साहित्य : १/२ किलो पालक, १०० ग्रॅम्स पनीर, १/४ चमचा खायचा सोडा, १ मध्यम कांदा, ६ पाकळ्या लसूण, १ इंच आले, ४ हिरव्या मिरच्या, अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर१ टेबलस्पून कसूरी मेथी, १ टेबलस्पून धणे पावडर, १ टी स्पून जिरे पावडर, पाव वाटी तेल, १०० ग्रॅम्स अमूल बटर, फेटलेले क्रीम (सजावटीसाठी)कृती :
पालकाची पाने धुऊन घ्या. एका पातेल्यात पालकाची पाने, पाव टीस्पून खायचा सोडा, एक सपाट टी स्पून मीठ आणि पाने बुडतील एवढे पाणी घालून, झाकण न ठेवता शिजवून घ्या. पालक शिजल्यावर त्यातील उकळते पाणी फेकून देऊन त्यावर लगेच थंड पाणी ओता. (फ्रिज मधील असल्यास उत्तम.) पालक थंड झाला की पाणी निथळवून, मिक्सर मधून फिरवून त्याची मुलायम पेस्ट करून घ्या.
पनीरचे १ सेंटी जाडीचे आणि एक स्क्वेअर इंचाचे तुकडे करून घ्या.
कांदा बारीक चीरून घ्या, आले-लसूण-हिरवी मिर्ची वेगवेगळे बारीक चॉप करून घ्या.
पातेल्यात मध्यम आंचेवर तेल आणि बटर तापवून घ्या. आंच जास्त झाली तर बटर जळेल हे लक्षात असू द्या. बटर वितळून तेल जरा तापले की त्यात चॉप केलेला लसूण टाकून चांगला लाल होई पर्यंत परतून घ्या. लसूण लाल झाला, त्याचा मस्त खमंग वास सुटला, की त्यावर चिरलेला कांदा, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिर्ची टाकून कांदा जरा परतून घ्या.
कांदा परतून त्याला तेल सुटले की त्यावर पालक पेस्ट, कसूरी मेथी, धणे-जीरे पावडर चवी प्रमाणे मीठ टाकून, पालक पेस्ट नीट परतून घ्या. पुन्हा तेल सुटले की पनीरचे तुकडे टाकून हलक्या हाताने मिसळून घ्या. गॅस वरून उतरवा. पालक पनीर तयार आहे.