मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी गोंधळ पहायला मिळाला. प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या गैरव्यवस्थापनाचा फटाका प्रवाशांना बसत आहे. यात 30 हून अधिक प्रवाशांची फ्लाईट मिस झाल्याचे समजते.
राज्या निर्बंधात दिलेली शिथिलता आणि वाढत असलेल्या लसीकरणाच्या प्रमाणाचा थेट प्रभाव दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर या गर्दीने कळस गाठला. प्रवेशद्वार तसेच चेक इन काउंटरवर सुरक्षारक्षक कमी असल्यामुळे प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या. रांगा इतक्या वाढल्या की विमान सुटण्याची वेळ झाली तरी प्रवाशांना प्रवेश मिळत नव्हता.
त्यामुळे संतप्त प्रवाशांनी सुरक्षारक्षक आणि एअरपोर्ट व्यवस्थापकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. फ्लाईट सुटत असल्यामुळे काहींना क्यू लॉक तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
मुंबई हैदराबाद विमान 15 हून अधिक प्रवाशांना न घेताच निघून गेले. इतर 15-20 प्रवाशांसोबत देखील असेच घडले. त्यामुळे विमानतळावर धावाधावा सुरु झाली. काही काळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसात कोरोनामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने टर्मिनल 1 बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे त्यामुळे भार होत असल्याचे समजते.
नवरात्री आणि विकेंडच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विमानतळावर अभूतपूर्व गर्दी झाली. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली. येत्या 20 ऑक्टोबरपासून टर्मिनल 1 खुले होणार आहे.