Publish Date: Tue, 03 Feb 2026 (08:00 IST)
Updated Date: Mon, 02 Feb 2026 (14:59 IST)
प्रत्येक महिला नेहमी काहीतरी खास पदार्थ बनवण्याचा विचार करत असते. खास करून कोणाचा वाढदिवस असले तर काय बनवावे?, असा विचार नेहमी असतो. जर तुमच्या सासूबाईंचा वाढदिवस असेल तुम्हाला त्यांना काही खास बनवून खाऊ घालायचे असेल तर नक्कीच तुम्ही चटपटीत पुदिना कचोरीची रेसिपी ट्राय करू शकतात.
साहित्य-
मैदा-२ कप
ओवा-अर्धा चमचा
गरम तेल (मोहन)-३-४ मोठे चमचे
मीठ-चवीनुसार
पाणी-पीठ मळण्यासाठी
सारणासाठी-
ताज्या पुदिन्याची पाने-१ मोठा कप (बारीक चिरलेली किंवा पेस्ट)
मुगाची डाळ- अर्धा कप (२ तास भिजवलेली आणि जाडसर वाटलेली)
हिरव्या मिरच्या-२-३ (बारीक चिरलेल्या)
आले-लसूण पेस्ट-१ चमचा
बेसन-२ मोठे चमचे (बाइंडिंगसाठी)
मसाले-धणे पूड, जिरे पूड, बडीशेप पूड, आमचूर पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला (प्रत्येकी १ छोटा चमचा)
मीठ-चवीनुसार
कृती-
कचोरीचे पीठ तयार करा
सर्वात आधी एका परातीत मैदा घेऊन त्यात मीठ, ओवा आणि कडकडीत गरम तेलाचे मोहन टाका. हाताने पीठ चोळून घ्या जेणेकरून कचोरी खुसखुशीत होईल. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मऊ पीठ मळून घ्या आणि १५-२० मिनिटे ओल्या कापडाखाली झाकून ठेवा.
पुदिना सारण तयार करा
आता कढईत थोडे तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिंग टाका. आता यात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि वाटलेली मुगाची डाळ टाकून परता. डाळ थोडी कोरडी झाली की त्यात बेसन आणि सर्व सुके मसाले टाका.शेवटी पुदिन्याची पेस्ट किंवा बारीक चिरलेला पुदिना टाकून २-३ मिनिटे परता. मिश्रण थंड होऊ द्या.
कचोरी वळा
आता पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची छोटी पुरी लाटा किंवा हाताने वाटीसारखा आकार द्या. त्यात १ चमचा पुदिना सारण भरा आणि कडा एकत्र जोडून कचोरी बंद करा. हाताने हलके दाबून कचोरी चपटी करा. आता कढईत तेल मध्यम गरम करा. कचोऱ्या तेलात सोडून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. मंद आचेवर तळल्यामुळे कचोरी आतून छान शिजते आणि वरून कुरकुरीत होते.
खास टिप्स-
पुदिन्याचा रंग: पुदिना जास्त काळ शिजवू नका, अन्यथा त्याचा रंग काळपट होतो.
बडीशेप: सारणात बडीशेप पूड नक्की वापरा, त्यामुळे पुदिन्याला एक छान स्वाद मिळतो. तसेच ही कचोरी चिंचेची चटणी किंवा तळीलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik