8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो, हे आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे. माध्यमांमध्ये याबद्दल बोललं जातं, विविध व्यासपीठांवरही त्याची चर्चा होते.
जवळपास गेली शंभर वर्षं 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होत आहे.
पण महिला दिन नेमका साजरा कशासाठी केला जातो? त्याची सुरुवात झाली कशी? महिला दिन सेलिब्रेशन आहे की निषेध? महिला दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरूष दिन साजरा केला जातो का? यावर्षी कोरोनामुळे महिला दिनानिमित्त कोणते व्हर्चुअल कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत?
1. महिला दिनाला कधीपासून सुरूवात झाली?
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उगम हा कामगार चळवळीतून झाला. संयुक्त राष्ट्रांकडून नंतर या दिवसाला दरवर्षी होणारा कार्यक्रम म्हणून मान्यता मिळाली.
1908 साली घडलेल्या एका घटनेनं ठिणगीप्रमाणे काम केलं. न्यूयॉर्क शहरात त्यावर्षी 15 हजार महिलांनी मोर्चा काढला होता. कामाचे तास मर्यादित असावेत, योग्य वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार असावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेनं त्याच्याच पुढच्या वर्षी हा दिवस 'राष्ट्रीय महिला दिन' म्हणून घोषित केला.
हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला जावा, ही कल्पना क्लारा झेकिन या महिलेनं मांडली. 1910 साली कोपेनहेगन इथं भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमेनमध्ये क्लारा यांनी ही कल्पना मांडली. या कॉन्फरन्सला 17 देशांमधल्या शंभर महिला उपस्थित होत्या. त्या सर्व जणींनी ही कल्पना उचलून धरली.
1911 साली पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. 2011 साली महिला दिनाची शताब्दी साजरी करण्यात आली. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं 110 वं वर्ष आहे.
अर्थात, 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी जेव्हा हा दिन साजरा केला, तेव्हापासून कृतरित्या आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाऊ लागला. संयुक्त राष्ट्राने 1996 साली पहिल्यांदा महिला दिनासाठी थीम निवडली...'भूतकाळाचं सेलिब्रेशन, भविष्याचं नियोजन.'
समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांत महिलांनी आतापर्यंत जी प्रगती केली आहे, ती साजरा करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर आजही अस्तित्त्वात असलेल्या असमानतेविरोधात आवाज उठविण्यासाठी संप किंवा आंदोलनासारखे मार्गही अवलंबले जातात.
2. कुठून आली 8 मार्च ही तारीख?
क्लारा यांनी जेव्हा महिला दिन साजरा करण्याची कल्पना मांडली, तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही निश्चित तारीख नव्हती. पहिलं महायुद्ध सुरू होईपर्यंतही महिला दिनाची तारीख ठरली नव्हती.
1917 साली पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान रशियन महिलांनी 'ब्रेड आणि शांती'ची मागणी केली होती. महिलांनी आपल्या मागण्यांसाठी संपही पुकारला होता. झारनं पदत्याग केला आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या पर्यायी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
महिलांनी हा संप पुकारला होता, त्याची तारीख रशियात वापरल्या जाणाऱ्या ज्युलियन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारी होती. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार ही तारीख होती- 8 मार्च. आणि म्हणूनच तेव्हापासून महिला दिन 8 मार्चला साजरा होतो.
3. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं प्रतीक म्हणून कोणते रंग वापरले जातात?
जांभळा, हिरवा आणि पांढरा रंग आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं प्रतीक म्हणूनही वापरले जातात.
"जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आशेचा रंग आहे. पांढरा रंग हा पावित्र्याचा समजला जातो. या रंगांची संकल्पना 1908 साली युनायटेड किंग्डममध्ये भरविण्यात आलेल्या विमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियनमध्ये पहिल्यांदा मांडली गेली," असं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कॅम्पेनमध्ये म्हटलं आहे.
4. आंतरराष्ट्रीय पुरूष दिनही साजरा होतो?
हो, असाही दिवस असतो. 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा केला जातो.
अर्थात, आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करायला 1990 पासूनच सुरूवात झाली आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला मान्यता दिली नाहीये. जगभरात 80 पेक्षा अधिक देशांमध्ये पुरूष दिन साजरा होतो, यामध्ये युनायटेड किंग्डमचाही समावेश होतो.
जगामध्ये पुरूष जी सकारात्मक मूल्य रुजवातात, त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी जे योगदान देतात, ते सेलिब्रेट करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.
गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाची संकल्पना होती, बेटर हेल्थ फॉर मेन अँड बॉइज.
5. कसा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन?
आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अनेक राष्ट्रांमध्ये महिलांना सुट्टी दिली जाते. रशियामध्ये 8 मार्चच्या आसपासच्या तीन-चार दिवसांमध्ये फुलांचा खप मोठ्या प्रमाणावर वाढतो.
चीनमध्ये 8 मार्चला महिलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याची पद्धत आहे. स्टेट काऊन्सिलकडूनच तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही अनेक कार्यालयांमध्ये महिलांना ही सुट्टी दिली जात नाही.
इटलीमध्येही एका अनोख्या पद्धतीनं 8 मार्च साजरा होतो, तर अमेरिकेत आंतरराष्ट्रीय महिला दिन हा विमेन्स हिस्ट्री महिना म्हणून साजरा होतो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अनेक राष्ट्रांमध्ये महिलांना सुट्टी दिली जाते. रशियामध्ये 8 मार्चच्या आसपासच्या तीन-चार दिवसांमध्ये फुलांचा खप मोठ्या प्रमाणावर वाढतो.
यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात अनेक ठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम व्हर्चुअली साजरे केले जाण्याची शक्यता आहे.
6. यंदाच्या महिला दिनाची संकल्पना काय आहे?
यावर्षीच्या महिला दिनाची संकल्पना #ChooseToChallenge ही आहे. "आपण सर्व रुढ गोष्टींना आव्हान देऊ शकतो आणि लिंग असमानता तसंच भेदभावाविरोधात आवाज उठवू शकतो. आपण सगळे महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करू शकतो. एकत्रितपणे आपण सर्वजण मिळून एक सर्वसमावेशक समाज घडवू शकतो."
लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही केलं जात आहे.
7. महिला दिनाची गरज आहे का?
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कॅम्पेनमध्ये म्हटलं आहे, "जवळपास शतकापासून लिंग असमानता अस्तित्वात आहे. अनेकजणींनी आपल्या हयातीत लिंग समानता अनुभवलेली नसते आणि त्यांच्या पुढच्या पिढीलाही ती पहायला मिळेल याची शक्यता नसते."
संयुक्त राष्ट्रांच्या महिलांसंबंधीच्या आकडेवारीनुसार कोरोना काळात गेल्या 25 वर्षांपासून लिंग समानतेसाठी झालेले सर्व प्रयत्न पुसले जाऊ शकतात. संसर्गाच्या काळात महिला मोठ्या प्रमाणावर घरातील कामं करायला लागल्या. लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच पडली. या सगळ्याचा परिणाम त्यांना कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या संधींवर तसंच शिक्षणावरही होऊ शकतो.
गेल्यावर्षी कोरोना संसर्गाचा धोका जाणवत असतानाही जगभरात अनेक ठिकाणी महिला दिनाच्या दिवशी मोर्चे काढण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश मोर्चे हे शांततामय होते. मात्र किर्गिस्तानच्या राजधानीत पोलिसांनी अनेक महिला हक्क कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. महिला दिनाच्या मोर्च्यावर काही बुरखाधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
महिला दिनाच्या मोर्च्यांच्या विरोधात दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांना न जुमानता पाकिस्तानातल्या अनेक शहरात महिलांनी कार्यक्रम आयोजित केले होते.
महिलांवर होत असलेल्या हिंसाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी मेक्सिकोमध्ये 80 हजार लोक रस्त्यावर उतरले होते. यामध्ये 60 जण जखमीही झाले होते. खरंतर हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं सुरू झालं होतं, पण नंतर काही गटांनी पेट्रोल बॉम्ब फोडले आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करण्यात आला.
गेल्या काही वर्षांमध्ये आपण महिलांची प्रगती पाहिली त्याचप्रमाणे महिलांच्या चळवळीही वाढत गेल्या.
यावर्षीची सुरूवात कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीनं झाली. त्या अमेरिकेच्या पहिल्या एशियन-अमेरिकन वंशाच्या उपाध्यक्ष बनल्या, तसंच त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत.
2019 साली फिनलँडमध्ये नवीन आघाडी सरकार निवडून आलं, ज्यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. आर्यलंडमध्ये गर्भपात गुन्हा समजला जाणारा कायदा रद्द करण्यात आला आहे.
2017 साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळवणुकीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या #MeToo चळवळीचा उल्लेखही करायला हवाच.