Article Marathi Stories %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%be 109080800044_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुखवटा

सौ. स्मिता कुळकर्णी

मुखवटा साहित्य कथा कविता
ND
2 जुल
सगळं सामान आवरायचं पडलंय. कधीपासून धावपळ सुरू होती. आज मात्र अगदी कंटाळा आला. आधी तिथे सामान आवरताना दमलो. काल इथे आलो. तेव्हापासूनही कामच चाललंय. पण विनितला आज कामावर जायलाच हवं होतं. नवा जॉब, मोठी जबाबदारी. अर्थात तो सांभाळेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित.

माझं काम एवढ्यात काही सुरू करता येणार नाही. मिकीची शाळा मात्र उद्या परवापासून सुरू होईल. इथे आजूबाजूला कोणाशी ओळख झाली नाहीये. बायका बहुतेक नोकरी करणाऱ्या असाव्यात. नाही म्हणायला माई आपटेंशी ओळख झाली शेजारीच राहतात. सत्तरीच्या वरच असतील. पण इतक्या छान दिसतात-आणि राहतात. आवडल्या...

webdunia
ND
10 सप्टेंबर
विनितचं काम म्हणजे विचारू नका. फारच धावपळ आहे. वेळेचं काही बंधन नाही. दोन महिने होऊन गेले इथे येऊन. पण आजूबाजूची ठिकाणं काहीच पाहिली नाहीत. आता म्हणतोय रविवारी पिकनिकाला जाऊ. पाऊस नसेल बहुतेक. माई म्हणाल्या, इथे नदीकाठी शंकराचे मंदिर आहे - मुकुटेश्वर बाकी त्यांना काही सांगता येईना. म्हणून विचारलं. तुम्ही खूपदा पाहिलं असेल. तर म्हणाल्या, ''एकदाच! त्यालाही झाली पंधरा वर्ष. '' मग चिडल्याच अण्णांवर. ते त्यांच्या मते खूप अरसिक, कंजूष आणि अजूनही काही-काही आहेत. मला वाटलं माईंनाही न्यावं बरोबर.

विनित म्हणेल काय विचित्र बायको आहे! अगदीच नॉन रोमॅंटिक! पिकनिकला सुद्धा आजी बरोबर!

14 सप्टेंबर
माई किती उत्साही आहेत! याही वयात फराळाचं मला काही करूच दिलं नाही. आदल्या दिवशी खपून स्वत:च खूप काही केलं आणि इतक्या छान तयार झाल्या. साडी, चपला, पर्स, अगदी व्यवस्थित! नाही तर मी! भलतीच आळशी. म्हटलं, आज कपडे मळणारच आहेत, तर मळकेच घालावे. तीच जीन्स, तोच टीशर्ट. पण माईंना पाहून मलाच माझी आज वाटली. आणि मळक्या टीशर्ट ऐवजी नवा कुर्ता घातला! मंदिर खूपच छान आहे. दगडामधलं काव्य. फोटो घेतले आहेत. लेख लिहीन म्हणतेय.

आजूबाजूला बाग आहे म्हणून मिकी खूश! म्हणाली, ''इथेच येऊ दर रविवारी. '' ती खेळण्यात रमली. आम्ही निवांत गप्पा करत बसलो झाडाखाली. तिघांनी खूप गाणी म्हटली. माईंना सगळी जुनी गाणी पाठ आहेत. लहानपणी मी माझ्या आईकडून ऐकलेली. आई गेल्यानंतर ती गाणीही आठवणीच्या पडद्याआड गेली.

आता त्या गाण्यांना नवाच संदर्भ मिळाला. ते मंदिर, ते वडाच झाड आणि सावलीतली आमची मैफिल... मनात चित्र अगदी रुजलंय. कालचे फोटो सगळेच छान आलेत. या वयातही माईचा हात स्थिर आहे. त्यांना कॅमरा वापरायची सवय असावी. त्याने माझे-विनितचे खूप फोटो काढले. सारखं आपलं, ''तुम्हे इथे उभे राहा असे बसा - मी फोटो काढते.''

webdunia
WD
17 सप्टेंब
मिकीने खूप मस्ती केली परवा. तेव्हापासून आजारीच आहे ताप-सर्दी खोकला, सगळं काही. अजून इथे डॉक्टर्स ओळखीचे नाहीत. विनित अर्थातच कामात बुडलेला. मिकी तर लाडोबाच आहे. राईचा पर्वत करते आणि छळते नुसती. सारखी माझ्यामागे भुणभुण. इथे बस, माझे पाय दाब, डोकं दाब... नाही ऐकलं की रडणं सुरू. शेवटी माईंना बोलावलं. मग गोष्टी ऐकता ऐकता वेळ छान गेला... गंमत म्हणजे, थोड्या वेळाने अण्णाही आले. ''काय म्हणते तब्यते? '' असं विचारून गेले. मग थोड्या वेळात चहा करून घेऊन आले किटलीभर. मला खूपच लाजल्यासारखं झालं. एक तर त्यांच्या स्वभावाबद्दल मला कोडंच पडलं होतं. दुसरं, मिकी एवढी काही आजारी नाहीय की मला कोणी बसल्या जागी चहा पाजावा!

पण मला वाटतं कुठेतरी त्यांनाही त्यांच्या नातीची आठवण येत असेल.

18 सप्टेंबर
''कसली आठवण आणि कसलं काय! त्यांना काही कोणाचं प्रेम नाही. ती अमेरिकेतली नात. दोन गोड शब्द नाही बोलणार, पण इंग्रजीच्या चुका काढतील. मग काय, दूरच पळते त्यांच्यापासून. आता तर येणार आहे, बघशीलच. '' माईची खूप कुरकूर चालते अण्णांबद्दल. वाटतं, किती विजोड हे जोडपं! असा संसार नकोच.

खरं तर अण्णा माईसारखी तक्रार करत नाहीत, हा त्यांचा प्लस पॉंईंट आहे. नाहीतर त्यांच्याही जवळ काही मुद्दे असतीलच. ते-विनितच्यभाषेत आपटे सर - बुद्धिमान आहेत! अर्थतज्ज्ञ आहेत. प्राध्यापक होते, लेखक आहेतच... त्या मानाने माईचं शिक्षण जेमतेम. पण माईंच्यएकूण वागण्यालाच मी झाळली आहे, ती त्यांना नाही. माई म्हणतातच, 'देवाने सोन्यासारखं आयुष्य दिलं, त्याचा दागिना आपण घडवायला नको? नाहीतर ते अर्थतज्ज्ञ सोन्याची वीट बनवून ठेवतील लॉकरमध्ये! हे कसलं अर्थशास्त्र? कशाला काही अर्थ नाही! नुसता कंजूषपणा! अर्धशास्त्र विनियोगाचं. नसलं तर निरूपयोगाचं असतं! तुला सांगते, पन्नास वर्षात कुठला सिनेमा नाही की गजरा नाही! फक्त अर्थशास्त्र!'

17 नोव्हेंब
आज माई फोटो दाखवत होत्या. त्यांचे फोटो इतके छान येतात! वाटतं म्हाताऱ्या बाईने असंच दिसावं. पुढली एक बट सोडली तर अजूनही काळे केस. मोठासा अंबाडा. त्यावर कुठलं ना कुठलं फूल. सोनेरी काड्यांचा चष्मा, आणि सोनेरी चपला. जुने फोटो तर पाहतच राहावं असे. त्यांची मुलगी मुग्धा आणि नात टिना त्यांच्यासारख्याच दिसतात. टिना तर त्यांच्यात भाषेत, ''टिना कसली चांगली सुवर्णा आहलखलखीत!'' विशीची असेल. ती फोटोग्राफीच शिकतेय, आणि आजोबा कॅमेऱ्याच्या समोर उभेच राहायला तयार नाहीत.

25 डिसेंब
मिकीच्या वाढदिवसाला केक बाजारातून आणला. तेव्हापासून माई म्हणत होत्या, '' मी तुला केक शिकवते.'' शेवटी आज मुहूर्त होता. तासाभरातच झाला तयार. आज विनित खूश होईल म्हणेल, बायको बायकांसारखी वागायला लागली एकदाची! मिकी तर म्हणालीच आई आता तू हुशार व्हायला लागी आहेस!

केक खरंच मस्तच जमला. मिकीच्या हाती अण्णांना पाठवलं. तर माई म्हणतात कशा, ''अग त्यांना काही कळत नाही त्यातलं. अगदी भाजीत मीठ नसलं तरी कळत नाही. '' हे माई वाढवून सांगतात....

webdunia
ND
12 जानेवारी
सध्या कामं रेंगाळली आहेत. दोन लेख पूर्ण करायचे आहेत. एक ललित आहेच. शिवाय एक नवाच उपक्रम. एक फ्रॉक शिवला, तर मिकमागेच लागली. माईंनी अजून दोनचं कटिंग करून दिलंय. त्यांचीही धावपळ चाललीय मुग्धा-टिना येणार म्हणून.

15 फेब्रुवारी
सध्या वेळ मुग्धाताईबरोबर जातोय. आधी तर दोन दिवस मी दूरच राहिले. माई बोलावून गेल्या. मी मी म्हटलं, एवढ्या लगेच जाणं बरं नाही. पण मग मुग्धाताईच आल्या, माईंची लेक-कम-नात पाहायला. नंतर आमचं छानच जमलं. खरंतर आमच्या वयात किती फरक आहे. मतिशीची, त्या पन्नाशीच्या, माई पंचाहत्तरच्या आसपास. तरी माझं या तिघींशी काही नातंच आहे जसं. कुठेतरी आतून मी यांच्यासारखहोबघतेय. कलतीतलं वयातीत....

माईची एक बट पांढरी आहे. टिना म्हणाली, ''मी तुझे केस रंगवून देते. '' माई लगेच तयार. मग आम्ही सगळे फोटोसाठी तयार झालो. अण्णांना म्हटलं, नवा कुर्ता घाला तर ऐकेचना. मग सगळ्यांचाच विरस झाला. कशाला एवढा रुक्षपणा? अर्थात, त्याचा स्वभाव माहीआहे, तर या दोघी कशाला मागे लागतात? माईंना उगाच त्रास.

webdunia
ND
1 जुल
विनित आला, आणि मला पाहून चकितच झाला. मी आणि चक्क सलवार सूट? शिवाय केस बांधलेले! अशी मी सणासुदीलाच दिसते. विनीताला म्हटलं, आज इथे येऊन आपल्याला वर्ष झालं. म्हटलं, साजरा करू आजचा दिवस. मला वाटतं आपण खूपदा आपल्या प्रतिमेला,
भूमिकेला अनुसरून वागत राहतो - मग ती प्रतिमा तशीच दृढ होत राहते. मग आपल्याला वाटतं, ती प्रतिमा म्हणजेच आपण. पण कधीतरआपण तो मुखवटा उतरवून आपला खरा चेहरा आरशात पाहावाच. त्याला धाडस लागतं. हे धाडस मी केलं. तेव्हा जाणवलं, माझ्यातही एक स्त्री लपलेली आहे. तिला नेलपेंट हवं आहे. नाजुक सोनेरी चपलाही हव्या आहेत. तिला तुळशीला पाणीही घालायचंय, दाराला तोरणही लावायचंय....

15 सप्टेंब
किती दिवसांत डायरीला हात लावला नाही. खरं तर घराकडेच लक्ष नाही. सगळीकडे धूळ जमलीये, पण माई बब बर्‍या होईपर्यंत कामात लक्षच
नाही लागणार. साधा ताप, पाहता पाहता पॅरॅलेसिसवर पोहोचला. चार दिवस हास्पिटलची धावपळ. मुग्धाताईंना फोन केला. अर्थात त्यांना इतक्या लगेच यायला जमणार नाही. रडल्या फोनवर. मग मी समजावलं. काळजीचं काही कारण नाही. पण ते काही खरं नाही. डावी बाजू कमजोर, चेहरा वाकडा, आणि मुख्य म्हणजे बोलता येत नाहीये. फिजिओची ट्रीटमेंट चाललीय. औषधं आहेतच. दिवस-रात्र सांभाळायला बाई आहे. सगळं सेट झालं. आता मला माझी कामं मार्गी लावता येतील.

या सगळ्या प्रकरणात अण्णा कधीतरी हळवे वाटले. पण बहुतेक वेळा निर्विकार. मला वाटतं इतरांनी दिलेला मुखवटा त्यांच्याही चेहऱ्याला नको तेवढा चिकटून बसलाये. देव करो आणि ते मुखवटा गळून पडो म्हणजे माईच उरलेलं आयुष्य तरी समाधानात जाईल. किती छोट्या अपेक्षा आहेत त्यांच्या! चार प्रेमाचे शब्द, केसात माळायला एखादं फूल, भरवलेला घास आणि दोघांचा एक हसरा फोटो...

18 ऑक्टोबर
माईंना बोलता येत नाही, तरी मिकी सारखी तिकडेच असते. अण्णाशी भलतंच सूत जमलंय. दोघ गप्पा करतात. आणि चक्क हसतात सुद्धा!परवा सहजच जाऊन पाहिलं, तर दोघे हसताहेत आणि त्यांना पाहून माईसुद्धा हसायचा प्रयत्न करताहेत. डोळ्यांत पाणीच आलं.

12 नोव्हेंबर
आज नवाच प्रयोग केला. जेवणाच्या वेळेला गुपचूप बाईला दोन तासांची सुट्टी दिली. अण्णांना म्हटलं, मऊ भात तयार आहे, मीच भरवला असता पण आज माझं काम राहून गेलंय बरंच. तुम्ही भरवता का माईंना? हो म्हणाले! प्रयोग यशस्वी!

webdunia
ND
12 डिसेंबर
मिकी जरा जास्तच आगाऊ झाली आहे . तिच्या वाढदिवसाची सगळी खरेदी झाली. कपडे, चपला, हॅट, पर्स नेलपेंट, सगळं मॅचिंग. तरीही
विचारते, हेअर कलर कुठे मिळतो? म्हटलं, सुपर स्टोअर्समध्ये. तर म्हणाली, आपण आणायचा. मग मी इतकी चिडले की ती गप्प बसली. आता केस तेवढे गुलाबी रंगवायचे बाकी ठेवणार.

15 डिसेंबर
सकाळपासून धावपळ चालली आहे . केकावर आईसिंग झालं, हॉल सजवला. फुगे फुगवले. मिकीला तयार केलं. आणि म्हटलं, आठा वर्षाची झालीस. आता मस्ती पुरे. शहाण्यासारखी बस. कपडे खराब करू नकोस. थोड्या वेळाने पाहिलं तर ती नेलपेंटची बाटली घेऊन धावताना दिसली. म्हटलं ''झालं आता कपड्यांना डाग पडणार.''

जेमतेम हातातलं काम बाजूला ठेवलं आणि माईकडे गेले. पाहिलं, तर नात आजीच्या पायाला नेलपेंट लावत आहे आणि आजोबा आजीच्या
काळ्याभोर केसात फुलं माळताहेत! मला पाहून ते थबकले. मुखवटा घालायचा प्रयत्न केला, मग शेवटी मुखवटा दिला टाकून आणि म्हणाले, वर्षाताई एवढा नातीचा वाढदिवस! सगळ्या फोटोत एक आमचा दोघांचाही होऊन जाऊ द्या बरं!

म्हटलं, तुम्ही तयार व्हा, मी कॅमेरा आणते. मिकीला कळेना, आईला रडायला काय झालं....!

साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून

Share this Story:

Follow Webdunia marathi