पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. रश्मी शुक्ला या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. सध्या त्यांचा चार महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. मात्र, याआधीच रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. रश्मी शुक्ला आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक होते. यानंतर अखेर त्यांना दोन वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात नोटिफिकेशन काढून माहिती दिली आहे.
रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आल्या होत्या. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, पुढे न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली होती. फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी नेत्यांचे फोन बेकायदेशीर रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
Edited by: Ratnadeep Ranshoor