घरी अरुणची म्हातारी आई मागल्या दोन वर्षापासून पॅरालिसिस झाल्यामुळे अंथरुणावरच होती. हात-पाय निकामी झाल्यामुळे शरीरधर्म बिछान्यावरच पडल्या-पडल्या होत होते. सून केतकी आदळआपट करतच सासूची 'सेवा' करत होती. शिवाय ते करताना तोंडाची बडबडही चालायची. कधी कधी म्हणायची, 'जगामध्ये रोज एवढे लोक मरतात, पण ही म्हातारी काही मरत नाही. किती दिवस आम्हाला अशी छळणार आहे कोण जाणे? वगैरे वगैरे.
आईला रोज आपल्या सुनेच्या व नातवाच्या डोळ्यांमध्ये आपल्याबद्दलचा राग, तिटकारा दिसायचा. पण ती बिचारी काय करणार? मृत्यू येणं काही तिच्या हातामध्ये नव्हतं.
मुलगा अरुण मात्र रोज ऑफिसमधून घरी आल्यावर तिची चौकशी करायचा. दिवस कसा गेला हे विचारायचा. आईला रोज वर्तमानपत्र वाचून जगात चाललेल्या घडामोडी सांगायचा. तिच्यादृष्टीने अरूणची विचारपूस ही मंदशी झुळूक असायची.
एक दिवस बातमी वाचून दाखविताना त्याने आईला मानवी बॉम्ब बांधून स्वतःला संपवून घेणार्या अतिरेक्यांची माहिती सांगितली.
आई बर्याच वेळापर्यंत शून्यात पाहत राहिली. विचार करता करता तिच्या मृत्यूनंतर सुनेचा व नातवांचा त्रास संपून ते किती सुखी होऊन जातील हे चित्र दिसू लागलं. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. थोडा वेळ विचार करून आई म्हणाली - 'अरुण मला कधी मानव बॉम्ब बनता येईल का?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा