राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी अर्थात आज मनसेची महत्त्वाची बैठक होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे. सकाळी राज ठाकरे वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये या बैठकीला सुरुवात होईल.
राज ठाकरे या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत.