Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंब्यापासून बनवत असलेले विविध खाद्यपदार्थ

आंब्यापासून बनवत असलेले विविध खाद्यपदार्थ
, शुक्रवार, 21 मे 2021 (10:37 IST)
* आंब्याच्या पुऱ्या
साहित्य : दोन वाटय़ा मैदा, एक टे. स्पून डालडाचे मोहन, अर्धा चमचा मीठ, थोडा हापूस आंब्याचा रस, एक चमचा साखर.
कृती : आंब्याचा रस काढून ठेवावा. मद्याला तुपाचे मोहन चोळून घ्यावे. त्यात मीठ व थोडी साखर घालावी. मिक्सरमधून काढलेल्या आंब्याचा रस थोडा थोडा घालून पीठ भिजवावे. नंतर या पिठाच्या पुऱ्या लाटून तळाव्यात. केशरी रंगाच्या आंबट-गोड पुऱ्या चवीला छान लागतात.
 
* कच्च्या कैरीची सब्जी 
साहित्य : दोन कच्च्या कैऱ्या, दोन चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, मीठ, हळद, मिरची पावडर, आले पेस्ट, कोथिंबीर.
कृती : दोन कच्च्या कैऱ्यांची साले काढून बारीक तुकडे करावेत व कुकरमधून वाफवून घ्यावेत. वाफवलेले कैरीचे तुकडे कागदावर पसरावेत. दोन चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता व हिंग यांची फोडणी करून त्यात कैरीचे तुकडे घालून थोडेसे पाणी घालावे. नंतर बारीक गूळ, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा मिरची पावडर, आले पेस्ट घालून ढवळावे. नंतर कोथिंबीर चिरून घालावी.
 
* कैरीची उडद मेथी
साहित्य : अर्धी वाटी कैरीच्या फोडी, थोडी हळद, मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा मेथीचे दाणे, पाव चमचा उडदाची डाळ, दोन चमचे तांदूळ, अर्धी वाटी खोवलेले खोबरे, अर्धी वाटी नारळाचे दूध, गूळ (चवीसाठी).
कृती : करायच्या आधी थोडा वेळ कैरीच्या फोडींना हळद, मीठ आणि मिरची पूड लावून ठेवावी. धने, उडदाची डाळ आणि तांदूळ थोडेसे तव्यावर भाजून घ्यावेत. खोबरे, धणे, डाळ आणि तांदूळ एकत्र करून त्यांची गोळी वाटून ठेवावी. तेलावर हिंग, मेथी आणि थोडय़ा उडदाच्या डाळीची फोडणी देऊन त्यावर कैरीच्या फोडी घालाव्यात. वाफेवर थोडी शिजू द्याव्यात. फोडी साधारण शिजत आल्यावर त्यात वाटलेली गोळी घालावी. एक उकळी आल्यावर त्यात नारळाचे दूध व गूळ घालावा.
 
* कोयींची कढी
साहित्य : चिरलेल्या कैरीच्या ४-५ कोयी. (कोयी ताज्या असाव्यात), एक मोठा चमचा बेसन, मीठ, साखर, एखादी हिरवी किंवा लाल मिरची, फोडणीसाठी थोडेसे तूप, जिरे, किंचित हळद.
कृती : दोन-तीन वाटय़ा पाण्यात कोयी घालून चांगले उकळावे. थोडे गार झाल्यावर त्यात बेसनाची पेस्ट करून घालावी व आवडीनुसार मीठ व साखर घालावी व परत गॅसवर उकळत ठेवावे. नंतर एक छोटा चमचा जिरे, किंचित हळद, मिरचीचे दोन-तीन तुकडे व ४-५ पाने कढीपत्ता अशी फोडणी करून घालावी व कोमट कोमट वाढावी म्हणजे जास्त चव लागते.
 
* कैरीची पचडी
साहित्य : एक कप सोललेल्या कैरीच्या बारीक फोडी, मीठ, दोन टेबलस्पून गूळ, एक वाटी खवलेले खोबरे, एक चमचा जिरे, ४-५ हिरव्या मिरच्यांचा खर्डा, तेल, हिंग, मोहरीची खमंग फोडणी.
कृती : कैरीच्या फोडींना गूळ व मीठ चोळून थोडे मुरू द्यावे. खोबरे, मिरची, जिरे, थोडे पाणी घालून वाटून सरबरीत बनवा. त्यात कैऱ्या मिसळा. वरून हिंग-मोहरीची गार केलेली फोडणी मिसळावी.
 
* कैरीचे सार
साहित्य : दोन कैऱ्या उकडून, एक मोठा नारळ, तूप, जिरे, डाळीचे पीठ, साखर, मीठ, पाच-सहा हिरव्या मिरच्या.
कृती : कैऱ्या उकडून गर काढून मिक्सरमधून फिरवून घ्या. गरम पाणी घालून नारळाचे दूध काढावे व त्यात गर मिसळावा. वरील मिश्रणात डाळीचे पीठ घालावे. उकळी आल्यावर मीठ, साखर टाकावी व वरून तूप-जिऱ्याची मिरच्या घालून फोडणी द्यावी. (कैऱ्या मोठय़ा व आंबट असल्यास गर कमी चालेल)
 
* आंब्याचं कोयाडं
साहित्य : दोन रायवळ आंबे, एक हापूस आंबा, तीन चमचे तेल, दीड चमचा तिखट, मोहरीची पातळसर पेस्ट दोन चमचे, नारळाचा चव ३ ते ४ चमचे, मेतकूट २ चमचे, अर्धी वाटी उकळलेले गुळाचे पाणी, मोहरी, हिंग, हळद.
कृती : दोन्ही प्रकारचे आंबे थोडे कमी उकडून सोलून गर काढावा. कढईत तेल घालावे. मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. आंब्याच्या साली व बाठी गरातच ठेवाव्यात. मोहरीचे पाणी घालून फेटून दोन चमचे पातळसर पेस्ट करावी. ती गरात घालावी. तिखट-मीठ, नारळाचा चव, मेतकूट आणि गुळाचं पाणी घालावं. थंड झालेली फोडणी आणि सगळं छान एकत्र कालवावं.
 
* कांदा-कैरी-पुदिना 
साहित्य : एक कैरी, एक कांदा मोठा, एक गड्डी पुदिना, कोरडय़ा खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी मीठ, गूळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, हिंग, मोहरी.
कृती : पुदिना (नुसती पाने) स्वच्छ धुऊन निवडून घ्यावी. कैरी किसून घ्यावी. कांदा बारीक चिरावा. त्यात तिखट, मीठ, गूळ, कोिथबीर, मिरची सर्व एक करून बारीक वाटावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. वरून खमंग अशी तेलाची फोडणी घालावी.
 
* आम्रखंड
साहित्य : पाव किलो चक्का (सायीचा), २ आंब्यांचा रस, १ वाटी साखर.
कृती : चक्क्यामध्ये २-३ तास आधीच साखर मिसळून ठेवावी. नंतर ते मिश्रण पुरणयंत्रातून काढावे. त्यात हापूसच्या आंब्याचा सुरेख रंग व चव श्रीखंडाला येते.
 
* कैरी-लिंबाचं सार
साहित्य : एका कैरीचा कीस मिक्सरवर वाटून (किंवा एका लिंबाचा रस किंवा आमसूल सहा-सात), गूळ अर्धी वाटी, चार-पाच लाल मिरच्या, मीठ, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, चार कप पाणी.
कृती : पातेलीत एक मोठा चमचा तेल घ्यावं. त्यात मिरच्या, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात पाणी घालून उकळी आल्यावर लिंबाचा रस (किंवा कैरीचा गर किंवा आमसूल) घालावा. गूळ (किंवा साखर) व मीठ घालून उकळावं. आमसूल असल्यास काढून टाकावी. आजारपणात किंवा मूगडाळीच्या खिचडीबरोबर छान लागतं.
 
* आंबा टिक्की
साहित्य : एक हापूस आंबा, पाव किलो खवा, वेलची पावडर, काजू-बदाम काप, दूध पावडर १०० ग्रॅम, साजूक तूप.
कृती : खवा कढईत मंद आचेवर गुलाबीसर भाजावा. गार झाल्यावर त्यात आंब्याच्या बारीक फोडी घालाव्यात. हलक्या हाताने मिश्रण एकजीव करावे. त्याच्या छोटय़ा छोटय़ा टिक्क्या बनवाव्यात. दूध पावडरीत घोळवाव्यात. मंद आचेवर पॅनमध्ये साजूक तूप घालून त्यावर टिक्क्य़ा ठेवाव्यात. हलक्या हाताने परताव्यात. तूप सोडावे. नातवंडांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वाना आवडेल असे खास पक्क्वान्न!
 
* आंब्याचा सुधारस
साहित्य : एक वाटी साखर, पाव वाटी नारळाचा चव, आंब्याचा गोळा, १०-१५ काजू तुकडे, २ चमचे वेलची पूड, केशर, थोडा लिंबाचा रस (आवडीप्रमाणे)
.कृती : प्रथम साखरेत पाणी घालून पाक होत आला की नारळाचा चव व आंबागोळी घालून उकळावे, कारण पाणी सुटते. पाक तयार झाला की खाली उतरून ठेवा. नंतर काजू, वेलची पूड, लिंबाचा रस घाला. शेवटी केशर घाला. गरम व गार दोन्ही छान लागते. पुरी, पोळी, ब्रेडबरोबर मुलांना आवडेल. फ्रिजमध्ये दोन आठवडे चांगले राहते.
टीप : आंबा रसाचा आटवून केलेला गोळा बाजारात तयार मिळतो.
 
* आंब्याचे मोदकउकड 
साहित्य : २ वाटय़ा तांदळाचे पीठ चाळून घ्यावे, दीड वाटी पाणी, १ वाटी आंब्याचा रस, १ मोठा चमचा रिफाइंड तेल, १ चिमूट मीठ.
सारण साहित्य : १ कोवळा नारळ (अडसर) खवून, ८ चहाचे चमचे साखर, ४ वेलच्यांची पूड, २ मोठे चमचे बेदाणे, अर्धी वाटी दूध.
सारण कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध, नारळ व साखर एकत्र करून गॅसवर ठेवावे. अधूनमधून ढवळत राहावे. साखर व दूध आटल्यावर, साधारण कोरडे झाल्यावर गॅसवरून उतरवावे. त्यात बेदाणे व वेलचीची पूड घालून ढवळावे.
उकड कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ व तेल घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पीठ व आंब्याचा रस घालून ढवळावे. झाकण ठेवून चांगली वाफ द्यावी. ही उकड गरम असतानाच पाणी लावून मळावी. वरील सारण भरून हाताने व साच्याने त्याचे मोदक बनवावे. या मोदकांवर ओला फडका ठेवावा अथवा बाजारात मिळते ती ‘क्लिंग फिल्म’ लावावी. आयत्या वेळी कुकर अथवा चाळणीवर राहील अशा कोणत्याही पातेल्यात पाणी घालावे. वर चाळणीत राहतील तेवढे (एकावर एक न ठेवता) मोदक ठेवावेत. वर दुसरे पातेले उपडे ठेवावे. (अर्थात मोदक-पात्र वापरणे आदर्शच.) मोदकांना चांगली वाफ द्यावी. सुमारे १० ते १५ मिनिटे असे सगळे मोदक वाफवावे. गरमच वाढावे.

* आंबा-केळी शिकरण
साहित्य : १ आंबा पिकलेला, २ केळी तयार झालेली, ४ वाटय़ा दूध, ४ मोठे चमचे साखर.
कृती : साखर घालून दूध गार करावे. आंब्याचे बारीक तुकडे करून तेही गार करावेत. दुधात केळी कुस्करून नेहमीसारखी शिकरण करावी व त्यात आंब्याचे तुकडे घालावेत. ही तयार शिकरण वाढण्याच्या वेळेपर्यंत फ्रिजमध्येच ठेवावी.
 
* आंब्याचा शिरा
साहित्य : २ वाटय़ा जाड रवा भाजलेला, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर (अथवा आवडीप्रमाणे बदलावे), २ मध्यम आकाराचे आंबे (शक्यतो हापूस), १० काडय़ा केशर, २ मोठे चमचे मनुका, चिमूटभर मीठ.
कृती : एका आंब्याच्या बारीक फोडी कराव्यात व एका आंब्याचा रस काढावा. केशर कोमट दुधात वा पाण्यात भिजवावे. मनुका साध्या पाण्यात भिजत ठेवाव्यात. तुपात रवा परतून त्यात चार वाटय़ा उकळते पाणी घालून झाकण घालून एक वाफ येऊ द्यावी. झाकण काढून शिजलेल्या रव्यात साखर, आंब्याचा रस व तुकडे घालून ढवळावे. मीठ व मनुकाही घालाव्यात व परत झाकण ठेवावे. 
चांगली वाफ आल्यावर व शिरा तयार झाल्यावर त्यात भिजवून खललेले केशर घालून मिसळावे. शिरा गरमच खावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम व्यायाम शंखनाद, आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या