Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुपुरुषासाठी दररोज घास का ठेवायचा?

वास्तुपुरुषासाठी दररोज घास का ठेवायचा?
, सोमवार, 20 जून 2016 (12:07 IST)
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी वास्तुपुरुषाची जन्मकथा जाणून घ्यावी लागेल.
 
अंधकासुर नावाचा एक राक्षस होता. महापराक्रमी होता. वृत्तीत दैवी अंश नसेल तर पराक्रमाचा मद चढतोच. हा राक्षसही मदमस्त बनला. देवांना त्यानं सळो की पळो करून सोडलं. हतबल झालेले देव मग 'त्राही भगवान' म्हणत देवांच्या देवाकडे अर्थात महादेवाकडे धावले. महादेवानं लगेच शस्त्र परजलं! आपल्या देवांचं एक बरं होतं. कुणी उन्मत्त झाला तर त्याला समजावण्याच्या, त्याचं बौद्धिक घेण्याच्या, वाटाघाटी करण्याच्या किंवा शांतीची कबुतरं उडवण्याच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. सरळ युद्धाचं आव्हान द्यायचं आणि समस्या मुळापासून उखडून टाकायची, असा त्यांचा खाक्या होता. हिंदू धर्माला क्षात्रधर्म म्हणतात ते यामुळेच. हिंदूंच्या कोणत्याही देवाकडे पाहा, प्रत्येकाकडे शस्त्र आहे. अगदी आठ हात असतील तर आठही हातात शस्त्रं आहेत. शस्त्रसज्जता हा त्यांचा गुणविशेष आहे आणि ज्या ज्या वेळी अधर्म माजला त्या त्या वेळी ही शस्त्रं उगारायला त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही. असो!
 
तर भगवान शंकरानं शस्त्र उचललं. अंधकासुरही पराक्रमी होता. त्यानं शंकराचं आव्हान स्वीकारलं. शंकर व अंधकासुर यांच्यात घनघोर युद्ध झालं. पण शेवटी महादेवाचा विजय झाला. अंधकासुर ठार झाला. या लढाईच्या श्रमानं महादेवाच्या अंगाला घामाच्या धारा सुटल्या. घामाचे थेंब जमिनीवर पडले आणि त्याच थेंबातून एका करालपुरुषाचा जन्म झाला. हाच तो वास्तुपुरुष.
 
पण या करालपुरुषाला जन्मत:च भस्म्यारोग झालेला. तेथेच मरून पडलेल्या अंधकासुराच्या प्रेताचा त्यानं पहिल्यांदा फडशा पाडला. पण त्याची भूक शमेना. मग महादेवाकडे याचना केली, पृथ्वी, स्वर्ग, पाताळातील काहीही खाऊन टाकण्याची अनुमती मागितली. सर्वांना वर देणारे भोलेनाथ मुलाला कसे म्हणणार? ते 'तथास्तू' म्हणाले आणि करालपुरुषानं सुरुवात केली. समोर दिसेल ते गिळंकृत करण्याचा सपाटा त्यानं लावला. घरं, झाडं, प्रासाद, डोंगर.. त्याच्या तावडीतून काहीच सुटेना! तिन्ही लोकांत एकच हाहाकार उडाला. देव घाबरले, दानव घाबरले, मानव घाबरले, वास्तुपुरुषाला आवरायचं कसं? तो प्रत्यक्षात शिवपुत्र आणि शिवाय शिवाचा वर लाभलेला. त्याला युद्ध करून हरवणंही कर्मकठीण. सर्व पेचात पडले. काय करावं ते कुणालाच काही कळेना. म्हणून देव आणि दानव चक्क एकत्र आले. एखाद्या प्रश्नावर देव आणि दानवांची युती होण्याची इतिहासातील ती पहिलीच वेळ. सर्वानुमते एक मास्टर प्लान तयार करण्यात आला. या प्लानप्रमाणं देव आणि दानव एकाचवेळी वास्तुपुरुषावर चाल करून गेले. त्याला पकडला आणि जमिनीवर पालथा पाडून दाबून धरला. जमिनीवर पाडताना त्याचं डोकं ईशान्येला राहील याची दक्षता घेतली गेली.
 
वास्तुपुरुष महाबलदंड; पण डोकं ईशान्येला आल्यानं त्यानं नमस्कारासाठी हात जोडले. कोणताही प्रतिकार न करतो तो तसाच पडून राहिला. कारण ईशान्य ही प्रत्यक्षात शिवशंकराची दिशा. पित्याच्या पायावर डोकं आल्यामुळे शिवपुत्रानं हात जोडणं आणि आशीर्वादासाठी थांबणं ओघानं आलंच. दरम्यान, देव-दानवांनी श्रीशंकराची करुणा भाकली आणि पुत्रास समज देण्याची विनंती केली. पण पुन्हा पेच निर्माण झाला. कारण काहीही खाऊन टाकण्याचा वर महादेवानंच दिलेला. मग चर्चेच्या काही फेर्‍या झडल्या आणि शेवटी एक सर्वमान्य तोडगा निघाला. या तोडग्यानुसार पृथ्वीतलावरील सर्व मानवांनी दररोज जेवणापूर्वी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा. हेच अन्न वास्तुपुरुषानं नित्यआहार म्हणून सेवन करावं. नवीन घर बांधून झाल्यानंतर वास्तुपुरुषाची पूजा करावी. त्या वेळी दिलेलं अन्न हा वास्तुपुरुषाचा नैमित्तिक आहार असावा. अशा घराचं रक्षण वास्तुपुरुषानं करावं, असं ठरलं.
 
अशी आहे वास्तुपुरुषाची जन्मकथा. हीच कथा सर्वात जास्त प्रचलित आहे. आणखीही दोन-तीन कथा आहेत. पण त्या फारशा प्रचलित नाहीत. एका कथेनुसार 'वास्तू' नावाचा महाबलवान राक्षस होता. त्यानं त्रैलोक्याला त्रास दिला. अनेक वर्षे युद्ध केल्यानंतरही त्याला पराभूत करता येईना. तेव्हा देव ब्रह्मदेवाला शरण गेले. मग ब्रह्मदेवानं वास्तुराक्षसावर मायाजाल टाकलं आणि त्वरित मृत पावण्याचे आदेश त्याला दिले. संमोहित झालेला तो राक्षस पाताळात आग्नेय दिशेला असलेल्या विवरात जाऊ लागला. त्या वेळी देवांनी मोठा पाषाण टाकून त्याचा मार्ग बंद केला. 'मला संतान नसल्यानं माझ्या अन्नोदकाची व्यवस्था करावी' अशी प्रार्थना त्यानं ब्रह्मदेवाकडे केली. तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं की, 'पृथ्वीतलावर मानव नवीन घरं बांधतील, त्या वेळी तुझी शांती करून तुला नैवेद्य देतील. अशांना तू गृहसौख्य दे. तुला नैवेद्य देणार नाहीत ते उद्ध्वस्त होतील.'
 
तिसर्‍या कथेनुसार रुद्र प्रजापतीनं उषेशी विवाह केला. त्याला चार मुलगे झाले. त्यापैकी चौथ्या मुलाचं नाव वास्तोष्पती किंवा गृहपती अग्नी असं होतं. सायण्णाचार्यांनी त्यास 'यज्ञवास्तुस्वामी' असं म्हटलंय. वास्तोष्पती यज्ञीय कर्माचा रक्षक होता. त्याला यज्ञदेवीचा अधिनायक मानलं जाऊ लागलं. पुढील काळात तोच भवनांचा स्वामी बनला आणि त्याला वास्तुपुरुष म्हणून संबोधलं जाऊ लागलं. पृथ्वी ही त्यांची भार्या होती. त्याला प्रसन्न करण्यासाठी वास्तुशांतीस सुरुवात झाली.
 
वास्तुपुरुषांच्या संकल्प चित्रात त्याचं डोकं ईशान्येला असणं, तो पालथा असणं, त्याचे हात जोडलेलं असणं आणि मुख्य म्हणजे वास्तुपदविन्यासात विविध पदांना देवांबरोबर दानवांचीही नावं असणं या सर्व बाबींचा संदर्भ पहिल्या कथेतच येत असल्यानं मला ती जास्त संयुक्तिक वाटते. अर्थात ही कथा सांगताना ऋषीमुनींनी रूपकांचा वापर केलाच नसेल असं म्हणता येणार नाही. ऋषीमुनी हे शास्त्रज्ञांचे बाप होते. शास्त्राची कडू गोळी धर्माच्या, सणांच्या, उत्सवांच्या साखरेत घोळून सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी पोचवली. सर्वच रूपकांचा अर्थ आजच्या काळात आणि संदर्भात लावता येईलच असंही नाही. असो! वास्तुपुरुषाच्या जन्माची कथा वाचल्यानंतर वाचक वास्तुशांती गांभीर्यानं घेतील आणि आजपासून जेवणापूर्वी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढतील याची खात्री मला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यश मिळवण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी करा हे 3 काम