Publish Date: Wed, 23 Feb 2022 (12:14 IST)
Updated Date: Wed, 23 Feb 2022 (12:15 IST)
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे.
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.
दरम्यान, नवाब मलिकांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी तिथे जोरदार घोषणाबाजीही केली.
मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस म्हणण्याची सवय- शरद पवार
नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल अशी आम्हाला खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
शरद पवार यांनी म्हटलं, "त्यांनी कोणती केस काढली आहे? नवाब मलिक यांच्या वरती कोणत्या प्रकरणात कारवाई केली गेली आहे याबाबत मला माहिती नाही. काही झालं विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस आहे म्हणायची सवय आहे. त्याच्यात काही नवीन नाही."
"मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यावरही असेच आरोप झाले होते. आता वीस-पंचवीस वर्षं झाली तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, सत्तेचा गैरवापर करणं सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला आहे. ते केंद्र सरकारवर बोलतात म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं.
20 वर्षांनी नवाब मलिकांची चौकशी का?- संजय राऊत
"नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
"महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. एखाद्या गोष्टीची चौकशी होऊ शकते. पण ही चौकशी हे 20 वर्षांनी कशी करत आहेत," असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.