Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिला दिनी...'दीन' महिला?

महिला दिनी...'दीन' महिला?

संदीप पारोळेकर

MH GovtMH GOVT
मार्च महिन्याच्या पूर्वसंध्येलाच महिला संघटनाना जागतिक महिला दिनाचे डोहाळे लागतात. गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जा‍ताना दिसत आहे. सासूरवाशीण ज्याप्रमाणे आखाजी सणाची वाट पाहते, त्याचप्रमाणे महिला क्लबपासून तर गावपातळीवरच्या महिला बचत गटातील महिला या 'महिला दिनाची वाट पाहत असतात. हा दिन आता जणू उत्सव झाला आहे. परंतु, या उत्सवाची कार्यक्रमाचा पाया ज्यांनी रचला त्या भगिनींचा मात्र त्यांना विसर पडतो.

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली केली, त्यांचे ऋणही व्यक्त केले जात नाहीत. महिलाच्या अधिकारासाठी ज्यांनी संघर्ष केला, स्वत:चे जीवन खर्ची घातले, सरकार, समाज तसेच पुरूषप्रधान संस्कृतीशी प्रचंड संघर्ष करून एक उज्ज्वल भविष्य आपल्याच भगिनींच्या ओटीत घातले, अशांचेच या प्रसंगी विस्मरण होताना दिसते आहे. महिला मंडळे, महिलांचे क्लब मात्र किटी पार्टी आयोजनात वर्षभर दंग असतात. महिला दिनी प्रेरणात्मक कार्यक्रमाऐवजी उत्सवी आयोजनावरच त्यांचा भर दिसून येतो. आपला कार्यक्रम इतरापेक्षा कसा चांगला होईल, अशी चुरस महिला मंडळांमध्ये निर्माण होते. जागतिक ‍महिला दिन कशासाठी साजरा करायचा? आम्हाला त्याची काय आवश्यकता? असे प्रश्न विचारणार्‍या महिलाही या पुढारलेल्या समाजात आहेत.

पुरूषाच्या तुलनेत महिलाना किमान प्राथमिक अधिकार तरी प्राप्त व्हावे, यासाठी ज्या थोर महिलांनी प्रचंड संघर्ष करून महिलाना अधिकार मिळवून दिले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा हा दिवस आहे. त्यांनी केलेल्या महान कार्यातून प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे. या दिवशी समाजातील महिला संघटनांनी एकत्र येऊन समाजातील मागे राहिलेल्या महिलाचा विकास करण्‍याचा संकल्प करण्‍याचा हा दिवस आहे. मात्र समाजातील महिलाच्या दयनीय अवस्थेकडे पहायला महिलांनाच वेळ नाही.

यातल्या अनेक महिलांना आपल्यासाठी कोणते अधिकार असतात, हेच जर त्यांना ना माहीत नाही, त्या महिला काय संघर्ष करणार? महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागात राहणार्‍या महिलाना 'जागतिक महिला दिन' ही काय भानगड आहे हेच माहित नाही, इतक्या त्या 'दीन' आहेत. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या सातपुड्याच्या डोंगराईत अतिशय मागासलेले जीवन जगत आहेत. या महिला शिक्षणापासूनच काय तर सगळ्यात गोष्टीपासून तुटल्या आहेत.
webdunia
PR
PR


सातपुड्यातील महिलानी कधी शाळेचे तोंड पाहिलेले नाही. पोटासाठी त्यांना दिवस रात्र पायपीट करावी लागत असते. दळणवळणाची साधने नसल्याने गरोदर महिलांना प्रसुतीसाठी दवाखान्याअभावी मरण यातना सहन कराव्या लागतात. प्रसुती दरम्यान मरण पावलेल्या आदिवासी महिलांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. आता शासनाने आश्रमशाळा, प्राथमिक शाळा सुरू केल्या आहेत. परंतु, दररोज शाळेच्या पटावर बोटावर मोजण्याइतकीच संख्या असते. शिक्षणाअभावी तेथील महिलांच्या जीवनातून अजूनही अंधार नाहीसा झालेला नाही.

मानसिक व शाररिक परिपक्व न झालेल्या वयातच आदिवासी समाजात लग्न केली जातात. वयाच्या 14-15 वर्षातच त्या आई होतात. ज्या समाजातील महिलाच अज्ञानी असतील तर त्या समाजाच्या पुढच्या पिढीचे काय होईल?

सामाजिक संघटना, महिला मंडळांनी आपआपसातील कार्यक्रमाची स्पर्धा थांबवून समाज्यातील ज्या महिला मागे असतील, त्यांना मार्ग सूचत नसेल, त्यांना मागदर्शन करून योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे.

जागतिक महिला दिनी महिला संघटनानी एकत्र येऊन मागासलेल्या महिलाना प्रवाहात आणण्यासाठी अतिदुर्गम भागात जाऊन मार्गदर्शन शिबिर घेतले पाहिजे. त्यांना अधिकाराविषयी जाणीव करून दिली पाहिजे. महिलासाठी शासनाने राखीव ठेवलेले हक्क, सुविधा याविषयी माहिती दिली पाहिजे. सामाजिक संघटनांनी अतिदुर्गम भागात जाऊन तेथील महिलांच्या दीनतेवर अभ्यासपूर्ण संशोधन करून महिलांच्या समस्या शासनदरबारी मांडल्या पाहिजेत, तरच जागतिक महिला दिनाचा उद्देश खर्‍या अर्थाने सार्थक ठरेल....

Share this Story:

Follow Webdunia marathi