Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी कथा : माणुसकी

मराठी कथा : माणुसकी
ती सुपरफास्ट एक्सप्रेस बस जिल्ह्यातून राजधानीकडे भर वेगाने जात होती. त्या बसमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांपैकी बहुतेक लोक काही ना काही कामासाठी राजधानीमधल्या सचिवालय व मंत्रालयामध्ये जात होते. तिथे त्यांची निरनिराळ्या प्रकारची सरकारी काम होती. कोणाला आपल्या भरलेल्या टेंडरच्या मंजुरीबद्दल माहिती काढायची होती, तर कोणाला आपल्या बदली किंवा प्रमोशनच्या संदर्भात मंत्र्यांना भेटायचे होते. प्रत्येकाचं काही ना काही काम होतं. त्यांना ऑफिस टाइममध्येच मंत्रालयात पोहोचायचं होत. 

बसचा ड्रायव्हर फारच वेगात गाडी चालवत होता. कधी सडकेवर चालणार्‍या वाटसरुच्या इतक्या जवळून गाडी न्यायचा की जणू तो गाडीखालीच येतो की काय. कधी एखाद्या सायकल चालकाजवळ जोराने हार्न वाजवून त्याला सडकेच्या खाली सायकल चालवायला भाग पाडायचा.

ड्रायव्हरच्या या वागणुकीबद्दल प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण त्याच्या या हलगर्जीपणाबद्दल त्याच्यावर टीका करू लागला. कोणी म्हणालं की हे ड्रायव्हर माणसाला जनावरापेक्षा कमी किंमत देतात. तर काहींचं म्हणणं पडलं की आजकाल माणुसकी हा प्रकारच राहिला नाही आहे.

इतक्यात ड्रायव्हरच्या चुकीने रस्ता सावकाशपणे ओलांडणारा एक म्हातारा गाडीचा धक्का लागून जखमी होऊन रस्त्यावर पडला. काही लोकांना वाटलं की तो बहुतेक मेला असावा. प्रवाशांपैकी काही लोक गाडीच्या खाली उतरले व पाहिले की म्हातारा बराच जखमी झाला होता त्याला हॉस्पिटलामध्ये घेऊन जाणं आवश्यक होत. अँक्सीडंटची केस असल्यामुळे पोलिसमध्ये जाणंही भाग होत.

या घडलेल्या प्रकाराबद्दल लोक ड्रायव्हरला शिव्या घालू लागले व म्हणाले आम्ही मघाचपासून बघतोय तू तू किती निष्काळजीपणे गाडी चालवतोय. तुला अजिबात माणुसकी नाहीये.

इतक्यात पोलिस आले. त्यांनी अँक्सीडेंटबद्दल चौकशी सुरू केली. त्यांनी सांगितले, की आता पंचनामा बनवून एफ.आय.आर नोंदवावा लागेल. मग गाडी पोलीस ठाण्यामध्ये जाईल आणि कोर्टाच्या परवानगीनंतरच सोडली जाईल.

त्या बस प्रवाशांच्या लक्षात आलं, की जर असं झालं तर ते वेळेवर राजधानीमध्ये पोहचू शकणार नाहीत. त्यांची सगळी कामे लटकतील. तेव्हा सर्व प्रवाशांनी एकमताने ड्रायव्हर व्यवस्थित व ट्रॅफिकच्या नियमांप्रमाणे गाडी चालवत होता. पण या म्हातार्‍याचेच सडकेवर चालताना भान नव्हते. तो आपल्याच तंद्रीत चालत होता. तेव्हा चूक म्हातार्‍याचीच आहे अशी साक्ष दिली. त्याचबरोबर पोलिसाने प्रकरण निकालात काढले व रेकार्ड करून दिले. आणि त्या म्हातार्‍याला त्याच्या नशिबावर सोडून 'माणुसकी'चा बडेजाव सांगणार्‍या प्रवाशांना घेऊन ती बस राजधानीकडे निघून गेली.
- प्रकाश दांडेकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लसणात लपलेले गुणधर्म जाणून घ्या!