आगामी लोकसभेच्या निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शहर आणि उपनगर यांच्या विनंतीवरून मुंबई महापालिकेने आपल्या विविध खात्यातील 7 हजार 500 अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. यामध्ये, महापालिकेच्या आरोग्य, आपत्कालिन व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पाणी पुरवठा यांसारख्या अत्यंत महत्वाच्या खात्यातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांनाही निवडणूक कामाला घेतले त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूक कामकाजासाठी खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अखत्यारितील सोबत क संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाकरिता त्वरित जिल्हाधिकारी, मुंबई शहर आणि उपनगरे कार्यालयात पाठवावे. यापूर्वी निवडणूक कामाकरिता पाठवलेले कर्मचारी वगळून सोबत जोडलेल्या यादीतील कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यादीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येएवढे कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश महापालिका प्रमुख कामगार अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते.