साहित्य : मैदा 2 वाट्या, तूप 2 वाट्या, मीठ अर्धा चमचा, साखर 2 वाट्याकृती : मैदा पाण्यात घट्ट भिजवून दोन-तीन तास ठेवावा. नंतर पाणी लावून, कुटून, त्याला चांगली तार आणावी. अर्धा चमचा मीठ घेऊन, मीठ चमचाभर पाण्यात विरघळल्यावर ते पाणी मैद्याला लावून मैदा पुन्हा चांगला कुटावा. नंतर त्याचे 10-12 गोळे करून ठेवावेत. तूप परातीत घालून चांगले फेसावे. प्रत्येक गोळ्याला फेसलेले तूप लावून तो थोडा लांबवून ठेवावा. याप्रमाणे सर्व गोळ्यांना चार-पाच वेळा तुपाचा हात लावून, सर्व गोळे लांबून घ्यावेत.
गोळे लांबवत लांबवत त्यांची जाडी सुताइतकी बारीक झाली, म्हणजे हाताच्या चार बोटांवर धागा गुंडाळावा. गुंडाळताना मधून मधून फेसलेले तूप सर्व बाजूंनी लावावे. गुंडाळून झाल्यावर बोटांवरून गुंडाळी हलकेच काढून फेसलेल्या तुपात बुडवून घेऊन बाजूला ठेवावी. नंतर तूप गरम करावयास ठेवावे.
तूप मंद तापल्यावर पहिली फेणी हातात घेऊन थोडी लांबवून तुपात सोडावी व विणावयाच्या सुईने फेणीची सुते विरळ विरळ करून ती फेणी तुपात पसरेल, असे करावे. फेणी मंद विस्तवावर तळावी व बाहेर काढून ठेवावी. याप्रमाणे सर्व फेण्या तयार कराव्या. साखरेचा कच्चा पाक करनू त्यात फेण्या बुडवून काढाव्या व नंतर त्यांच्यावर बदाम व पिस्ते यांचे काप घालावेत. हवे असल्यास गुलाबाचे पाणी ही शिंपडावे.
सुतारफेण्या रंगीतही करतात. रंगीत करावयाच्या असल्यास केशर किंवा जो रंग घालावयाचा असेल, तो मैदा भिजवतानाच घालावा.