दारावरची बेल किती वेळ वाजत होती कोण जाणे, एकदम खडबडून जाग आली नि आपण घरी असल्याचं भान आलं. चटकन उठून दार उघडलं. '' कवा आलात ताई?'' दारात, हसतमुखानं असलेल्या सुनीतानं विचारलं. '' अगं, सकाळीच आले. मी येणार हे सांगितलं नव्हतं का काकांनी?''
''त्यांची माझी दोन दिवसाधरनं भेट नाय बघा. बर्या आहात नव्हं?'' ''हो गं! बरी आहे. बसच्या प्रवासानं अंग आंबून गेलं होतं!'' ''माझ्या येण्यानं झोपमोड झाली नव्हं?''
'' छे गं! उठायचंच होतं. खूप वेळ झाला झोपून. चल, चहा घेतेस?'' '' करा थोडा. गावाकडं सगळी बरी हायेत नव्हं?''
Shreeya
'' हो, बरी आहेत सगळी.'' मी गॅस पेटवता पेटवता बोलले. ''आन तुमच्या शाळेतली समदी खुशाल हायेत नव्हं?''
भांडी मोरीत नेता नेता सुनीता सहज म्हणाली अन् मी थक्क ! अवाक् होऊन तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिले. चार महिन्यापूर्वी माझ्याकडे कामाला यायला लागलेली ही 22-23 वर्षांची तरुणी. दोन मुलांची आई. सतत हसमुख. नवरा एका वर्तमानपत्राच्या ऑफिसात चपराशी. सासू अन् जाऊ रस्ता झाडण्याच्या कामावर. हिला कामाला धाडीत नसत.
माझ्याकडे, 'फक्त मुलांच्या शाळेच्या वेळापुरतीच येते' म्हणून आपण परवानगी दिलेली. सात वर्ग शिकलेली, सावळी, चुणचुणीत, तरतरीत नीटनेटकी. सकाळी कामावर येतानासुद्धा अबोलीचा नाहीतर बकुळीचा गजरा माळणारी, गोड चेहर्याची सुनीता मला फारच आवडली होती. आज तर कायमची वस्ती केली तिनं मनात. गेली चोवीस वर्षे मी शाळेची नोकरी करीत आले. अनेक शिक्षक-शिक्षकांचा, त्यांच्या कुटुंबीयांचा घरापर्यंत वावरही होता.
पण आजवर कधीही कोणीही अपवादानंसुद्धा माझ्या शाळेतल्या लोकांची एवढ्या प्रेमानं, आपुलकीनं चौकशी केली नव्हती. मला खूप बरं वाटलं. जिथं आपण काम करतो, ते आपलं कुटुंबच आहे, हे त्यावेळी प्रथमच प्रकर्षानं जाणवलं. सुनीताच्या विचारण्यानं माझ्या मनात एक नाजूक भावबंध शाळेबद्दल निर्माण झाला. कुठून आलं तिच्याजवळ एवढं शहाणपण? कुठं शिकली हे सगळं ही?
Shreeya
आजवरचं सगळं आयुष्य गोव्यात गेलेल्या या तरुणीला, 'तुमच्या नागपुरात समुद्र नाही?'याचं मोठं नवल वाटायचं. समुद्राशिवाय एखाद गाव असू शकतं, ही कल्पनाच तिला पटेना. शिवाय गाव एवढं मोठ की अख्ख गोवं त्यात मावेल. बहुधा या गावातले लोक एवढे मासे कुठून आणीत असतील, हा तिचा मूलभूत प्रश्न असावा.
हळूहळू सुनीता उकलत गेली, तिचं आयुष्य उलगडत गेलं. तिची आई देवदासी होती. सुनीताच्या जन्मानंतर साथ मिळणं कठीण जाऊ लागलं. शेवटी एका प्रौढ मुस्लिम माणसाजवळ राहिली. 'माझ्या मुलीच शिक्षण करावं लागेल, तिचं लग्नही लावून द्यावं लागेल. ती देवदासी होणार नाही आणि 'हिंदूच राहील' हे त्याच्याकडून वदवून घेतलं.
सुनीताच्या या धर्मपित्यानं आपले शब्द पाळले. सुनीताला शिक्षण दिलं. तिच लग्नही करून दिलं-तिच्या सासू-सासर्यांना आणि नवर्याला तिची सगळी हकीकत प्रामाणिकपणे सांगून. काही वर्षांपूर्वी सुनीताची आई वारली. तीन वर्षांमागे तो उदार धर्मपिताही गेला. सुनीता आता फक्त सासरच्यांचीच आहे. त्यांच्या समाजानं सुनीताच्या सासूला सुनीतावरून अनेकदा बोल लावले, त्या पायी तिच्या लेकीचं-सुनीताच्या नणंदेचं लग्नही झालं नाही. पण सासूनं चिंता केली नाही.
'नसंल तिच्या नशिबी नवरा' म्हणून सुनीताच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. सुनीताचा नवराही तिला साथ देतो, ''मुलं मोठी झाली आता. शिक, तुला काय शिकाचं ते, असही म्हणतो. तिलाही शिकावसं वाटतं, ''ताई, आता शिकले तर येईल नव्हं मला? '' तीच विचारते अन् स्वतःच उत्तरही देते. ''येईल ताई, तुम्ही नाही का अजून अभ्यास करीत, मलाबी येईल शिक्षण. मी नर्सिंग शिकील.''
आज गावं सोडून चार वर्षं होऊन गेलीत. सुनीता. शिकली असेल का नर्सिंग? कशी असेल? त्यांचं राहतं घर, सासू निवृत्त झाल्यावर, त्यांना सोडायचं होतं. म्हापश्याला जाऊन राहणार होती ती लोकं. एकदोनदा तिला पत्र लिहिली होती. मग रोजच्या व्यापात ते मागे पडलं. आज ही गोष्ट सहज आठवली. जशी घडली तशी. मावळतीचे संध्यारंग बघताना, ढगांचा पाठशिवणीचा खेळ न्याहाळताना.
आजच्या घटकेला आयुष्याच्या तिन्हीसांजा अनुभवताना 'तू कशी आहेस? मुलंबाळं बरी आहेत न?' हे साधे साधे प्रश्नही दुर्मिळ होत चाललेले जाणवतात. सहज म्हणून कोणी कोणाशी फारसं बोलत नाही. एकमेकांची ख्यालीखुलाशी विचारीत नाही. तोलून, मापून, कामापुरतं, सावधपणे शिष्टाचारासारखं बोलणं झालय आपलं. मग-
''तुमच्या शाळेतली समदी खुशाल हायत नव्हं?'' हा प्रश्न मखमाली पेटीतच जपून ठेवायला नको का? सुनीताला तिच्या सासूनं, नवर्यानं आणि धर्मपित्यानं जपली तसा............!