राहूल नेहमीच बसने कॉलेजात जायचा. रोज कॉलेजकन्यकांचा सहवास त्याला या निमित्ताने मिळायचा. कॉलेजला गेल्यानंतरही त्याची रोमिओगिरी सुरूच असयाची. कॉलेज कट्टा आणि बस स्टॉपवर टुकार मित्रासोबत मुलींची छेड काढणे हा त्याचा रोजचा उद्योग होता. मुलींची छेड काढण्यात त्याचा दिवस जायचा. कॉलेजातल्या मुली त्याच्या या उद्योगांनी त्रासल्या होत्या. राहूल येताना दिसला की त्या त्याच्यासमोरून दबकत जायच्या. तरीही तो त्यांच्याबाबत काहीही कमेंट करायचा. राहूलच्या या जाचाला मुली फारच कंटाळल्या होत्या. एके दिवशी राहूलच्या जाचाला कंटाळून नेहा नावाच्या मुलीने अखेर तोंड उघडलंच. राहूलने तिची छेड काढली आणि नेहाला रहावलं गेलं नाही. त्याला ती ओरडून म्हणाली, 'तुला आई-बहीण नाही वाटतं?' राहूल निर्लज्ज हसून निघून गेला.
त्याच्या दुसर्या दिवशी राहूल लहान बहिणीसोबत बसमध्ये बसून कुठे तरी जात होता. तेव्हा बसमधला एक तरूण राहूलच्या बहिणीची छेड काढू लागला. ते पाहून त्याला नेहाचे वाक्य आठवू लागले. 'तुला आई-बहीण नाही का?' त्याने बहिणीला त्याच्या सीटवर बसवले व तो तिच्या सीटवर बसला. या एका प्रसंगाने आतापर्यंत आपण किती चुकीचे वागलो याची जाणीव त्याला झाली आणि त्याचे डोळे खाडकन उघडले.