Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' दिवशी दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजन

'या'  दिवशी दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजन
, मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (23:11 IST)
मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर, गुरुवार (९ सप्टेंबर २०२१) रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही.
 
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेत प्रारंभी क्रमाक्रमाने प्राधान्य गट आणि त्यानंतर  १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
 
लसीकरणासाठी मुंबई महानगरात महानगरपालिका व शासकीय रुग्णालये मिळून ३२० तर खासगी रुग्णालयात १३० अशी एकूण ४५० कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण ७१ लाख २४ हजार ८२० लाभार्थ्यांना (७९ टक्के) लसीची पहिली मात्रा तर २८ लाख ५० हजार ५५४ एवढ्या लाभार्थ्यांना (३१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
 
शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ आदेशांमधील सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी उपनगरीय रेल्‍वेप्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच काही खासगी आस्थापना देखील पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱयांना कार्यालयात उपस्थित राहण्याची अनुमती देत आहेत.
 
यानुषंगाने, दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांसाठी लस मात्रांच्या उपलब्धतेनुसार विशेष लसीकरण सत्र सर्वप्रथम ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले हेाते. या लसीकरण सत्रास नागरिकांचा उत्‍तम प्रतिसाद मिळाला आणि त्यादिवशी १ लाख ७९ हजार ९३८ लाभार्थ्‍यांना दुसरी मात्रा देण्‍यात आली.
 
हा प्रतिसाद लक्षात घेता तसेच नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची प्राथमिकता पाहता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर ९ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱया लाभार्थ्‍यांसाठी पुन्हा एकदा विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. सबब, दुसरा डोस देय असणाऱया नागरिकांनी सदर सत्राचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्‍यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता