कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये ३३ हजार ७९९ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. मागील वर्षी २०२० मध्ये अशा विविध उपक्रमांमधून राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
या जानेवारी महिन्यात २० हजार ७१३ बेरोजगारांना तर फेब्रुवारी महिन्यात १३ हजार ८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते. त्याचबरोबर विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. राज्यात या विविध उपक्रमांना बेरोजगार उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठीचे हे उपक्रम यापुढील काळातही प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी नोकरीइच्छूक तरुणांनी महास्वयंम वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी, आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही वेबपोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले.
या फेब्रुवारीमध्ये विभागाकडे ३५ हजार ९१८ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात १० हजार ४८१, नाशिक विभागात ४ हजार ७७३, पुणे विभागात ११ हजार १४२, औरंगाबाद विभागात ५ हजार ६९२, अमरावती विभागात १ हजार ३४६ तर नागपूर विभागात २ हजार ४८४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. फेब्रुवारीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ८६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार ८७८, नाशिक विभागात १ हजार ३५३, पुणे विभागात ३ हजार ८९३, औरंगाबाद विभागात ६९५, अमरावती विभागात १४५ तर नागपूर विभागात १२२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.