ते फार मोठे समाजसेवक होते. त्याचं नाव शहरातल्या बड्या लोकांमध्ये घेतलं जायचं. अत्यंत हुशार, दयाळू व दुसर्यांच्या भावना समजून घेणार्यांमध्ये त्यांची गणना व्हायची. बरं इतकं असूनही निगर्वी व्यक्तिमत्व.
निर्व्यसनी, साधं जीवन, उदात्त विचार व प्राणिमात्रांवर प्रेम ही त्यांच्या जगण्याची चौसुत्री होती. शाकाहारी संस्कृतीचे तर ते जणू ब्रॅंड एंबेसेडरच होते. 'शाकाहार' या विषयावर आज त्यांचं व्याख्यान होतं. कार्यक्रमामध्ये त्यांनी दोन तास प्रभावी भाषण केलं. भाषणाचा प्रमुख मुद्दा, 'मनुष्य फक्त आपल्या जिव्हेचे चोचले पुरविण्यासाठी रोज कितीतरी निरपराध पशू-पक्ष्यांचा बळी घेतो हा होता. त्यांच्या भाषणाला लोकांनी मनसोक्त टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. त्यांच्या मार्मिक उदाहरणांनी अनेकांचे डोळे उघडले.
भाषण झालं. कार्यक्रम संपला. ते समाधानाने घरी परतले. पण आजच्या भाषणाच्या गार्भिर्थाने त्यांचा मूड 'अपसेट' झाला होता. का कुणास ठाऊक ते फारच नर्व्हस झाले होते. त्यांना 'डिप्रेशन' आलं होतं.
शेवटी त्यांनी मूड फ्रेश करण्याकरीता शेल्फमध्ये ठेवलेल्या उंची स्कॉच व्हिस्कीचा एक पेग घेतला. मग डायनिंग टेबलकडे गेले. तिथे त्यांच्या सवयीची माहिती असलेल्या त्यांच्या कुकने त्यांच्यासाठी तंदुरी चिकन प्लेटमध्ये आधीच सर्व्ह करून ठेवले होते.