Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाचे समूळ उच्चाटन नाही; टाळेबंदीबाबत २-३ दिवसांत निर्णय - महापौरांचे संकेत

कोरोनाचे समूळ उच्चाटन नाही; टाळेबंदीबाबत २-३ दिवसांत निर्णय - महापौरांचे संकेत
, मंगळवार, 13 जुलै 2021 (15:36 IST)
दुकाने नियमित खुली ठेवण्याची मागणी करीत आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. काही राजकारणी व्यापाऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप करीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोन-तीन दिवसांमध्ये टाळेबंदीबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
 
मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. मात्र त्याचे समूळ उच्चाटन झालेले नाही. काही भागांमध्ये कोरोनाचा अजूनही प्रादुर्भाव आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत टाळेबंदीचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.येत्या गुरुवारी टाळेबंदीबाबत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यात सध्याच्या नियमात काही प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही,असं किशोरी पेडणेकर यांनी सागंतिलं.
 
तत्पूर्वी, राज्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सोमवारी राज्यात १५ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.१५ टक्क्यांवर गेला आहे. राज्यात सोमवारी ७ हजार ६०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १५ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण १ लाख ०८ हजार ३४३ इतकी आहे.
 
दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी ४१ लाख ८६ हजार ४४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ६५ हजार ४०२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.राज्यात ५ लाख ८२ हजार ४७६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ६५४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
 
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत सोमवारी २४ तासांत केवळ ४७८ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७०१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ६३६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ७ हजार १२० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ९२६ दिवसांवर गेला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षण :राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला