नवीन कृषी कायद्याविरोधात सोमवारी काढण्यात येणार्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या मोर्च्यावर पोलिसांकडून ड्रोनची नजर राहणार आहे. शंभरहून अधिक पोलीस अधिकारी, पाचशे पोलीस कर्मचारी आणि नऊ राज्य राखीव दलाच्या तुकड्या बंदोबस्तकामी ठेवण्यात आले आहे. स्वत पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे बंदोबस्ताची पाहणी करीत आहेत.
नवीन कृषी कायद्याविरोधात सोमवारी मुंबई शहरात भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीनंतर मुंबईत शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याला कुठेही गालबोट लागू नये, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शुक्रवारपासून मुंबई पोलिसांनी नाकाबंदी सुरू करुन पूर्व आणि पश्चिम दुतग्रती महामार्गावरुन येणार्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू केली आहे. वाहनांची तपासणी करुनच त्यांना मुंबई हद्दीत प्रवेश दिला जात आहे. या मोर्चाला राज्यभरातून लाखो शेतकरी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या सर्व अधिकार्यांना आपल्या परिसरात लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
या मोर्चावर मुंबई पोलिसांकडून ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांशी पोलिसांनी कॉर्डीनेशन ठेवले असून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोर्चासाठी शंभर पोलीस अधिकारी, पाचशे पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचीही त्यांना मदत होणार आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, तसेच बंदोबस्तात अजिबात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केला आहे.