मुंबईच्या पालघर येथे शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 मोजण्यात आली. कोणतीही जनधन हानी झाल्याचे वृत्त नाही. सकाळी 6:35 वाजेच्या सुमारास भुकंम्पाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता.
तसेच डहाणू तालुक्यात कांसा, गंजाड, धुंदलवाडी परिसरात आज सकाळी तीव्र आणि सौम्य असे दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंपाचा धक्का सकाळी 6:35 वाजेच्या सुमारास आणि दुसरा धक्का 6:40 च्या सुमारास जाणवला. एकाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली.
भूकंपापामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. पालघर जिल्ह्यात मध्यंतरी भुकंम्पाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धोका टळला होता मात्र आता पुन्हा भूकंप जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जनधन हानीचे वृत्त नाही.
भूकंप कशामुळे येतात?
पृथ्वीचं कवच एकसंध नाही तर अनेक टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे भूपट्टांनी मिळून बनलं आहे. या भूपट्टांच्या सीमा जिथे एकमेकांना भिडतात, तिथे भूगर्भीय हालचालींची तीव्रता जास्त असते. या प्लेट्स एकमेकांशी घासतात, एकमेकांपासून दूर जातात किंवा कधी एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढते. वर्षाला जास्तीत जास्त 1 ते 10 सेंटीमीटर एवढ्या मंद गतीनं ही हालचाल होत असते. पण कधीकधी त्यातही अडथळा येऊन दबाव निर्माण होतो.
मग अचानक तो दबाव मोकळा होतो, तेव्हा त्यातून मोठा भूकंप येऊ शकतो. पृथ्वीवर असे तीन मुख्य प्रदेश आहेत जिथे मोठ्या भूपट्टांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, मिड अटलांटिक रिज आणि अल्पाईड बेल्ट म्हणजे आल्प्सपासून हिमालयापर्यंतचा पट्टा. अल्पाईड बेल्टच्या पूर्व भागात भारतीय भूपट्ट ही युरेशियन प्लेटखाली जाते आहे, त्यातून हिमालय पर्वत आणि उत्तर भारताचा भाग, अंदमान आणि कच्छचं रण तसंच तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भूकंप होतात.
युरोपचा दक्षिण भाग, तुर्की, सीरिया, इराण हे देशही याच अल्पाईड बेल्टमध्ये आहेत. पण भूपट्टांच्या हालचाली कमी असलेल्या ठिकाणीही भूकंप येऊ शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लातूर आणि कोयनानगरला झालेले भूकंप. खडक आणि मातीतले बदल, ज्वालामुखी आणि लाव्हा रसाच्या हालचाली, जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह अशा गोष्टींमुळे असे भूकंप निर्माण होऊ शकतात. कधीकधी अणुस्फोट खाणकाम, तेलासाठी केलं जाणारं उत्खनन, मोठ्या धरणांमुळे तयार झालेले तलाव अशा मानवनिर्मिती गोष्टींमुळे भौगोलिक रचनांवर परिणाम होऊन भूकंप येऊ शकतात.