मुंबई- लंडन आणि मॉरिशसमधून परतलेले तीन आंतरराष्ट्रीय प्रवासी बुधवारी मुंबईत कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या प्रवाशाच्या संपर्कात आलेली एक व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या चार नवीन रुग्णांसह मुंबईतील ओमिक्रॉन संशयित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका वाढत आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, 'नोंदलेल्या सर्व नवीन प्रकरणांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत.' दक्षिण आफ्रिकेतून परत आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे 767 नवे रुग्ण आढळून आले असून, साथीच्या आजारामुळे आणखी 28 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी आरोग्य बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या ताज्या आकडेवारीसह, महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण संक्रमित लोकांची संख्या 66,36,425 झाली आहे, तर एकूण मृतांची संख्या 1,41,025 वर पोहोचली आहे. बुलेटिनमध्ये म्हटले आहे की बुधवारी 903 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर राज्यात आतापर्यंत संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या 64,84,338 झाली आहे. त्याचबरोबर 7 हजार 391 रुग्ण उपचार घेत आहेत.