साहित्य : 250 ग्रॅम जाडसर रवा, 200 ग्रॅम साखर, 200 ग्रॅम वनस्पती तूप, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 10 ग्रॅम इलायची, 10 ग्रॅम मनुका.
पूर्वतयारी : रवा बारीक चाळणीतून गाळून घ्यावा. साखर स्वच्छ करून घ्यावी. इलायची साल काढून बारीक करून घ्यावी. बदाम व काजूचे बारीक तुकडे करून घ्यावे.
कृती : गॅसवर कढई ठेवून त्यात वनस्पती तूप घालावे. तुपात बदाम व काजूचे बारीक तुकडे भाजून घ्यावे. तूप दोन मिनिटांपर्यंत गरम झाल्यानंतर त्यात रवा घालावा. गॅसची आंच मंद ठेवावी. सरळ पात्याच्या चमच्याने रवा एकसारखा परतत रहावा. साधारणतः 25 मिनिटांपर्यंत रवा भाजल्यानंतर त्यास तांबूस रंग प्राप्त होण्यास सुरूवात होते व खमंग सुगंध दरवळू लागतो.
रवा तांबूस झाल्यानंतर भाजला गेल्याचे समजावे. एका पातेल्यात दोन ग्लास पाणी तापायला ठेवावे. रवा भाजला गेल्यानंतर त्यात गरम झालेले पाणी घालून 5 मिनिट झाकण ठेवून वाफावे. नंतर त्यात साखर घालावी.
बारीक केलेली इलायची घालावी. चमच्याने संपूर्ण द्रावण फिरवून घ्यावे व पाच मिनिटांपर्यंत चमच्याने द्रावण परतत रहावे. शिर्याचा सुगंध दरवळू लागल्यानंतर झाला खमंग शिरा तयार!