कढी गोळे
साहित्य:
गोळ्यांसाठी :
1 वाटी चणा डाळ
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
१ लहान चमचा मिरची पेस्ट
१/२ चमचा हिंग
१ लहान चमचा हळद
१ लहान चमचा जिरेपूड
चवीप्रमाणे मीठ
कढीसाठी :
२ वाट्या आंबट दही किंवा ताक
१ चमचा चणा डाळ पीठ
५-६ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी:
२ चमचे तूप, जिरे, १/२ चमचा हिंग, चिमूटभर हळद, १/२ लहान चमचा आलेपेस्ट, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा साखर
कृती:
चणा डाळ ३-४ तास भिजत घालावी.
निथरुन त्यात आलं- लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, हिंग, हळद, जिरेपूड, मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी.
मिक्सरमध्ये मिश्रण वाटताना पाणी घालू नये.
या मिश्रणाचे एक इंचाचे घट्टा गोळे करून घ्यावे.
आवश्यक तेवढा जोर देऊन गोळे घट्ट करावेत जेणेकरून ते कढीत फुटत नाहीत.
दह्याचे पातळसर ताक करून पीठ टाकून मिसळून घ्यावे. कढीपत्ता, मीठ घालून उकळून घ्यावं.
तुपात, जिरे, हिंग, हळद, आलं-पेस्ट, मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी.
ताकात फोडणी घालावी.
चवीपुरती साखर घालावी.
कढीला उकळी आली कि आधी एक गोळा कढीत घालून बघावा की फुटत तर नाहीये नंतर हळू हळू गोळे सोडावे.
गोळे वर येऊ लागल्यावर गॅस बंद करावा.
चवीप्रमाणे वरुन लसणाची फोडणी करुन गोळ्यांवर घालावी आणि गरम गरम सर्व्ह करावे.
टीप: गोळ्याचं वाटलेलं मिश्रण जराश्या तेलात कढईत वाफवून घेतलं तरी गोळे फुटण्याची भीती नसते.