टाटा मेमोरियल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना म्हाडाचे १०० घरे देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. अखेर हे १०० घरे तयार झाली आहेत. आता येत्या रविवारी, १६ मे २०२१ रोजी म्हाडाच्या १०० घरांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
टाटा मेमोरियल रुग्णालय हे कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नावाजलेले रुग्णालय असून या रुग्णालयात महाराष्ट्र तसेच देशातून रुग्ण येत असतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असतात. या नातेवाईकांना रुग्णालयात राहण्याची सोय नाही तसेच काही रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी निवासस्थान परवडत नाहीत यामुळे या नातेवाईकांवर मुंबईतील फुटपाथ, पुलाखाली राहण्याची वेळ येते. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासाठी राज्य सरकारने म्हाडांतर्गत १०० घरे देण्याची जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा केली होती.