोडून दिला होता व आता नवरा दिवंगत झाल्यामुळे त्या बाईची परिस्थिती खालावली होती. तिने तिच्या नवऱ्याचा वाटा तिला मिळावा हा दावा लावला होता. पण तिच्या नवर्याचे दोन भाऊ हनुमंतराव व गुणवंतराव हा हक्क द्यायला तयार नव्हते. कारण नवर्याने आपला हक्क सोडला होता व तो आज जिवंतही नव्हता. तेव्हा तिला नवर्याचा हक्क देण्याचा काही प्रश्नच नव्हता.
केसचा मुद्दा अत्यंत कच्चा होता व गोखले साहेबांना या केसमध्ये काहीच दम वाटत नव्हता म्हणून त्यांनी ही केस माझ्यासारख्या नवशिक्या वकिलाला दिली होती. कारण निकाल त्यांच्या मनाप्रमाणे झाला असता तर कमीत कमी 10-15 हजार रुपयाची प्राप्ती त्यांना होणार होती व जर निकाल त्यांच्या मनाप्रमाणे लागला नाही तर अशिलाकडून दोन - तीन हजार उकळून खापर माझ्या डोक्यावर फोडणार होते.
मी केस स्टडी केला. खरंच केस अगदीच कच्ची होती. एका निराश्रित विधवा बाईला न्याय मिळावा या आधारावर मी केस प्रोड्यूस केली असती तर बाई एका नामवंत महागड्या एडव्होकेटच्या असिसटेंट मार्फत केस दाखल करीत आहे यावरून बाईची आर्थिक स्थिती सुदृढ आहे हे जजसाहेबांच्या सहज लक्षात आले असते व पूर्ण केसच ढासळली असती.
योगायोगाने मिळालेली ही संधी मी सहजासहजी हातामधून निसटू देणार नव्हतो.मी रात्रभर आपल्या रूममध्ये टेबल लॅंपच्या प्रकाशात विचार करता करता कितीतरी कप चहा प्यायलो व कितेक सिगरेटची पाकीटे रिकामी केली. शेवटी पहाटे माझ्या डोक्यात एक कल्पना आली व त्याचप्रमाणे केले पाहिजे असा विचार करून मी निवांतपणे झोपून गेलो.
तिसर्या दिवशी केसची तारीख होती कोर्ट सुरू झाल्यावर प्रकरणाची प्रोसेसिंग व हियरींग चालू असतानाच एका वयस्क सावकारासारख्या दिसणार्या मारवाडी गृहस्थाने कोर्टरूममध्ये प्रवेश केला व तो म्हणाला - मला या प्रकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण अर्ज दाखल करायचा आहे व त्याकरिता मी अर्ज फार्म पण भरला आहे व त्याने अर्ज फार्म जजसाहेबांसमोर प्रस्तुत केले. जजसाहेबांनी ते पेपर तपासले व म्हणाले तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगा.
तो गृहस्थ म्हणाला - माझं नावं कूक्कूचंद वेणीचंद मूंदडा, धंदा सावकारी. अर्ज करतो की गुणवंतराव व हनुमंतराव यांचे वडील दिवंगत किशनराव पाटील यांनी नोकरीत असताना शेतीकरिता लागणारा खर्च बीज बियाणे, खत, ट्रॅक्टर यासाठी पन्नास हजार रुपये कर्ज घेतले होत ते आता व्याजासकट सत्तर हजार रुपये झाले आहे. आता किशनराव यांची जमीन व इतर प्रापर्टीचा वाटा गुणवंतराव व हनुमंतराव यांना मिळणार आहे तेव्हा कोर्टाने माझं कर्ज मला देऊनच त्यांना त्यांचा वाटा द्यावा.
हे एकल्यावर दोघे भाऊ एकदम रागाने उठले व म्हणाले बापाच कर्ज आम्ही दोघांनीच का भरावं? प्रापर्टीसाठी दावा लावला आहे ती त्यांचीच सून आहे. ही पण सासर्याचे कर्ज फेडायला बरोबरीची वाटेकरी आहे. मी जजसाहेबांना म्हटल - जर माझं अशील कर्जामध्ये वाटेकरी असतील तर प्रापर्टीमध्ये का नाही? विद्वान जजसाहेबांना माझी बाजू पटली त्यांनी निकाल दिला - फिर्यादी वत्सलाबाईंना त्यांच्या नवर्याचा हक्क बरोबरीने दिला जावा.
निकाल माझ्या बाजूने लागला होता, दावा दहा लाख रुपयाच्या प्रापर्टीच्या वाट्याचा होता. कमलाबाईंना सर्व खर्च काढूनसुद्धा तीन लाख रुपये मिळणार होते. दुसर्या दिवशी त्या गोखले सरांच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या त्या फार खूश होत्या. गोखलेसर आले नव्हते. त्यांनी फीस म्हणून पन्नास हजार रुपयाचा चेक तयार केला व त्यांनी माझ्या सांगितल्याप्रमाणे तो चेक गोखले साहेबांच्या नावाने न देता माझ्या नावाने दिला.
दोन दिवसाने कूक्कूचंद मारवाडी मला भेटला, मी त्याला माझ्या म्हणण्याप्रमाणे कोर्टामध्ये उत्तम नाटक केल्याबद्दल तीन हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. आता मी वकिलीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. गोखले सरांच्या ऑफिसच्या समोरच मी आपलं ऑफिस थाटलं आहे व ऑफिसच्या बाहेर माझ्या नावाचा बोर्ड लागला आहे.
नारायण ताटके एडव्होकेट एल. एल. बी (ऑनर्स) प्रापर्टी केस एक्सपर्ट
आणि माझ्या ऑफिसमध्ये गोखले सरांच्या ऑफिसपेक्षा कितीतरी पटीने जास्त पक्षकारांची गर्दी मी त्याच वकीलपत्र स्वीकारावं यासाठी असते.