बाईचा जन्म किती पुण्याचा म्हणावा ना... आत्म्याला स्त्री-पुरुष भेद नसतो पण आत्म्याने स्त्री रुपी शरीरात जन्म घेतला की तिने केलेले व्रत- वैकल्य याचे पुण्य मात्र कुटुंबाला लागतात... कमालीची संकल्पना आहे... एकदा व्रत धरले की नेम जन्मभर चुकायला नको बरं... अशात चुकुन एखाद बिस्किट तोंडात गेलं तर शिक्षित महिलेला देखील दोष आणि भीतीचं वारं स्पर्श करुन जातं... लग्नासाठी सुयोग्य वर मिळावं म्हणून सुरु झालेले उपास आजन्म पिच्छा सोडत नाही बरं का...
लग्न झालं की नवर्याच्या दिर्घायुष्यासाठी व्रत... संतान प्राप्तीसाठी व्रत मग मुलांसाठी.... या दरम्यान घर, ऑफिस, शेती किंवा पोटापाण्यासाठी सुरु असलेल्या कामापासून काही विशेष सवलत मिळण्याचा प्रश्न तर नाहीच...उलट या दरम्यान होणार्या पूजा-भजन सोहळ्यासाठी वेगळ्याने वेळ काढायचा असतो... यात मजा असली तरी भूख-तहानलेल्या शरीराने मनाने आनंदी व्हायचं तरी कसं... एकेकाळी हे सर्व जुळत ही असेल कदाचित... पण हल्ली जागरणं आणि दुसर्या दिवशी पुन्हा तिच धावपळ...
पण कधी पुरुषाने बायकोच्या आरोग्यासाठी एखादा उपास केल्याचे ऐकले आहे का ? धार्मिक कहाण्यांमध्ये स्त्रीने व्रत न केल्याचे इतके वाईट उदाहरण मांडून ठेवलेले आहेत की स्त्री आजारी असली तरी काही न खाता-पिता पाप लागेल किंवा काही अपशकुन घडेल म्हणून आपले हाल करत असते... एकेकाळी मनासारखा पती प्राप्त करण्यासाठी तर मृत पतीला यमराजकडून वापस मिळवण्यासाठी देवीतुल्य स्त्रियांनी केलेले तप खरोखर पूजनीय होते... पण पितृसत्ता कायम ठेवण्यासाठी महिलांवर व्रत लादले तर गेले नाही हे मात्र विचारणीय आहे..
परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक धर्मात भीतीचा सहारा घेतला जातो. आधी विटाळ म्हणून चार दिवस स्त्रीला लांब ठेवाण्याचा त्यात देखील तिच्याकडून चूक घडली असावी तर ते फेडण्यासाठी पुन्हा व्रत... वर्षभराचे सण साजरे करताना घरातील लक्ष्मी असल्याचा मान मिरवण्यापेक्षा काही चूक तर होत नाहीये या भीतीपोटी तिचा आनंदच उडून जातो.. यात घरोघरी पोहचलेल्या मालिका आपली संस्कृती जपून ठेवण्याचा ठेका घेतल्यासारखं केवळ टीआरपी कडे लक्ष देतात हे भोळ्या बायकांना कळतच नाहीये का... ही करमणूक नकळत स्त्रियांच्या जीवनात अडचणींना भर घालत आहेत...
पतीला परमेश्वराच्या बाजूला बसण्याची श्रेष्ठता ज्या ग्रंथांनी दिली ते पुरुषांनी लिहिले असावे हे मात्र निश्चित... शास्त्राप्रमाणे स्त्रियांनी व्रत करावे आणि पुरुषांनी तपश्र्च्या करावी... मग नक्की असं घडतंय का ? कारण पुरुषांना वेळ कुठे हा बहाणा आहेच... मात्र स्त्रीने काळांतराने तिच्या कर्तव्यात कितीही बदल घडले असले तरी पुरुषांसाठी व्रत मात्र सुरुच ठेवले... मग तो पती असो वा पुत्र... पुत्रीसाठी कधी कोणते व्रत आहे का?
स्त्रीला मान देखील कुंकू टिकेपर्यंत.. जन्मभर कुंटुबासाठी झटणार्या महिलेचं स्वत:चं अस्तित्व नाही.. शेवटी अर्थ हाच की पुरुषाने जगावे मात्र स्त्रीच्या मरण्याने समाजाला काहीही फरक पडत नाही... आणि कदाचित पडणार ही नाही... म्हणून तर गर्भातच होतो त्यांचा अंत... पण कमालीची बाब ही आहे की स्त्रियांवर दबाव टाकणात कुणे पुढे असेल तर तर त्या स्त्रियाच... परंपरा, प्रथा, भीती वा अपराधबोध काही म्हणा... त्यांना स्वत:च कळत नाही की या गोष्टी खूप व्यवस्थिपणे घडवून आणलेल्या आहेत... वर्षोंनुवर्षे ओल्या मातीने भांडी घडवतानाच त्यांना आकार दिला गेला आहे...
खरं तर उपास करणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे नाही पण प्रत्येकाची शारीरिक रचना वेगवेगळी असते... म्हणून उपवास हा भीतीपोटी नव्हे तर उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ताण न घेता योग्यरीत्या करावे.