माझ्यातील आतल्या 'मी' ला
माझ्यातील बाहेरच्या 'मी' नं
सहज साद घातली
चार घटका
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू
म्हणून चटकन बैठक मारली.
बाहेरचा 'मी' चांगलाच गोष्टीवेल्हाळ
शब्दामागून शब्द संपेचनात्
घटनांचं गुर्हाळ आवरेचना
आतला 'मी' मात्र गप्पगप्पच
एखादाच उद्गार,
क्वचित ओठांची मुरड
फारच झालं तर भिवईचं उंचावणं
अती झालं तेव्हा एकच सांगणं निर्वाणीचं
'कशाला भुलवतोस स्वत:ला
आणि दुसर्यालाही।
थोडं आत बघ
तुझी हुबेहुब छबी
कोरली गेली आहे येथे
त्यावर उसनं नक्षीकाम
रंगरंगोटी कशाला करतोस?
एकाच पावसात सगळं पार धुऊन निघेल.
आपल रूप माझ्यात पाहयला लागशील
तेव्हा सगळं भरून पावशील'