आमचं ऑफिस 'फाइव्ह डेज वीक' या तंत्रावर चालतं. साहजिकच सोमवार ते शुक्रवार मला मान मोडून, पाठीचं धिरडं झालं तरी आठ तास कसून काम करावं लागतं. एखाद्या ढोरासारखा राबतो मी या पाच दिवसांत शनिवार आणि रविवार या दोन दिवसांकरिता मात्र माझ्या मानेवर जू नसतं. ह्या दोन दिवसांचा भरपूर लाभ ध्यावा हे मी मनोमन ठरविलेलंच असतं पण.....
शनिवार सकाळी मी उशीरा उठतो. 'तिचा' म्हणजे बायकोचा 'चहा' झालेलाच असतो माझ्याकरिता ती पुन्हा चहाच आधण ठेवते. म्हणजे तिला कामात व्यत्यय होतो. माझ्यावरचा राग स्वयंपाकघरातल्या भांड्यांवर काढला जातो, भांड्यांची 'आदळ आपट' सुरू होतो. कदाचित एखाद दोन ताटल्या, प्लेटा किंवा बशा अंतराळात गरगरत बेडरूममध्ये किंवा दिवाणखान्यातल्या मखमली जाजमावर हेलीपॅड वर उतरल्यागत विसावतात. तिच्या तोंडाचा चंबू झालेला असतो.
धुसपुसत येऊन चहाचा कप टेबलावर अक्षरश: आदळला जातो. माझ्या लक्षात येंत की 'मौन व्रत' शुरू झालेलं आहे. तिची पाठ फिरते अन् मी पुढ्यात आलेला चहाचा कप तोंडाला लावतो. फुर्र... फुत.. फुस्स चहाचा घेतलेला पहिलाच घोट मी थुंकल्यासारखा तोंडातून वेगळा करतो. कारण तो चहा खूप वेळा उकळलेला असल्याने त्याचा अक्षरश: 'काढा' झालेला असतो. मी चहाचा कप चहा न पीताच ठेवलेला तिच्या लक्षात येतं अन् ताबडतोब दोन तीन ताटल्या-वाट्या उंचावरून खाली पडून 'थटथयाट' 'दणदणाट' करीत जागच्या जागी दोन ते तीन मिनिटे 'कथकली' किंवा 'तांडव' नृत्य करीत स्थिरावतात. एखादी वाटी अगाऊपणे घरंगळत द्रुत गतीने दिवाणखात्यापर्यंत येऊन वातावरण 'वादळी' झाले असल्याची खबर देते.
मी मुखस्तभासारखा खिळून बसतो जागच्या जागी. वातावरण शांत व्हायला थोडा काळ जावा लागतो. मी नित्यकर्म आटोपून, पूर्णपणे शुचिर्भुत होऊन वर्तमानपत्र वाचीत बसतो. साहजिकच तपमान हवामान ही वाचून घेतो. बाहेरच्या अन् घरातल्या वातावरणातला विरोधाभास आढळून येतो. आता मधला काही काळ 'शून्यकाल' असतो. वदनी कवळ घेताच श्रीहरीचे नामाऐवजी थू... थूत.. फुत हे स्वर तोंडावाटे बाहेर पडतात. भातात उगीचच मीठ टाकलेले असते. वाढलेल्या भाताच्या ढिगाचा एक चतुर्थांश भाग 'करपलेला' आणि एक चतुर्थांश भाग भात कच्चा राहिलेला असतो. हा एकूण द्वितियांश भाग 'चित्राहुती' सारखा बाजूला सरकावून उरलेला भात खाऊनच 'तृप्ती'ची ढेकर द्यावी लागते. कारण चपात्या, आमटी, चटणी, लोणचे यांची स्थिती आणि चव कशी असेल याची कल्पना 'भाताच्या शितांवरून' आलेलीच असते. एकादशी, चतुर्थी किंवा इतर वाराचे उपास नसून ही त्या दिवशी उपास घडतो: पुण्य पदरी पडल्याच समाधान बाळगून 'स्थितप्रज्ञाच्या' भूमिकेत दिवस जातो. विरंगुळा म्हणून मी थोडावेळ चड्यासोबती मधू मांडकेकडे चकाट्या पिटायला किंवा पत्ते खेळायला जातो. तिथूनच परभारे सिनेमा पाहण्याचा 'प्रोगॅम' ठरल्यानं तिला बरोबर नेणं जमत नाही. परतून सरळ घरी येतो, पण 'मकान बंद' असतं. कुलूप लावून पोरीला बरोबर घेऊन ती 'घराबाहेर' गेलेली असते. समोरच्या टाकले काकांच्या व्हरांड्यात त्यांची टकळी ऐकत पण घराकडे वॉचमन सारखी नजर लावून काळ कंठतो. दोन किंवा अडीच तीन तासानंतर घराचं दार उघडलं गेलं असल्याचं दिसतं. घरात शिरून 'जेवायच नाहीए' अशी सूचना मुलीमार्फत देऊन निद्राधीन होतो.
रविवार आपोआपच सकाळी लवकर जाग येते. वातावरण निवळू लागल्याचं जाणवतं. सकाळचा चहा बरा असतो. सकाळचं जेवण थोड्या उशिरा का होईना पण 'गिळवलं जात'. तृप्तीची खरी ढेकर देता येते. दिवसाभर शांतता असते. प्रसंगी सात आठ शब्दांची चार पाच वाक्यं आणि काही हुंकार यांचं आदान-प्रदान ही होतं. म्हणून सायंकाळी एखाद्या गद्य वा संगीत नाटकाची तिकिटं आणतो. नाटक पाहून येईपर्यंत 'हवामान' 'तापमान' 'वार्तालाप' यात अपेक्षित परिणाम झालेला आढळून येतो. म्हणून जेवण 'हॉटेल' मध्येच करून घरी परत येतो. रविवारी छान झोप येते. सोमवार ते शुक्रवार ऑफिस सुरू असतंच, म्हणून सर्वांची सर्व काम वेळशीर आणि अपेक्षेनुसार व्यवस्िथत, सुरळीत होतात, मात्र शनिवार उजाडताच...... समजलं ना?