आज बापूकाकांचं तेराव्याचा श्राद्ध व नंतर गंगापूजनाचा कार्यक्रम होता. बापूकाका आपल्या जीवनामध्ये पडलेल्या सर्व जबाबदार्या पार पाडून वैकुंठवासी झाले होते. दोन्ही मुली व मुलांचं शिक्षण, त्यांची नोकरी व लग्न अशा सर्व सामाजिक जबाबदार्या बापूकाकांनी हयातीतच पार पाडल्या होत्या. शिवाय घराच्या शेजारी राहणार्या अनाथ सुरेखाला पण त्यांनी मदत दिली होती. तिचे संगोपनही पोटच्या मुलीप्रमाणे केलं. तिला शिकवलं. तिच लग्न पण माहितीतल्या घरंदाज, सुशील व शिकलेल्या मुलाशी लावून दिल. पण हे सुरेखाचं दुर्दैव की लग्नाच्या तीन महिन्यानंतरच एका अपघातात तिच्या पतीचे निधन झाले आणि ती विधवा झाली.
आचच्या कार्यक्रमासाठी सगेसोयरे जमले होते. सर्व जण गंगा कलशाला नमस्कार करीत होते. बापूकाकांच्या फोटोवर पुष्पांजली वाहत होते. इतर लोकांप्रमाणे सर्वांच्या नंतर सुरेखा नमस्काराला पुढे आली. तिला पाहून सर्वांच्या कपाळावर आठ्या पडल्या कारण गंगापूजनच्या शुभ कार्यात पवित्र गंगाकलशाला एका विधवेचा हात लागणे म्हणजे घोर पाप.
सर्वांनी तिला बाजूला केले. बापूकाकाच्या पत्नी शांताकाकू तर म्हणाल्या सुद्धा, 'तीन महिन्यातच नवर्याला खाणारी तू. तुला काही अक्कल आहे की नाही? आता माझा नवर्याचा फोटो आणि गंगाकलशाला स्पर्श केलीस तर त्यांना शांती मिळेल काय?
तिकडे बापूकाकांच्या आत्म्याला मात्र सुरेखाच्या अगाध प्रेमाचाच स्पर्श हवा होता. त्यांना शांती फक्त त्यामुळेच मिळणार होती.